Saturday, December 17, 2011

जाता जाता...

"हे वर्ष कधी सरल काही समजलच नाही नई".... दर वर्षीच्या डिसेंबरमध्ये हमखास कानावर पडणार हे वाक्य.. तस पहायला गेल तर काळ ना कुणासाठी धावलाय ना थांबलाय. तरीपण आपल्याला मनात कुठेतरी अस वाटत असत की सगळ खुप लवकर घडून गेल.. हे वाक्य बोलल की आपण ह्या वर्षी खुपच busy होतो अस भासवता येत म्हणून मी पण shining मारायला हां dilogue मारतो बरयाचदा.. दिवाऴी जवळ आली की सगळीकड़े साफ़सफाईची गड़बड़ सुरु होते... सगळ आवरत असताना जून-पुराण बरच काही सापडत जात... कधीतरी जपून ठेवलेल.. नकळत हरवलेल.. बरच शोधूनही न सापडलेल... तर काही जुन्या आठवणीनी झालेली ओल साठवून ठेवलेल.. उलगडत जातो मग आठवणींचा खजिना....म्हंटल चला.. आपण पण ह्या वर्षीचा शेवट आलाय म्हणून मनाची साफ़ सफाई करायला घेवु.. काहीतरी अनमोल नक्कीच सापडेल.. बघुतरी try मारून.. बसलो एकटाच विचार करत... आठवत गेले मन अनेक क्षण... लपलेले.. माझ्या हाकेची वाट पाहणारे..
बाबानी पाठवलेला "तिळगुळ घे गोड बोल" चा SMS... कॉलेज मध्ये असताना चहापासून ते exam फी पर्यंतचा हिशेब लिहून ठेवलेली रूम आवरताना सापडलेली एक diary.... ऑफिसच्या pantry मध्ये cream ची biscuits पाहून उगाचच झालेला आनंद..... तळहातावर पडलेला पहिल्या पावसाचा थेंब.... पाकिस्तानला चारीमुंडया चित केल्यावर बेभान होवून मित्राना मीठी मारत केलेला जल्लोष..... वर्ल्ड कप जिंकल्यावर सचिन ला pavilion मधून बाहेर पळत येताना पाहून नकळत डोळ्यात साठलेले आनंदाश्रु... माझ्या मित्राच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला हातात घेताना अंगावर आलेले शहारे.... b'day ला आलेला एक अनपेक्षीत फोन.... मित्राने surprisingly दिलेल एक मस्त greeting कार्ड... रात्री भर पावसात बंद पडल्यावर सहा किलोमीटर ढकललेली अन सकाळी काहीही न करता आपोआप start झालेली माझी sweatheart पल्सर.... बरयाच वर्षानंतर पायाला झालेली एक जखम... पूर्ण आकाराला आलेल्या माझ्या पुण्यातल्या घरात ठेवलेल पहिल पाउल.... सकाळच्या थंडीत निवांत उन्हात बसलेल आणि ओळख नसतानाही फुकटात माझ्याकडून कुरवाळून घेणार एक गुबगुबीत मांजर.... "निसर्ग" मध्ये पोटात जाता जाता हृदयाला स्पर्श करून गेलेली prawns बिरयानी.... फुटपाथवर पेपर वाचत मोठमोठ्याने हसणारा एक वेडा भिकारी आणि पेट्रोल पाच रुपयानी महाग झाले म्हणून वैतागलेल्या अवस्थेत 'नक्की सुखी कोण' अशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहणारा मी... annual bash मध्ये "कोल्लावरी" आणि "साड्डा हक्क एथ्थे रख" वर केलेला धिंगाना डान्स (?).........
हे सगळ आठवताना ह्या वर्षी माझ्या आयुष्यात घडलेला एक फार मजेशीर किस्सा आठवला.. खरतर फालतू आहे पण आता आठवलाय तर लिहिन माझ कर्तव्य आहे.. :) माझ्याकडे खुप जून्या स्टाइल चा handset होता.... त्याच्याकड़े पाहून काही "जण" हसत होते तोपर्यंत मला काही नाही वाटल... पण जेव्हा काही "जणी" हसल्या तेव्हा मात्र दिल का दर्द सारख काहीतरी झाल.. जळत्या मेनबत्तीवर हात धरून मी त्या काहीजनींच challenge स्वीकारल आणि नविन handset विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला...."basic functionalities with good look and feel" पासून सुरु झालेला प्रवास "touch screen with 3G" ला जावून पोहोचला आणि मला नऊ हजाराचा चटका बसला.. नविन handset विकत घेतल्या पासून एक विचित्र घटना घडायला लागली... ऑफिस मध्ये एकदा एक मस्त ringtone ऐकू आली मला.. दिल चाहता है हां माझा लय लय लय आवडीचा पिक्चर.. का ते विचारू नका कारण काही भावनांच्या नशीबी शब्द नसतात.. त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आमिर खान द्विधा मनस्थितीत विचारात गुंतलेला दाखवलाय.. त्यावेळी जे backgroung music आहे ना ती ringtone..... मला ऐकताक्षनी आवडली.. कुठून ऐकू आली ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण नाही सापडली.. नंतर जणू ती ringtone माझा पाठलागच करत होती.. cafetaria मध्ये.. gym मध्ये...hotel मध्ये.. अशी 7-8 वेळा ती ऐकू आली मला.. पण कुठून ऐकू येतीये ते समजतच नव्हत.. प्रेमातच पडलो मी तिच्या... download करावीशी सुद्धा वाटेना कारण प्रेम येड़ असत... 21 november ला मी ऑफिस मध्ये खुप busy असल्याची acting करत असताना ती पुन्हा ऐकू आली.. मी झपकन मान वळवली आणि finally ती मला सापडली.... आज ती माझ्या आयुष्यात आहे.. माझ्या ऐतिहासिक handset च्या ringtone च्या रुपात... :)
ह्या वर्षीचा शेवट ह्याच वर्षीच्या आठवणीनी
गोड केला... बघितलत... हे अस असत आठवनींच.. इतक सगळ कुठे लपल होत देव जाने... पण मज्जा आली एक flashback मारताना.. तुम्ही पण मारून बघा एक try .. मस्त वाटत.. :)
काही जणांची आयुष्यात entry, काहींची नुसतीच धावती भेट.. तर काहीना हसत हसत केलेला गुड बाय... ह्या सगळ्या क्षणांच्या भाऊगर्दीत आयुष्याच्या तराजुचा balance सांभाळता सांभाळता हे वर्ष कधी सरल समजलच नाही राव !!!

Saturday, November 12, 2011

स्माईलचा सिग्नल

मी पुण्यात जिथे राहतो ना तिथून अगदी हाकेच्या अंतरावर एक छोटीशी बाग़ आहे. तिच्या शेजारीच एक चौक आहे. त्या चौकातल्या traffic signal वर थांबल्यावर माझी नजर बरयाचदा त्या बागेमध्ये जाते. गड़बड़ गोंधळाने भरलेल्या आयुष्यात थोडीशी शांतता शोधायला आलेले बरेच जन तिथे दिसतात. ती बाग़ म्हणजेच विश्व मानून मनसोक्त खेळणारी छोटी मुले, प्रपंच ह्या महाकठीण विषयाच analysis करणारे त्या मुलांचे आई वडिल, शपथांचा जिवघेना खेळ खेळत बसलेली प्रेमीयुगुल, ह्या भावनांच्या विश्वाला सुद्धा cash करायचा प्रयत्न करणारा भेळवाला असे अनेक चहरे असतात तिथे. फार छान वाटत मला त्यातला एकेक चेहरा वाचायचा प्रयत्न करायला... पण ह्या सगळ्यापेक्षा मला जास्त विचार करायला लावतात ते म्हणजे आजोबा आणि आजींचे चेहरे.. त्या बागेत एक वयोवृद्ध लोकांचा ग्रुप जमतो. मस्त circle करून बसलेले असतात ते सगळे जन.. कधी निवांत गप्पा मारतात.. कधी व्यायाम करतात.. तर कधी कधी मेजवानीचा बेत सुद्धा पाहिलाय मी त्यांचा.. दिवसातला सगळ्यात romantic वेळ म्हणजे संध्याकाळ... दिवसभर संसारगाडा हाकन्यासाठी केलेल्या पळापळी नंतर आपल्या हक्काच्या माणसा बरोबर चार निवांत शब्द बोलण्याची एक सुंदर कातरवेळ..

अन म्हातारपण ही तर आयुष्याची संध्याकाळ.. काय बोलत असतील ते सगळे जन हां विचार बरयाचदा मनात येतो.. फार वाटत त्यांच बोलन ऐकाव पण नाही जमत तिथे जायला.. गाडीवर बसल्या बसल्याच मग मी स्वताच्या म्हातारपणाचा एक demo पाहतो.. ते सगळ्यात handsome ,smart आजोबा आहेत ते म्हणजे मी.. [अधून मधून माणसाने स्वताहाची उगाचच स्तुती करावी.. its good for health ;) ] .. ते टक्कल पडलेले आजोबा म्हणजे माझा तो मित्र ज्याला आता just टक्कल पडायला सुरुवात झाले.. ते शांत बसलेले आजोबा म्हणजे तो अति senty मित्र.. अस काहीतरी उगाचच सुचायला लागत मला... handsome आजोबांच्या शेजारी बसलेल्या आजी पाहून मात्र थोडा ठसका लागतो.. असो..... एकदा मी त्याना हसताना पाहिल... अन मी थोडा निराश झालो.. हो.. निराश झालो कारण ते हसत नव्हतेच.. त्यानी बहुतेक हास्य क्लब स्थापन केला होता.. माझ्या मनाने लगेच माझ म्हातारपण तिथून काढून घेतल.. कृत्रीम हास्य?? किती भयानक प्रकार आहे हा.. ते सुद्धा आयुष्याच्या संध्याकाळी?? अस काय चूकतय आपल? निखळ हास्य खरच इतक महाग आहे का ? त्यांच्या जवळ कुणीच नसाव मनसोक्त हसवणार? नेमक कारण काय ह्यामागच...?? नुसते प्रश्न.. प्रश्न आणि प्रश्न....

अशा वेळी मला माझ्या आयुष्यातला एक दिवस आठवतो.. engg च्या first year second sem चा second पेपर...... engg स्टुडेंटच्या रूम मध्ये एक वेळ वही पेन नसेल पण देवाची मूर्ती आणि उदबत्तीच पाकिट हमखास असत.. ते भयंकर श्रद्धेचे दिवस.. पहाटे पहाटे "ये कहा आ गए हम युही साथ साथ चलते" म्हणत मी आणि माझ्या हातातल पुस्तक होस्टेल शेजारच्या मंदिराकडे देवाशी मांडवली करायला निघालो होतो... भयंकर टेंशन होत.. काही सुचत नव्हत.. इतक्यात समोरून एक अगदी छोटासा मुलगा आला आणि "हैप्पी न्यू इयर" म्हणून हसत हसत माझा हात हातात घेवून पळुन गेला.. मी नंतर एकटाच त्याला बघून हसत होतो.. मला तो दिवस कुठला होता, त्यादिवशी पेपर कुठला होता, त्या पेपरचा माझ्या profession करियर वर किती परिणाम झाला हे काहीच नाही आठवत.. पण ते निखळ हास्य आजही जसच्या तस 10 वर्षानंतरही डोळ्यासमोर आहे.. त्या tense क्षणी सुद्धा हसण किती सोप होत.... मग हे आजोबा आजी का मनसोक्त हसत नाहीत.... तेव्हा अस वाटत की जावून भरपूर हसवाव त्याना... सांगाव की इतक हसा की विधात्याला सुद्धा जळजळ झाली पाहिजे तो माणूस नसल्याची..

आयुष्य म्हणजे आहेच काय मित्रानो.. एका कुशीपासून ते चार खांद्यापर्यंतचा प्रवास.. कुशी विधाता ठरवतो तर चार खांदे आपल्याला कमवायचे असतात इतकाच काय तो फरक... मनसोक्त हसुया.. because we are temperory here ... माझ म्हातारपण सुद्धा असच असेल का? मी सुद्धा असाच हास्य क्लबचा member असेन का? अशा प्रश्नांच्या गर्तेत त्या सिग्नलवर मी अडकलेला असताना शेजारच्या गाडीवर आईच्या कुशीत निवांत बसलेल एक छोटस बाळ माझ्या प्रश्नावलेल्या विचित्र चेहरयाकड़े बघून खुदकन हसत.... अन मला सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मीळाल्याचा भास् होतो... :) फार वाटत की त्या चिमुकल्याचा गाल पकडून त्याला thanks म्हणाव.... पण नेमका तेवढ्यात सिग्नल ग्रीन होतो.... :)

Saturday, September 10, 2011

बाप्पांशी गप्पा !!!


"गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे सज्ज", "गणराय निघाले" अशा आशयाच्या बातम्या पेपर मध्ये वाचत एकटाच बसलो होतो. रात्रीची वेळ होती. गेले दहा दिवस सर्व आसमंत बाप्पामय झाला होता.खर पाहायला गेल तर बाप्पांच येण आणि जाण ह्या दोन्ही संकल्पना मला फार मजेशीर वाटतात. कारण ह्या सगळ्याचा मालक आहे तो. तो गेला तर हाहाकार उड़ेल. :) पेपर वाचता वाचता फार वाटत होत की विसर्जन मिरवणुक पाहायला जाव पण मूड नव्हता. मिरवणुकीत पुण्याच ग्रामदैवत कसबा गणपती, मानाचे इतर गणपती, "श्रीमंत" शब्दाला खरया अर्थाने न्याय देणारा दगडूशेठ ह्याना पाहताना मिळनार समाधान काही औरच. म्हणून पेपर बाजुला ठेवला आणि निघालो एकटाच बाप्पांच दर्शन घ्यायला.
ढोल ताशे, लेझीम, टाळ मृदुंग ह्या पारंपारीक वाद्यानी वातावरण भक्तिमय झाल होत. डोल्बी आणि त्याच्या तालावर नको तसे नाचणारे भक्त (?) ही विकृतीसुद्धा त्या वातावरणात मिसळली होती. हे सर्व पाहात मी पुढे चालत होतो. इतक्यात समोरून बाप्पांची एका रथावर विराजमान झालेली मूर्ती दिसली. आहाहा... काय तो थाट.. ते तेज फ़क्त ह्या विधात्याकडेच असू शकत हे स्पष्ट जाणवत होत. अंगावर शहारे आले. समाधानाची लाट मनाला येवून थडकली. मी दोन्ही हात जोडून डोळे मिटून बाप्पाना नमस्कार केला.. डोळे उघडले अन मी अवाक झालो... बाप्पा चक्क रथावरून खाली उतरत होते.. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना..
आजूबाजूची विकृती धिंगाना घालत होती.. कुनाचच लक्ष नव्हत की बाप्पा खाली उतरत आहेत... खाली उतरून बाप्पा माझ्याजवळ आले.. मी आ वासून बघत उभा होतो.. करणार तरी काय.. ह्या जगाचा मालक माझ्या समोर उभा होता.. "ह्या गर्दीत कुणीतरी मला भेटायला आल्याच पाहून बर वाटल" बाप्पांचे ते शब्द ऐकून मी थोड़ा भानावर आलो.. "अहो.... बाप्पा.... तुम्ही..." बोलता बोलता मी त्यांच्या पायाला स्पर्श केला.. "तुला चहा खुप आवडतो ना.. चल चहा पित गप्पा मारू"... तसाच हादरलेल्या अवस्थेत मी त्यांच्या बरोबर जवळच्या टपरीवर गेलो..
"छोट्या, दोन स्पेशल घे रे"... मी ऑर्डर दिली.. मला एकट्याला दोनची ऑर्डर देताना पाहून तो छोट्या तिरकस नजरेने बघून गेला... पण माझ्या बरोबर बाप्पा आहेत अस सांगितल तर उद्यापासून गरीबाला चहा सुद्धा महाग होइल म्हणून मी काही बोललो नाही... "कसे आहात बाप्पा? सगळ ठीक आहे ना?" मी विचित्र प्रश्नाने सुरुवात केली. "मी रथावर नाही आहे तरी सगळे आपापल्या भक्तीत(?) गुंतलेत हे पाहून मी कसा असेन अस वाटत तुला भक्ता?" बाप्पांच्या प्रतिप्रश्नाने मी विचारात पडलो. "अरे हे काय चालवलय माणसाने... कुठे कुठे शोधायचा प्रयत्न करतोय तो मला.. सर्वस्व हरवून परमेश्वर शोधतोय..." "खरय बाप्पा तुमच... अहो इथे सगळ संपल्यासारख वाटतय हो.. कुणीच कुणाचा नाही उरलेला इथे.. सगलेच हरवलेले.. तुम्ही दिलेल्या ह्या प्रखर सूर्याची, आई सारखी माया करनारया पृथ्वीची, अथांग सुंदर समुद्राची दखलही नाही होत बाप्पा इथे... खुप वाटत हो की तुम्हाला भेटून सांगाव की बस झाल बाप्पा.. तुम्ही आम्हाला फुकट दिलेल हे सगळ परत घ्या... आम्ही हे सगळ उपभोगायच्या लायकीचे नाही राहिलो..."
ऐकता ऐकता बाप्पांचा व्यथित झालेला चेहरा स्पष्ट जाणवत होता.. "खुप स्वप्न होती माझी ह्या जगाची निर्मीती करताना... ज्याच्या सौंदर्याची व्याख्या सुद्धा कुणाला जमणार नाही अस काहीतरी बनवायच ह्या इराद्याने हे जग बनवल... पण कुठे काय चुकल समजत नाही.. सूर्य आजही रोज उगवतो.. चंद्र आजही तितकाच देखना आहे... झाडे आजही वारयाबरोबर गाणी गातात.. पाऊस आजही बेभानपणे कोसळतो.. कोकीळा आजही सुरात गाणी गाते... पण मग माणूस का हरवलेला? का कित्येक डोळ्यात मला लपवलेल पाणी दिसतय? खुप अस्वस्थ होतो रे मी भक्ता जेव्हा माणूस मलाच माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तर मागायला रांगा लावून माझ्या दारात उभा असतो.. स्वताहाभोवती इतकी आवरण बनवून बसलाय माणूस की मलाच शोधाव लागतय मी बनवलेला माणूस कुठे गेलाय ते..."
बाप्पांचा प्रत्येक शब्द मला आत्मपरिक्षण करायला भाग पाडत होता... किती स्वार्थी आहोत आपण सगळे.. विधात्यालाही मन असेल ह्याचा कधी विचारही नाही करत आपण... "होय बाप्पा... आमच खुप चुकतय हे आम्हालाही पटत.. पण ह्या चक्रव्युहातुन बाहेर कस पड़ाव ते समजत नाही हो.. पैसा, संपत्ती, स्वार्थ ह्यांच्या जंगलात आम्ही हरवलोय... ह्यातून बाहेर पडायची इच्छा खुप आहे पण मार्ग सापडत नाहिये.. तुम्हीच मार्ग दाखवा बाप्पा..."
बाप्पानी एक सोनेरी पिशवी बाहेर काढली.. मला म्हणाले, " माझ्या हातून घडलेली अजरामर कलाकृती आहे हयात... मी स्वप्न ही नव्हत पहिल की अस काही मी निर्माण करू शकतो.. आजही जेव्हा मी व्यथित होतो तेव्हा ह्याकडे पाहिल की मला पुन्हा नवी उमेद मिळते.. हे घे तुला.. जेव्हा जेव्हा तुला प्रश्न पडतील तेव्हा हे तुला उत्तर शोधायला मदत करेल.. जपून ठेव.." मी आनंदाने ती पिशवी घेतली आणि त्यात हात घातला... एक लख सोनेरी वस्तु माझ्या हातात आली आणि चमत्कार.. त्यात मला माझाच चेहरा दिसला..
बाप्पा हसुन म्हनाले "माझ्या हातून घडलेली अजरामर कलाकृती.. मला जन्माला घालणारा आणि माझ्या शोधात जगभर भटकनारा एकमेव प्राणी.. 'माणूस'..... " मी वाकून बाप्पाना प्रणाम केला..
"बोल तुला काय हवे?" मी म्हणालो "बाप्पा, तुम्ही दिलेल्या ह्या आयुष्यासाठी तुमचे आभार... माझ्या आयुष्यात माझ्यावर मनापासून प्रेम करणारी माणस दिल्या बद्दल तुमचे आभार..बाकी काही नको बाप्पा, माझ्या मनात समाधानाचा कप्पा सदैव जीवंत राहू दया, हातून चुक घडली तर माफी मागायची ताकत माझ्यात सदैव राहू दया, माझ्यावर प्रेम करणारया माणसाना तितकच प्रेम करायची प्रेरणा माझ्यात असू दया.. ह्या जगावर तुमचा वरदहस्त आणि तुमच प्रेम सदैव राहू दया"... तथास्तु म्हणून बाप्पा निघाले...
"थांबा बाप्पा.. जाता जाता एक प्रश्नाच उत्तर देवून जा.. मेल्यानंतर माणस कुठ जातात बाप्पा? काही माणस डाव अर्ध्यावरच सोडून गेलेत.. ती परत भेटतील का हो बाप्पा?" बाप्पा शांत नजरेने माझ्याकडे पहायला लागले...
माझ्या प्रश्नाच ते उत्तर देणार इतक्यात कानाजवळ कर्कश्य आवाज ऐकू आला... डोळे उघडून शेजारी पाहिल तर पहाटे ६.३० चा गजर वाजत होता.. छातीवर पेपर तसाच होता.. स्वप्न होत.. बाप्पांच विसर्जन झाल होत... उठून शेजारच्या गणपती मूर्तीला नमस्कार करून आयुष्याच्या गाडीवर स्वार झालो...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!! :)

Wednesday, July 13, 2011

प्रिय मुंबईस....


प्रिय मुंबईस,
आज तुला पत्र लिहिताना हात थरथरतोय. डोळ्याच्या कडा पानावल्यात. आत्ताच तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची न्यूज़ TV वर पहिली. पुन्हा एकदा bomb blasts !! निष्पापांचे मृतदेह, बाप गमावून निराधार झालेली अनाथ मूल, तुझ्या रस्त्यावर सांडलेल ते हतबल रक्त पाहून तळपायाची आग मस्तकाला गेली ग.... काही दिवसांपूर्वी आमच्या पुण्याला झालेल्या जखमेची आठवण पुन्हा ताजी झाली. किती उपकार आहेत ग तुझे आमच्यावर हे शब्दात मांड़ण केवळ अशक्य.. आर्थिक राजधानीचा थाट तुझा... कित्येक बेरोजगाराना मायेची भाकरी दिलीस तू.. कित्येक बेघराना आधार दिलास.. तुझी गती पाहून आम्ही अवाक होतो.. परदेशातही 'I am from India' अस आम्ही सांगितल्यावर 'ohh India? then are you from Mumbai?' ह्या प्रतिप्रश्नावर मुंबईकर नसूनही आमची छाती तुझ नाव ऐकून अभिमानाने फुगते.. सारख इश्वर चरनी प्रार्थना करतो की हिला कुणाची नजर लागू नये.. पण नेमक हेच घडत.. जे आज घडल ते... पुन्हा एकदा तुझा बलात्कार झाला..
कधी संपणार हे सगळ हा भ्याड प्रश्न एकमेकाना विचारून चादरी डोक्यावर घेवून आज आम्ही झोपी जावू... पाउस तसा चालूच आहे तेव्हा तुझ्या रस्त्यावर सांडलेल रक्त पुन्हा एकदा काही क्षणात वाहून जाईल... आता नाही सहन होत ग हे सगळ.. बंदुका हातात घेवून तुझ्या अपराध्यांच्या डोक्यात गोळ्या घालाव्याश्या वाटतात पण अपराधी तरी कोण ग.. आम्हीच.. होय आम्हीच... स्वराज्यासाठी ज्या भूमीवर शिवरायानी शत्रुचा कोतळा बाहेर काढला त्याच भूमीवर आम्ही स्वाभिमान आमच्याच छातीत कुजवत ठेवत जगतोय... नुसत एकमेकाना दोषी ठरवून षंढत्वाच जीवन जगतोय.. खर तर आमच्यापेक्षा ते षंढ सुद्धा बरे.. निदान टाळ्या वाजवून स्वताहाच पोट तरी भरत आहेत.. आम्ही मात्र पदोपदी तुझा बलात्कार निष्क्रियतेने पाहतोय.. मेनबत्त्या पेटवून मेलेल्यांना श्रद्धांजली वाहून राजकारन्याना शिव्या देतोय.. पण हे भड़वे नेते तरी कोण ग.. आमच्याच निष्क्रिय तेचे, आमच्याच भ्याडपनाचे निर्जीव पुतळॆ.. स्त्रीच्या अब्रुच्या रक्षनासाठी छातीची ढाल बनवनारी ती मर्दांची जात कुठे हरवली माहीत नाही ग.. ज्या भूमी मध्ये अखंड महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने रक्ताचे पाट वाहिले त्याच भुमीमध्ये काही दिड दमडीचे हिजड़े निश्पापाना मारत आहेत आणि आम्ही काय करतोय?? तर निषेध नोंदवतोय.... तुझ्या चरणी हा माथा टेकवून तुझी माफी मागतो आज.. शक्य असेल तर माफ़ कर आम्हाला.. आम्हीच तुझे अपराधी आहोत.. माफ़ कर माते, आम्हाला माफ़ कर !!!



- तुझा अपराधी

Sunday, June 26, 2011

आवाज कुणाचा


आपला भारत देश तीन गोष्टींसाठी वेडा आहे. क्रिकेट, बॉलीवूड आणि राजकारण. त्यातल्या त्यात सध्या राजकारण हा विषय बराच तापलाय. मित्रांबरोबरच्या कट्ट्या पासून ते colligues बरोबरच्या cafetaria पर्यंत राजकारण हा एकच विषय चर्चिला जातोय. माझा सुद्धा हा प्रचंड आवडीचा विषय. त्यामागची कारणे दोन. पहिल आणि महत्वाच कारण म्हणजे माझे बाबा राजकारणात आहेत. त्यामुळे लहानपनीपासून मी राजकीय वातावरण खुप जवळुन पाहिलय. 'चोरी करू नये' आणि 'नेहमी खरे बोलावे' असल्या संस्कारांबरोबरच 'मतदान केलच पाहिजे' हा संस्कार सुद्धा माझ्यावर बालपनीच झाला. :) ह्या आवडीमागच दुसर कारण म्हणजे मी मुळचा कोल्हापुर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातला आहे. आता कोल्हापुर म्हंटल की 'खाईन तर तुपाशी नाहीतर घाल काशी' ह्या विचारसरणीची मानस. जिथे संघर्षाची गरजच नाही तिथेही संघर्षाला तयार असतात. मग जिथे गरज आहे तिथे तर बघायलाच नको. त्यात राजकारण आणी संघर्षाच तर रक्ताच नात. कागल तालुका तर आमच्या जिल्ह्यातल्या राजकारणाची रणभूमी. आपल्या पुण्यात कस ओळख सांगताना नावा बरोबर कंपनीच नाव सांगतात ना तस आमच्या तालुक्यात नावा बरोबर पक्षाच म्हणजे गटाच नाव सांगतात इतक राजकारण रक्तात भिनलेल. थोडासा अतिशयोक्ती अलंकाराचा touch देवून बोलायच झाल तर नविन बाळ जन्माला आल की 'ह्याच नाव काय ठेवायच' ह्या चर्चेच्या आधी 'कोणत्या गटाच एक मत वाढल' ह्याची चर्चा आमच्या तालुक्यात आधी सुरु होते. हे सगळ जवळून पाहताना मला आलेले काही अनुभव तुमच्याशी आज शेअर करतो. काही अनुभवलेले तर काही ऐकलेले... जितके मजेशीर तितकेच मार्मिक.. :)
ग्रामपंचायतीच्या निवडनुकीचा जोश शिगेला पोहोचला होता. दोन्ही गटाचे कार्यकर्ते गाड्या फिरवत दिसेल त्या माणसाला उचलून मतदान केंद्रापर्यंत नेत होते. 'दिसला की उचला' असे आदेशच होते नेत्यांचे. दिवसभर नुसती पळवापळवी चालु होती. साडेचार वाजले. अर्ध्या तासानी मतदान बंद होणार म्हणून दोन्ही गटाकडून 'कुणाला उचलायच राहिलय का?' ह्याची चर्चा सुरु झाली. मतदान यादीमध्ये एक नाव सापडल. ज्यानी अजुन मतदान केल नव्हत त्यांच वय 70 होत आणि त्याना ठीक चालता आणि बोलता येत नव्हत. पण break up नंतर sad songs ना जेवढी किम्मत असते त्याहीपेक्षा जास्त किम्मत ग्रामपंचायतीच्या वेळी एका मताची असते. त्यामुळे दोन्ही गटाच्या गाड्या त्या माणसाच्या घराकडे वळल्या. त्याना कोण घेवून जाणार यावरून बाचाबाची झाली. शेवटी पहिला जी गाडी पोहोचली होती त्यात त्याना बसवून मतदान केंद्रा पर्यंत आणल. आता त्याना चालता येत नव्हत... त्याना आत उचलून कोण नेणार ह्यावरून मारामारी सुरु झाली.. शेवटी निवडनुक अधिकारयानी मध्यस्थी करून असा तोडगा काढला की ते आजोबा कुणाला मत दयायच आहे ते त्या अधिकारयाच्या कानात सांगतील. आजोबांचे ओठ अधिकार्याच्या कानाला आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे कान अधिकार्याच्या दुसर्या कानाला भिडले... आजोबा बोलले आणि ते कार्यकर्त्यानी ऐकल सुद्धा... ज्या गटाला मत मिळाल होत त्यांच आकाश ठेंगन झाल.. 1947 साली ब्रिटीश्यांचा झेंडा खाली उतरवून तिरंगा फड़कल्यावर लोकांना जितका आनंद झाला नसेल इतका आनंद त्याना झाला........ गुलालाच्या रंगात आसमंत रंगून गेला......... आणि कुणीतरी आरोळी ठोकली.. "आवाज कुणाचा".....
रोजच्या अड्डयावर नेता आणि त्याचे कार्यकर्ते गप्पा मारत बसले होते.. दिल्ली पासून ते गल्ली पर्यंतचे विषय चर्चीले जात होते. 'भारताचा विकास' ह्या विषयावर सुरु झालेली चर्चा 'शास्त्रीय संगीत' ह्या विषयावर येवून पोहोचली.. आता ते कस ते विचारू नका... लहानपणीच्या आठवनीत रमलेला नेता 'बालपणी सुरपेटी शिकायची भयंकर इच्छा होती पण राजकारनातुन वेळ मिळालाच नाही' अस बोलून गेला. ते वाक्य कार्यकर्त्यांच्या हृदयाला भिडल... दुसरया दिवशी नेता अड्डयावर आल्यावर पाहतो तो काय.. समोर सुरपेटी.. एक कार्यकर्ता हळव्या स्वरात म्हणाला.. 'साहेब, दोघास्नी पाठवलय सुरपेटीचा मास्तर शोधायला.. 2 -3 दिवसात सापडलच एकतरी मास्तर.. तुम्ही सुरपेटी शिका साहेब.. आम्ही आहोतच रोज ऐकायला...' नेत्याला काय बोलावे समजेना.. तिथून पुढे थोड़ा वेळ star plus वरचे काही senty scenes पार पडले.. नेत्याने सुरपेटी उचलून कोपरयात नेवून ठेवली आणि पुन्हा दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या गप्पा सुरु झाल्या... :)
सरपंचांच्या पोराला पल्सर घ्यायची आहे अशी बातमी गावात पसरली... गावात पत्र्याची शेड असलेल एक टु व्हीलर repairing च दूकान होत आणि त्याच्या बोर्डवर बजाज चा लोगो होता म्हणून लोक त्याला बजाजचा डीलर म्हनत. सरपंचांच्या कार्यकर्त्यानी त्या डीलरला निरोप धाडला की तुझ्या शो-रूम (?) मध्ये 2 दिवसात 2 पल्सर दिसायला पाहिजेत. तो बिचारा जिल्ह्याच्या गावाला जावून २ पल्सर घेवून आला. त्या दोन पल्सर गावभर फिरवून बघितल्यावर सरपंच सुपुत्राना त्या दोन्ही गाड्या click नाही झाल्या... म्हणून जिल्ह्याच्या गावाला जावून मोठ्या शोरूम मधून गाडी आणायच ठरल.. कार्यकर्त्यानी 4 व्हीलर ची व्यवस्था केली... सरपंच, कार्यकर्ते आणि सत्कारमूर्ती सरपंचसुपुत्र असा ताफा गाडी खरेदीसाठी बाहेर पडला.. गावाच्या वेशीवर आल्यावर एक कार्यकर्ता म्हणाला की त्या डीलरला पण घेवून जावू.. म्हणून गाडी परत गावातल्या शोरूमकड़े वळवली.. तो बिचारा गाडी repair करत बसला होता.. त्याला तसाच उचलून गाडीत बसवला आणि गाडीने जिल्ह्याकडे प्रस्थान केले...
ह्या आणि असल्या अनेक विनोदी क्षणांबरोबरच काही हळवे क्षणसुद्धा मी अनुभवले... माझ्या बाबांचा एक कार्यकर्ता आहे... कार्यकर्ता कमी आणि मित्र जास्त.. लहानपनीपासुनचा मित्र.. त्याच गावात एक छॊटस होटेल आहे.. होटेल कसल टपरीच आहे ती.... बाबांच दर्शन झाल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही अशी त्याची श्रद्धा म्हणून माझ्या बाबाना तो दर्शन ह्या नावानेच बोलवतो.. थोडक्यात त्याच वर्णन करायच झाल तर 'अगदी साधा माणूस'.... माझे बाबा सभापती म्हणून नीवडून आले तो दिवस आमच्या आयुष्यातला खुप मोठा दिवस होता.. सभापती पद म्हणजे तालुक्यातल्या जवळपास 80 गावांच प्रमुख पद... तालुक्याच्या गावी एक मोठ्या मैदानावर माझ्या बाबांचा सत्कार समारंभ चालू होता.. मोठ मोठे नेते, ढोल ताश्यांचा गजर.. गुलालाची उधळण चालू होती... त्या सगळ्या गर्दीच्या मागे बाबांचा तो मित्र एक छोटासा हार घेवून उभा होता.. बाबांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यानी त्याला पुढे येण्यासाठी हात केला.. इतक्या मोठमोठ्या लोकांचा गर्दित सुद्धा आपल्या मित्राने आपल्याला हाक मारल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.. त्या गर्दीतुन वाट काढत तो मित्र पुढे आला आणि माझ्या बाबाना सत्काराचा हार घालत 'जिकलास' म्हणत मीठी मारली... यशाच्या शिखरावर असताना जुन्या दिवसांची जाण ठेवत माझ्या बाबानी आपल्या मित्राला मारलेली ती हाक आणि त्या मित्राने अभिनंदनपर मारलेली ती निस्वार्थ मीठी मला बरच काही शिकवून गेली... !!!

Saturday, May 21, 2011

ओळखीचा अनोळखी

2008 - 09 चा काळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. प्रत्येक घटना मनाविरुद्ध घडत होती. परिस्थीती सुधारण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, घेतलेला प्रत्येक निर्णय परिस्थीती आनखीनच बिघडवत जात होता. हतबलता म्हणजे काय हे मी तेव्हा अनुभवल. आयुष्यात असे काही patches येतात जिथे कोसळनारा पत्यांचा बंगला पाहत बसण्यापलिकडे आपण काहीच करू नाही शकत. हे सगळ कमी की काय म्हणून recession नावाच वादळ professional life ला येवून थडकल होत. ती सगळी अस्थिरता मला असह्य झाली. माझा एक जिवलग मित्र आहे.. त्याने मला एक सल्ला दिला.. Take a Break..
त्या साल्याचे सल्ले दर वेळी मला मदत करून जातात.. म्हणून ऑफिस मधून मी संपूर्ण आठवड्याची सुट्टी घेतली.. आणि माझ्या most favourite resort ला जायचा निर्णय घेतला... माझ्या घरी...
सकाळी 10 च्या दरम्यान स्वारगेटला पुणे - कोल्हापुर गाडी मध्ये जावून बसलो. गर्दीचा कंट़ाळा आला की आजूबाजुला सुद्धा माणस नकोशी वाटायला लागतात म्हणून मी मुद्दामून माझ्या बाजुच्या सीट वर माझी bag ठेवून डोळे मिटून पडलो.. "कुणी बसलय का इथे?" एक अनोळखी आवाज कानावर पडला.. पाहिल तर एक 65-70 दरम्यान वय असलेले आजोबा उभे होते.. मला थोड अपराधी वाटल... मी लगेच माझी bag उचलली आणि त्याना सॉरी म्हणालो.. ते "नाही नाही its ok" म्हणत माझ्या शेजारी बसले. "तुम्हाला सातारयाला जायच आहे का? ही बस सातारयामध्ये नाही जात" मी त्याना कदाचित माहीत नसेल ह्या शंकेने विचारल.. ते हसले आणि म्हणाले "नाही मला कोल्हापुरलाच जायच आहे".. बस सुरु झाली आणि सुरु झाला एक 'प्रवास'....
बराच वेळ शांततेत गेला.. अशी शांतता जिच्या शोधात मी पुणे सोडल होत.. पण मनात मला पडलेल्या प्रश्नांचा गोंगाट संपता संपत नव्हता.. एक प्रश्न आहे जो आपल्यातल्या बरयाच जनाना अगदी सहज खचवून जातो.. 'हे सगळ माझ्यात बाबतीत का घडतय?'..... ह्या प्रश्नांची उतरे शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न करता करता मी पाहात होतो की ते आजोबा दर 10 -15 मिनिटानी पायातला बूट काढून पुन्हा घालत होते... मला वाटल की त्याना विचारव त्यामागच कारण पण माझ्या मनाने सगळ्याच क्षेत्रातून राजीनामा दिला होता त्यामुळॆ काही बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती..
"तू कोल्हापुरचा?" मी हसून हो म्हणालो.. "मग पुण्यात शिकतोस का?"... "नाही, माझ शिक्षण पूर्ण झालय, सध्या मी जॉब करतो.. software engineer आहे".... ते आजोबा भुवया उंचावुन मान डोलावत हसले... पण मला ती reaction नविन नव्हती म्हणून मी पण हसून दाद दिली... "कोल्हापुरात कुठे राहतोस?".. "नाही, मी proper कोल्हापुरचा नाहिये.. कोल्हापुर जिल्ह्यात एक छोट गाव आहे.. तिथला आहे.." हे ऐकून त्या आजोबांच्या चेहरयावरचे भाव अचानक बदलल्या सारखे वाटले.. बरेच दिवस शोधत असलेल काहीतरी सापडल की माणसाचा चेहरा जसा होतो तसा त्याचा चेहरा खुलला... "गाव?... म्हणजे शेती, जनावरे, बैलगाड्या, वडाच झाड....... हे सगळ असेल नई..." मी चेष्टेच्या उद्देशाने म्हणालो की "बैलगाड्यांच फ़क्त next version म्हणजे ट्रेक्टर आलेत पण बाकीच्यांच जुन version जसच्या तस आहे..." ते हसायला लागले..
"आजही तिथे वडाच्या झाडाखाली माणसांच्या गप्पा रंगतात का?" मी होकारार्थी मान डोलावत माझ्या गावचे काही मजेशीर किस्से त्याना ऐकवले... हे सगळ घडत असताना ते अजुनही पायातला बूट काढून पुन्हा पुन्हा घालत होते.. ते हसत हसत डोळ्यातल पाणी पुसत मला म्हणाले, "अजुनही कुठेतरी माणस आहेत हे समजल की बर वाटत.. नशीबवान आहेस तू.." ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला... गर्दीला कंट़ाळलेल्या एका प्रवाशाला माणूस शोधनारा दूसरा प्रवासी भेटला होता....
"अस का म्हणताय आजोबा?"...... त्यानी आपली कहानी सांगायला सुरुवात केली.. "मी पुण्यामध्ये नळ स्टॉप जवळ राहतो.. मोठा बंगला आहे माझा.." माझ्या व्यवहारी मनाने लगेच त्या बंगल्याची किंमत calculate केली... "1972 साली एकेक पैसा जमा करून मोठ्या कष्टाने उभा केल घर... मी पूर्वी मुंबईला सूत गिरनी मध्ये मोठ्या पदावर काम करत होतो.. पुण्यात घर बांधत असतानाच मुंबई मधल्या गिरन्या बंद पडल्या आणि माझ्या समोर मोठमोठी संकट उभी राहिली.. पण माझ्या पत्नीने त्या वेळेत खुप मोलाची साथ दिली मला.. ठामपणे उभी राहिली माझ्या पाठीशी.. आज आम्ही दोघेच राहतो त्या भल्या मोठ्या बंगल्यात... माझा मुलगा mechanical engineer आहे.. पण मध्यंतरी शेअर मार्केट मध्ये भरपूर फ़ायदा झाला म्हणून जॉब सोडून कसलीतरी शेअर मार्केट संबंधी business सुरु केलाय त्याने.. मला आणि माझ्या पत्नीला नाही पटल त्याच पैशा मागे धावन पण नाही ऐकले त्याने कुणाचे... कधीतरी येतो अधून मधून आठवण आलीच आमची तर भेटायला.. मुलगा माझा हरवलाय ह्या व्यवहारी जगात.. मुलगीच 6 वर्षा पूर्वी लग्न झाल.. मला एक नातू सुद्धा आहे.. पण तो थोडासा mentally weak आहे.. बरयाच treatment झाल्या पण काही उपयोग नाही झाला.. माझ्या काही लक्षातच राहत नाही ओ आजोबा, मी काय करू अस सारख म्हणत असतो.. " बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले.. काही दिवसां पूर्वी माझ्या पत्नी ला heart attack आला होता. कुणीच नव्हत जवळ.. देव बलवत्तर म्हणून वाचली.. दर 1 तासाने मला मिसकॉल द्यायला बजावलय मी तिला तेव्हापासून... माझ ही शरीर आता साथ नाही देत.. माझ्या पायाला दर 10 -15 मिनिटानी सूज येते.. म्हणून डॉक्टर नी दर थोड्या वेळाने शूस काढून थोड चोळायला सांगितलाय पाय... जीवन आनंदी असाव म्हणून आयुष्यभर झगड़लो पण आज जे हवय तेच नाहिये.. माणसं..."
मी सुन्न होवून ऐकत होतो.. "तुमच्या पिढीची गती पाहून बर वाटत.. पण ज़रा जपून पुढे जा.. आपली माणस सांभाळा... कारण जितकी गती जास्त तितकीच ठेच लागल्यानंतरची जखमही मोठी.." कोल्हापुर कधी आल समजल ही नाही.. त्याना मन मोकळ झाल्या सारख वाटत होत.. गाडी थांबली.. त्यानी मला त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि कधीतरी घरी ये म्हणाले.. ते निघाले इतक्यात मी त्याना हाक मारली.. त्यांच्या जवळ जावून त्यांच्या पायाना स्पर्श केला.. त्याना गहिवरून आल होत.. माझ्या डोक्यावर हात ठेउन काहीही न बोलता ते निघून गेले.. त्यानंतर माझे प्रश्न सहज सुटले असही नाही किंवा नंतर आयुष्यात प्रश्न पडलेच नाहीत अस सुद्धा नाही.. पण त्या आजोबानी दिलेल्या आशीर्वादामुळॆ लढायच बळ नक्कीच मिळाल... परिस्थितिकड़े पहायचा माझा दृष्टिकोण बदलला.... अशा घटनामुळॆ कुणीतरी सांगीतलय ते बरयाचदा पटत.... जो होता है, अच्छे के लिए होता है.....

Thursday, April 14, 2011

पहिल काहीतरी..

परवाचा दिवस. as usual... nothing new.. तसही सॉफ्टवेअर इंजीनीअरच्या आयुष्यात नवनवीन bugs सोडले तर नवीन अस जास्त काही घडत नाही. असो.. thats a different story. ऑफिस मधली कामे आटपून घरी पळायच्या तयारीने computer shut down केला. सगळे कृत्रिम tata, bye bye, see u tomorrow संपवून एकदास त्या AC वाळवंटातुन बाहेर पडलो. बाहेर पडताक्षणी गार वारयाची एक झुळूक स्पर्ष करून गेली. गेले २-३ दिवस असच होत होत. त्याची फ़क्त चाहुल लागत होती.. पण त्याचा साक्षात्कार काही होत नव्हता. म्हणून मी त्याचा जास्त विचार न करता बस मध्ये जावून बसलो. Headphones वर गाणी ऐकता ऐकता कधी झोप लागली काही समजलच नाही... कुणीतरी चेहरयाला स्पर्ष केल्यासारख झाल म्हणून डोळे उघडले... "उठ वेडया, झोपलायस काय... तो आलाय" असा निरोप द्यायला पाण्याचा एक थेंब माझ्या चेहर्यावर विसावला होता... खीडकीबाहेर पाहिल तर धगाळलेल वातावरण... हात बाहेर काढले आणि पुन्हा एकदा तो जादुगार भेटीला आल्याच जाणवल.... पहिला पाऊस आला होता.... पुन्हा एकदा.... पहिल काहीतरी.... :)
"पहिल" ह्या शब्दात कमालीच वेडेपण लपलेल असत.. सगळ पहिल अनमोल असत. पहिल्यांदा उच्चारलेला 'आई' हा शब्द.. शाळॆतला पहिला दिवस.. पहिल बक्षिस.. बाबांच्या हातात ठेवलेला पहिला पगार..... पहिल प्रेम.. प्रेमातला पहिला स्पर्ष... सगळ सगळ अप्रतिम.. कोट्यावधी रुपयानी सुधा विकत मिळणार नाही अशी आठवनींची अजब संपत्ती.. पण ह्या सोन्याच्या नाण्याला सुद्धा दूसरी बाजू आहे.. आणि ती म्हणजे हे सगळ आयुष्यात एकदाच अनुभवता येत.. तो क्षण गेला की त्याच्या पाउलखुणा फक्त आठवनींच्या रुपात उरतात... बाकी काहीच उरत नाही... पण एकमेव "पहिल" काहीतरी आहे जे दरवर्षी अनुभवता येत.... आणि प्रत्येक वेळी तितकाच प्रभाव पाडून जात... तो म्हणजे "पहिला पाऊस"....
कानात "कधी तू.. कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात " वाजत होत.. आणि बाहेर पहिला पाऊस.. मला एक सांगा.. इतकी भन्नाट संध्याकाळ असताना आयुष्याच अस्तित्व असण्याच्या दुसरया कुठल्या पावतीची गरज आहे का.. :) परवा पुन्हा तो चमत्कार अनुभवला मी.. कधी एकदा बस मधून बाहेर पडीन अस झाल होत... जस माझ घर जवळ आल तस माझ्या जवळच्या 'मला माझ्या पासून दूर ठेवणारया' वस्तुंची चिंता मला सतावु लागली.. आता त्या "वस्तु" म्हणजे पाकिट, मोबाईल.... पण मनात आल हे सगळ गेल तर परत मिळवता येईल.. पण ह्या वर्षीचा पहिला पाऊस परत नाही येणार.. ते सगळ गुंडाळल रुमालात..
बस थांबली.. मी डोळे मिटूनच बाहेर आलो.. कारण मला माहित होत.. I was going to feel something which I would remember throughout my life.. आणि असे क्षण डोळे मिटूनच अनुभवायचे असतात...
खाली उतरलो.. आणि एखाद्या अफाट सौन्दर्यवतीने आपल्याकड़े हसत एक अप्रतिम नजर टाकावी इतक्या भन्नाट आवेशात तो पाऊस कोसळत होता.. गेल्या वर्षात आलेल अपयश, सतावनारया चिंता, उत्तर नसलेली मानवनिर्मित गणितं... सगळ सगळ भीजताना वाहून गेल.. रस्त्यावरून दिसेल ते वाहत घेवून जाणारया पाण्याने पुन्हा एकदा लढायची जिद्द शिकवली.. मी रुमालात गुंडाळलेल्या निर्जीव वस्तुंसारख्या वस्तु सांभाळत आडोश्याला तोंड वाकड करून उभारलेली मानस बघून थोड हसू आल.. वाटल.. देव पण डोक्याला हात लावून बसला असेल की ह्याना अजुन काय देवू म्हणून.. मी फ़क्त वर पाहून त्याला अनुभवत होतो.. अशा वेळी मनात salary appraisal, traffic problem, EMI, home loan असल काही नाही येत.. मनात असते ती फ़क्त त्या विधात्याच्या असण्याची जाणीव..
यश अपयश कृत्रिम संकल्पना आहेत.. आयुष्य हे फ़क्त आणि फ़क्त क्षणात लपलय.. म्हणुनच खुप जुना मित्र आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटल्यावर मीठी मारताना जे पाणी डोळ्यात येत ते महिन्याच्या शेवटच्या दिवशी salary deposit चा sms वाचून नाही येत.. दर वर्षीचा पाऊस अस काहीतरी अनमोल देवून जातो.. यंदाचाही पहिला पाऊस मला नको असलेल सगळ घेवून गेला.. आणि देवून गेला एक नवी उमेद !!!

Wednesday, March 2, 2011

प्रेम म्हणजे... ???


माणूस आणि प्रेम यांच तस खुपच जवळच नात. 'मी दारु पीत नाही' हे वाक्य एक वेळ पटु शकेल पण 'मी आज पर्यंत बाटलीकड़े कधी पहिलेही नाही' हे वाक्य साफ़ खोट. अगदी तसच 'मी कधी प्रेमात जास्त गुंतलो नाही' हे एक वेळ बरोबर असेल पण 'मी आज पर्यंत कधी कुणाच्या प्रेमात पडलोच नाही' हे अशक्य. प्रत्येकाला कधी ना कधी कुणाची ना कुणाची नजर चटका लावून गेलेलीच असते... काहीजन मान्य करतात तर काही खोट बोलून रिकामे होतात इतकाच काय तो फरक.. बर असो.. पण प्रेमासारखी दूसरी अद्भुत भावना कुठलीच नाही... free of cost जर तुम्हाला 'आयुष्य' ह्या संकल्पनेचा खरा अर्थ समजावून सांगणारा demo अनुभवायचा असेल तर कुनाचेतारी डोळे वाचायचा हळूच प्रयत्न करा.. त्यानंतर तुमच्यात जो काही बदल घडेल त्यावर तुमचा स्वताहाचा देखील विश्वास बसणार नाही..... पण एक प्रश्न असा आहे ज्याची कितीही उत्तरे मिळाली तरी मला तो प्रश्न अनुत्तरितच वाटतो.. 'हे प्रेम म्हणजे नक्की काय असत?'
तो आणि ती एकाच कॅालेज मध्ये.... एकमेकांचे खुपच छान friends... तासन तास गप्पा मारत बसतात.. एकमेकांच्या मनातल सगळ शेअर करतात.. सगळ्या कॅालेजमध्ये ह्यांच काहीतरी चालु आहे अशी चर्चा.. पण त्याची ह्या दोघांनाही फिकिर नाही.. ते दोघेही आपल्या नात्याल्या 'खुप छान मैत्री' असे काहीतरी नाव देवून रिकामे झालेत... बस ने जाता येत असुनही गप्पा मारता येतात म्हणून रोज ते दोघे चालत कॅालेजला जातात.. पण चालन तब्येतीला चांगल असत हे त्यामागच कारण आहे असे दोघेही एकमेकाना सांगतात... एकदा रस्ता ओलांडताना तो दोन पाउले पुढे गेला अन गाडी येत असलेली पाहून ती तिथेच थांबली.. ती आपल्या बरोबर नाहीये हे पाहून तो कावरा बावरा झाला आणि त्याच्याही नकळत दोन पावुले मागे गेला.. ती त्याचा चेहरा पाहून खुदकन हसली आणी म्हणाली 'तू का परत आलास?' तो निशब्द होवून तिच्या हसरया चहर्याकडे पाहत राहिला... ती सोबत असावी म्हणून त्याच मागे परतन आणि तो आपल्यासाठी परत आल्याच पाहून तिला मनातल्या मनात आनंद होन म्हणजे प्रेम काय हो?
संध्याकाळची वेळ.... तो आणी ती कॅाफी हाउस मध्ये बसलेत.. दोघेही एक मेकांची नजर चुकवत कुठेही इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न करत आहेत.. खर तर त्याच आणि तीच एकमेकांवर अफाट प्रेम.. पण काही दिवसांपूर्वी जोराच भांडण झालय.. तेव्हा पासून अबोला आहे.. भांडणापूर्वी आजच्या दिवशी इथे भेटायच ठरल होत म्हणून दोघेही न चुकता आलेत ... पण आधी बोलणार कोण... त्याला मनात वाटते दर वेळी मीच काही चुक नसली तरी पहिला बोलतो पण आता मी नाही बोलणार अन ती मनातल्या मनात म्हणते किती हा ego , sorry शब्द म्हणायला इतका का वेळ लावावा एखाद्याने..... काही केल्या अबोला संपेना.. वेटर आला.. तो वेटरला म्हणाला, 'दो कॅाफी लाओ, और वेगवेगळॆ बिल्स लाओ' ती गालातल्या गालात हसली.. ती हसलेली पाहून त्याची नजर तिच्या नजरेत पडली आणि तिला हसू आवरता आवरेना... अन ती हसलेली पाहून त्याला जग जिंकल्याचा feel आला.. 'चिडके, हसताना इतकी छान दिसतेस तर मग कशाला उगाच फुगतेस माझ्यावर'... हसता हसता तिने त्याचा हात हातात घेतला.. डोळे मिटून त्याचा हात आपल्या गालाला लावत म्हणाली, ' नको अस करू कधी.. मला खुप एकट वाटत तू नसलास की'.. त्यालाही गहिवरून आल.. पण तिला पुन्हा हसवन्यासाठी तो म्हणाला,' तू भांडणानंतर माझा हात असा पकड़नार असशील तर मग मी का भांडू नये'.. वेटर आला.. तो त्याला thanks म्हणून हसत म्हणाला.. ' एकच बिल आन रे भाऊ'.... चुक कुणाची हे विसरून दोघानी एकमेकांचा हात पकड़न म्हणजे प्रेम काय हो?
तो आणि ती best friends ... अगदी बालपनापासून एकत्र आहेत.. अनेक सुख दुखाच्या क्षणात एकमेकाना साथ दिले.. एक मेकांचे birthdays न विसरता दर वर्षी celebrate करतात.. मनातल खोलवरच फ़क्त एकामेकानाच सांगतात .. पण तरी फ़क्त आणी फ़क्त best friends ... तिचा एके दिवशी त्याला फोन आला.. लगेच भेटायला ये.. खुपच urgent आहे.. तो कसलाही विचार न करता तिच्या हाकेला साद देत भेटायला गेला.. तिने त्याला पाहिल्या पाहिल्या मीठी मारली .. 'माझ्या स्वप्नांचा राजकुमार मला भेटला '... तिच्या त्या एका वाक्याने त्याच्या मनावर वीज कोसळल्याच्या वेदना झाल्या... हे असे का होतय हे त्याच त्यालाच समजेना.. तरी हे वादळ लपवत तो हसत congrats म्हणाला.. 'ह्या weekend ला तू माझ्या बरोबर लग्नाच्या shopping ला यायच आहेस.. मला कारण नकोयत.. माझी choice तुझ्या पेक्षा अजुन चांगली कुणाला समजणार वेड्या' .... तिचा एकेक शब्द त्याच्या मनाच्या चिंधड्या करत होता .. 'see you on weekend' म्हणून ती हसत हसत निघून गेली.. ह्याच्या मात्र डोळ्यातून त्याच्या नकळत दोन थेंब हळूच बाहेर आले.. तो एकटाच तिच्या पाठमोर्या आकृतीकड़े बघत तिला जाताना बघत राहिला.. तिच्या डोळ्यातला आनंद पाहून स्वताहाचे अश्रु तिच्या पासून लपवत त्याच तिला जावू देण म्हणजे प्रेम काय हो?
तो आणी ती लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.. जुने मित्र मंडळी जमलेत.. दोघांच्याही डोळ्यात समाधानाची छटा आहे.. गेल्या २५ वर्षातले सगळे क्षण दोघांच्याही नजरे समोर येत आहेत.. काही सुखाचे, काही दुःखाचे.. एखाद्या लाटे प्रमाने येवून थडकत आहेत.. मित्र मंडळी तीला गाणे म्हणायची विनंती करतात.. ती हलकेच डोळ्याने त्याची परवानगी मागते.. तो थोडस हसत डोळ्यानीच तिला परवानगी देतो..
'एक प्यार का नगमा है, मौजोंकी रवानी है,
जिंदगी और कुछ भी नही.. तेरी मेरी कहानी है.....'
म्हणता म्हणता तिला अश्रु अनावर होतात.. त्याचेही डोळे पाणावतात.. २५ वर्षांच्या अविरत प्रवासानंतर एकमेकांचे डोळे वाचायची जादू दोघांमध्येही कायम असन म्हणजे प्रेम काय हो?
अशा अनेक क्षणांमधून प्रेम नावाच्या अनमोल भावनेचा साक्षात्कार तुम्ही देखील पाहीला किंवा अनुभवला असेलच.. पण खर सांगू का.. एक प्रश्न अजुनही आहे ज्याची कितीही उत्तरे मिळाली तरी मला तो अनुत्तरितच वाटतो.. 'हे प्रेम म्हणजे नक्की काय असत?'

Saturday, February 12, 2011

जाने क्या चाहे मन.. बावरा...

'आज मन लागत नाहिये यार'... 'मनाला कोण समजावनार'.... 'माझ मन तिच्यात गुंतलय' ... बाप रे. मन मन आणि नुसत मन. गोंधळ घातलाय ह्या मनाने सगळीकड़े.. एक दिवस ठरवल, थोड़ा वेळ काढून ह्या मनाला एकट गाठून जाब विचारायचा... बस झाले ह्याचे नखरे. खुप खुप प्रयत्न केल्यावर शेवटी माझ्या तावडीत सापडल.. घट्ट पकडून हाता पायाला दोरयाने बांधून मी त्याला समोर बसवल... अन सुरु झाली एक कहानी.. कहानी एक पण कलाकार दोन... एक मी अन माझ मन !!!!!
हुबेहूब माझ्यासारखा चेहरा, पण डोळ्यात आकाशा इतका अफाट आत्मविश्वास... चेहर्यावर कोणत्याही प्रश्नाच सहज उत्तर देइन अशी गुर्मी... कुणालाही घाबरत नसल्याचा अविर्भाव !! थोडा वेळ एकमेकांच निरिक्षण केल्या नंतर मीच विचारल... 'अरे मना, हा काय खेळ मांडला आहेस तू.. किती वेळा सांभाळुन घ्यायच तुला, बस कर हे पोरखेळ आता.. सगळ सुरळीत चालु असताना मध्येच तुला काहीतरी विचित्र सुचत असत.. Be Practical यार... अरे खुप साधी straight forward system तयार केले आम्ही... moday to friday काम आणी बाकीचा वेळ आराम.. पैसा कमावायचा, घर घ्यायच, मग लग्न, बायको मूल.. परवडली तर एखादी कार.. बस ना मित्रा अजुन हवच काय.. पण साला तू problems add करतोस... मध्येच कुणाच्या तरी आठवनीने हैरान होतोस.. कुठेतरी एकटाच भटकायला जातोस.. उगाचच विनाकारण उदास होतोस.. बस कर यार हे सगळ.. फ़क्त मीच नाही तर संपूर्ण मनुष्य जात तुमच्या community वर वैतागली आहे.......' ऐकता ऐकता मध्येच मला थांबवून माझ मन म्हणाल, 'तुला आठवतय, लहानपणी एकदा पावसाच्या पाण्यात तू पहिल्यांदा कागदाची होडी बनवून सोडली होतीस.. आकाश ठेंगन झाल होत तुज ती तरंगत जात असलेली पाहताना.. आठवतय?' मी हसून म्हणालो 'हो, ते कस काय विसरीन मी'...... 'नाही विसरलास ना... कारण ती होडी बनवायला मी तुला संगितल होत.. तेव्हा तू माझ सगळ ऐकायचास.. खुप जवळ होतास तू माझ्या... ' मी विचारत पडलो.. काय बोलावे समजेना.. जाब मी विचारणार होतो पण व्यथा त्याच्याच होत्या.
थोड़ा आवाज वाढवून मला म्हणाल 'अरे वेड्या, ह्या तुझ्या so called straight forward system मध्ये तू हरवून गेला आहेस... ती होडी वाहत गेली तसाच तुही जात आहेस.. दिशाहीन प्रवासावर.. तेव्हा पडायचा अगदी तसाच पाउस परवा सुधा पडला.. पहिला पाउस.. आ हा.. मला स्पर्श करणारा पावसाचा तो पहिला थेंब.. मी ओरडून सांगत होतो तुला आतून की सोड ती गाडी बाजुला.. उभा राहा.. पसरव तुझे हात.. अन घॆ ते थेंब डोळ्यावर.. त्या क्षणात आयुष्य लपल होत यार.. पण तू नाही ऐकल माझ.. होर्न वाजवत उभा राहिलास वैतागुन.. ' मला काय बोलावे समजेना... पण बोलायच थांबेल ते मन कसल..
'आन्द्या, सच्या, संत्या ची जागा ऑफिस मधल्या Mr. आनंद, Mr.सचिन आणि Mr. संतोष ने घॆतले.. शिवी देवून हाक मारणारी ती आत्मीयता कुठेतरी हरवून आलायस तू.. किती वेळा संगितल तुला की कर फोन त्या वेड्या मित्राना, जा भेटायला अचानक आणी मार एक जोरदार मीठी.. सांग त्याना की तू त्याना फार मिस करतोस ते.. अन बघ तेव्हा त्यांच्या डोळ्यात... त्यांचीही मन ह्याचीच वाट बघत असतील... मार एकदा ऑफिस ला सुट्टी आणि जा कुठेतरी long drive वर त्यांच्या बरोबर...
बाबाना हळूच एकदा टपरीवर घेवून जा.. दोन कट्टिंग ची ऑर्डर दे आणि बाबाना सांग की आज पर्यंत सगळ्या best friends बरोबर कट्टिंग शेयर केला पण better than best राहुनच गेला होता.. अन बघ तेव्हा त्यांच्या डोळ्यात...
एक दिवस पहाटे लवकर उठून आई साठी नाश्ता बनव आणी तिला देवून सांग की आई, तुला तुझ्याच नजरेतून पहायचा हा माझा छोटा प्रयत्न.. अन बघ तेव्हा तिच्या डोळ्यात..
रोजच्या scheduld मधून थोडासा वेळ काढून एकदा अर्धा तास उभा राहून सूर्यास्त बघ... त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मार... त्याच्याही मनाला बर वाटेल...
मला आणि ह्या सर्वांच्या मनाला तुझ्या so called straight forward system मधले packages नको आहेत रे.. आम्हाला फ़क्त आमच्या हाकेला तुझी मनमुराद साद हवी आहे.... हे सगळ सांग तुझ्या मनुष्य community ला... मन हरवलेली नाहीत रे मित्रा... माणुस हरवलाय...'
मी निशब्द होवून माझ्याच मनाच ऐकत उभा होतो.... कित्येक प्रश्न रोज पडत असतात.. अन त्यांची उत्तर मला माझ्याच मनात उलगडली...
मला गंभीर पाहून थोड्या तिरकस नजरेने माझ्याकडे पाहत मला म्हणाल,' अजुन एक महत्वाच... तुझी ती close friend त्या दिवशी लाल साडी मध्ये खुप छान दिसत होती ना.. मग तस बोलला का नाहीस तिला...' मी हबकलो.. ह्या साल्याला हे कुठून समजल.. मग आठवल हे तर आपलच मन आहे.. गंभीर विषयांची जागा गुलाबी विषयाने घेतली होती.. मी त्याला बजावल 'हे बघ मना, ह्या matter पासून तू दूर राहा.. बाकी सगळ पटलय मला तुझ.. पण इथे नेमक तुझ घोड़ मार खात.. अरे किती चेहर्या मध्ये शोधत असतोस तू "ती" ला... कोण आहे तरी कोण तुझी स्वप्नसुंदरी.. प्रत्येक रोमांटिक गाण्याबरोबर तिची आठवण काढत असतोस... मला एखाद print out दे तिच्या चहर्याच.. नाव गाव...काहीही माहित असेल तर सांग.. मी search मारतो.. एकापेक्षा एक भन्नाट search engines आहेत आमच्याकडे... ही हुरहुर थांबव आता'.............
माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसल... हाता पायाला बांधलेले दोर आपोआप हळुवार निसटले.... मी वेडा इतका वेळ समजत होतो की मी त्याला बांधून ठेवल होत.. पण मनच ते.. त्याला कोण कस बांधणार.. त्याने मला घट्ट मीठी मारली.. बरयाच दिवसानी कुणीतरी "आपल" मीठीत आल्यासारख वाटल... खुप बर वाटल.. पण भानावर येवून मी विचारल.. सांग.. कोण आहे ती.... तर english इस्टाईल मध्ये हळूच माझ्या कानात म्हणाल... "Some feelings are better to be just feeled than expressed" ....... अन भुरकन उडून गेल..मी एकटाच हसत त्या स्वच्छंदी मनाला उडताना पाहत उभा होतो.. रोज पाहतो तसा... !!!

Friday, January 28, 2011

मैफील

15 सप्टेंबर 2002 .... इंजीनीरिंग करायच्या निमित्ताने मी पुण्यात आलो.. लहान वयात इतक मोठ शहर मी पहिल्यांदाच पाहात होतो.. मोठ मोठे रस्ते, अफाट गर्दी, उंच उंच इमारती पाहून मन जितक उड्या मारत होत तितकच घाबरल सुद्धा होत. हॉस्टल मध्ये प्रवेश घेतल्यावर काही दिवसातच नवीन मित्रांची मैफील जमली. मित्रांच जग म्हणजे अद्भुत जग..तिथे प्रत्येक जन खर्या अर्थाने स्वताहाला जगत असतो.. बंधन,नियम, चालीरीती सगळ सगळ तडीपार केलेल मन ते तिथेच मिळत.. आणि त्याच स्वप्नवत जगात मला तो भेटला.. माझा एक मित्र..
"First impression is last impression " अस म्हणतात. पण मला नाही पटत.. त्याच्याही बाबतीत तसच झाल. पहिल्या भेटीत अबोल आणि reserved minded वाटलेला नंतर हळुहळु उलगडत गेला. कदाचीत ह्यालाच हे जग मैत्री म्हणत.. मस्त ग्रुप बनला होता आम्हा मित्रांचा. नुसता दंगा, मस्ती अन जोडीला बेधुंदी.. तारुण्याची दूसरी व्याख्या तरी कुठली.. एकापेक्षा एक नमूने एकत्र आले होते. टपरीवर रोज मस्त गप्पा रंगत होत्या.. आमच्या ग्रुप मध्ये क्रिकेट ची खुप खुप आवड तशी फ़क्त मला आणि त्यालाच होती.. त्यामुळे क्रिकेट ची मॅच असली की तो आणि मी २-२ तास टपरीवरच्या टीवी समोर पडीक असायचो.. १ कटिंग दोघेजन २ तास पुरवायचो.. फोर मारली की टाळी देण, विकेट पडली की शिव्या देण.. अन मॅच हरता हरता जिंकली की आनंदाने मिठी मारण.. ह्या सगळ्यात backlog subjects विसरून जायचो आम्ही..
तो स्वभावाने हळवा.. हसत हसत डोळ्यातल पाणी लपवनारा.. अन अश्रु जमलेल्या डोळ्याना हसवणारा. घरची परिस्थिती बेताची.. वाईट दिवसात फ़क्त एक वेळ जेवलेल पाहिलय मी त्याला. मन भिरभिरायच ते सगळ पाहून. पण ती वेळच जिद्दी होती अन तो त्याहुनही जास्त. BE च्या तिसरया वर्षात असताना एक अपघातात त्याचा पाय दुखावला होता.. त्यामुळॆ त्याचे तीन विषय राहिले. लहान मुला सारखा खांद्यावर मान ठेवून रडला.... पण पुन्हा भरारी घेत त्या वर्षी फर्स्ट क्लास पटकावला त्याने.. त्याच्या नकळत बराच काही शिकत गेलो मी त्याच्या कडून.. उत्कृष्ट स्वयंपाकी, खुप छान मिमिकरी करणारा, नाटकात अभिनय करणारा अशी अनेक रूपे त्याची..
हसत खेळत आम्ही सगळे इंजिनियर झालो.. अनेक आव्हाने साद घालत होती.. त्यालाही जॉब ची अत्यंत गरज होती.. ६ महीने अफाट struggle केल्यावर एके दिवशी पळत पळत त्याने मला मिठी मारली.. आणि कानात "जिंकलो" अस म्हणाला.. आजही ते शब्द जसेच्या तसे आहेत.. त्या दिवशी मला celebration ह्या शब्दाचा अर्थ गवसला..
नंतरची काही वर्ष मस्त मजेत गेली.. एकेक डोंगर पार करत आम्ही झेंडे फडकावत चाललो होतो..टू व्हीलर घेतल्यावर पहिल्यांदा मला भेटायला आला.. मस्त राईड मारून आम्ही काफ्फी चा आस्वाद घेतला.. जुने दिवस आठवत एक मेकांची मस्करी करत दिवस मजेत जात होते.. आयुष्याने रंग बदलले होते.. आता जग आपल आहे अशा आवेशात जगत होतो आम्ही..
5 ऑगस्ट 2008 ... सकाळी 10.30 ला ऑफिस समोर पोहोच ल्यावर मी माझा मोबाइल पहिला तर 16 मिसकॉल्स.. मी callback केल्यावर बातमी समजली की तो एका रोड अपघातात आम्हाला सोडून गेला.. पायाखालची जमीन सरकली.. डोक सुन्न झाल.. पुढचे 5 -10 मीनीट मी सर्वस्व हरवल्यासारख रस्त्यावर उभा होतो..सगळ डोळ्यासमोर आल.. तो परत कधीच भेटणार नाही हे मनाला काही केल्या पटेना.. आजही नाही पटत.. त्याच्या अंत्य दर्शनाला ढसाढसा रडलो आम्ही.. देवाचा मला इतका राग कधीच नाही आला जितका त्यादिवशी आला होता.. सगळ एक क्षणात संपल.. आम्ही हतबल होवून पाहत राहिलो.. त्या दिवसापासून मनात एकाच प्रश्न सदैव पडतो.. त्याच काय चुकल होत?? आणि उत्तर त्या विधात्याकड़ेही नाहीये..
आजही क्षणोक्षणी त्याची आठवण येत असते.. मित्रांच्या मैफीलीत गप्पा रंगल्या की त्याचा उल्लेख आणि डोळ्यात पाणी हे आता ठरलेल.. मन उदास झाल की मग रंगतात त्याच्याशी गप्पा.. तो नाही बोलत.. फ़क्त ऐकतो.. विनोदाना टाळी देतो.. यातनाना डोळ्यात पाणी आणून सांत्वन करतो. माणस दूर नाही जात कधी.. ती सदैव असतात बरोबर.. आठवनींच्या रूपात.. खुप वाटत की स्वर्ग असावा.. इथला प्रवास संपल्यावर त्याची पुन्हा तिथे भेट व्हावी.. पुन्हा एकदा मैफील जमावी.. त्याची अन माझी...