Thursday, September 8, 2016

किनारा


त्या दिवशी पहाटे ५ वाजता उठलो. पुण्यातून कोल्हापूर गाठायचं होत आणि कारमधून मी एकटाच जाणार होतो. उठल्यापासून दिवस वेगळा आहे हे जाणवत होत. माझं आयुष्यातलं सर्वात मोठं प्रमोशन होणार होत त्या दिवशी. मी सहसा देवाच्या मूर्तीच्या पाया पडत नाही पण त्या दिवशी देवाच्या पायावर डोकं ठेवलं. सगळं सुरळीत पार पडू दे म्हणालो आणि पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने बाहेर पडलो. माझं पूर्ण लक्ष मोबाईलकडेच होत.. तासाभराचं अंतर पार केल्यावर मोबाईल वाजला... गाडी बाजूला घेऊन उचलला... माझे सासरे म्हणाले.. मुलगी झाली... कधी एकदा बाहेर पडतोय म्हणून वाट पाहत बसलेले आनंदाश्रू कधी बाहेर आले माझं मलाच नाही समजलं... 24 ऑगस्ट 2016 ला मी एका सुंदर छकुलीचा बाबा झालो. पहिल्यांदा बाबाना फोन लावला आणि म्हणालो, बाबा आपल्या घरी परी आली... 
शास्रज्ञानी एवढे भले भले शोध लावलेत पण आनंदाश्रुंसाठी वाईपर बनवता नाही आलेला त्यांना अजून. डोळे पुसत पुसत कसा बसा मी कोल्हापूरला पोहोचलो. धावत पळत हॉस्पीटल मध्ये गेलो. माझी छकुली माझ्या बहिणीच्या मांडीवर शांतपणे झोपली होती.  गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या लग्नात भावनांना आवर घालायचा खूप प्रयत्न करून सुद्धा मी ढसा ढसा रडलो होतो. तिच्या खुशीत माझ्या मुलीला बघून वाटलं माझी बहीण माझ्या मुलीच्या रूपात हक्काने माझ्या घरी परत आली. माझ्या मुलीच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवला आणि 'गर्भ'श्रीमंती शब्दाचा अर्थ कळाला..... मनापासून विधात्याला साष्टांग नमस्कार केला... बायकोला भेटून म्हणालो, आपली परी खूपच सुंदर आहे... ते ऐकून बायकोनेही डोळ्यात साठलेल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली...
हॉस्पीटलच्या रूममध्ये नातेवाईकांची फुल गर्दी झाली होती... एक जन्म आणि कित्येक नवीन नाती... बरीच नाती कित्येक वर्षांनी भेटली... जूने-पुराणे मतभेद विसरून सगळे एकमेकांना आनंदाने भेटत होते... घरातलं वातावरण पूर्ण बदलून जातं एक नवीन पाहुण्यामुळे... माझ्या परीने डोळे उघडायच्या आधीच माझ्या आयुष्यातले बहुतांश प्रश्न सोडवले...

आयुष्यात प्रत्येक फेज मी मनापासून जगलोय.. अगदी जस हवं तसं... शिक्षण, नोकरी, हक्काचा पैसा, गाडी, घर... सगळं मला हवं तसं केलं...  महासागराच्या लाटेवर स्वार होण्यासारखा काळ असतो तो सगळा... बिनदास्त जगणं... लाट जिकडे नेईल तिकडे बिनादिक्कत जाणं.. खूप मजा येते.. पण "अजून हवय" ची भूक त्या लाटा कधी भागवू शकत नाहीत... ऊंच लाटा अंगावर स्वातंत्र्याचे शहारे देऊ शकतात पण शांत झोप नाही देऊ शकत... शांत झोप फक्त किनाऱ्यावरच... माझ्या मुलीच्या पहिल्यांदा उघडलेल्या डोळ्यात मला माझ्या आयुष्याचा किनारा दिसला... आता मला कशाचाही मोह नाही... कमावणं, गमवण हे सगळं गौण वाटायला लागलंय .. 
माझ्या मुलीने माझ्याकडे बघून हसावं आणि मी तिला कुशीत घेऊन आयुष्याच्या किनाऱ्यावर लाटांकडे बघत शांतपणे झोपावं.. माझ्यासाठी आता आयुष्याची हीच व्याख्या झालीय..              

Monday, December 7, 2015

देव भेटला राव !!!


मध्यंतरी मंदिरात जायचा योग आला. हो.. "योग" च म्हणावा लागेल कारण मला स्वतःहून मंदिरात  जायची कधी वेळ येतंच नाही. "देव सगळीकडे आहे" हा साधा सोपा नियम आहे आपला. लहानपणी आई चा हात सोडायची भिती वाटायची म्हणून ती चालली की मंदिरात जायचो आणि आता "मंदिरात चला" अशी विनंती(?) ऐकू आली की "देव फक्त मंदिरातच भेटतो का" अस मी विचारल्यावर बायको एका विशिष्ट नजरेने पाहते आणि त्यानंतर जावच लागत.
मंदिराच्या आवारात पोहोचलो. कार पार्क करण्यासाठी पावती फाडायला एकटा आला. तीस रुपये द्या. 'मंदिर आहे चिडायचं नाही' ह्या नियमाच पालन करून मी मुकाट्याने पैसे दिले. तो म्हणाला…"दर्शन घेवून या  नंतर पावती देतो"..  मग मात्र आपली सटकली... तीस रुपयात काय काय येत हे ऐकवून, त्याला तीन चार कोल्हापुरी शिव्या देवून (मनातल्या मनात बर का..) पावती घेवूनच मी निघालो.   आत जाता जाता देवाच साहित्य विकणारे मागे लागले... त्या देवाच्या दर्शनाला जाताना ते घेवून जावच लागतं वैगेरे वैगेरे सांगणारे… बायकोची इच्छा म्हणून मी ते नाईलाजाने घेवून मंदिरात प्रवेश केला…. भली मोठी रांग आमची वाट पाहत उभी होती…. मेन रांग बायपास करायची असेल तर VIP रांग … पैसे देवून बर का…   बर एवढी पण तुमची ऐपत नसेल तर फक्त मुखदर्शनचा सुधा पर्याय होता… जे लांबून आले होते ते "रिकामं जायचच नाही" म्हणून मेन रांगेत उभे होते… VIP तून गेलो तर 'देवाला वाईट वाटेल  ना' हे पण त्यांच एक कारण होतच… जवळपास सगळ्याच्या चेहऱ्यावर एकंच यक्ष प्रश्न… "देवा, मीच का...  सगळे प्रश्न माझ्याच वाट्याला का?"  रोजच्या रोज त्या मंदिरात येवू शकणारे मुखदर्शन घेवून जात होते… परत येताना उलट चालत येत होते… देवाकडे पाठ करायची नसते म्हणे… म्हणजे परत येताना ह्यांच्या फक्त समोर देव असतो का? पाठीमागे देव नसतो का? मला पडलेला निष्पाप प्रश्न…. असो.. मेन रांगेत उभं राहून देवाच्या समोर यायचा योग आला.. वाटलं आता अद्भुत वाटेल... चक्क देव समोर… तेवढ्यात बाजूने दुसर्या भक्ताने धक्का देवून आणि  समोरून देवाच्या स्वयंघोषित एजंटने "पुढे चला" ची डरकाळी देत मला चक्क ढकललं राव… मी आपल तेवढ्यात "देवा, ह्या सगळ्यांना माफ  कर रे" म्हणत गर्दीच्या कृपेने आपोआप बाहेर आलो…
आमचं देवदर्शन झालं..
मी जेव्हा जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा मनशांती मिळन तर दूरच पण लोकांना देव समजलाच नाही ह्या विचाराने हैराण व्ह्यायला होत. बर कुणाला समजावून सांगाव की बाबानो तुम्ही जे करताय ते देवाला नकोय रे… तर नास्तिक म्हणून रिकामे होतात. मी देवाला प्रचंड मानतो… देव कुठे ना कुठेतरी नक्की आहे. कारण साधं सरळ आहे… जिथे creation असते तिथे त्याच्या creator असतोच… हे अद्भुत जग बनलय म्हणजे हे बनवणार कोण ना कोण तर नक्कीच आहे…आणि तो श्रुष्टीतल्या कणाकणांत आहे…त्याच्या मर्जीशिवाय इथल झाडाच पान सुद्धा हलत नाही..  त्याला कुठलंही नाव न देता फक्त देव म्हणून राहाण इतक कठीण नाहीये… पण त्याला नाव देवून अनेकांनी दुकाने थाटलेत.. आणि माझाच देव भारी म्हणून भांडत बसलेत.. अनेकांनी त्या देवाला मानवनिर्मित नियमांनी जखडून ठेवलय.. अमुक अमुक देवाला ह्याचा नैवेद्य दाखवावाच लागतो.. अमुक अमुक देवासमोर स्त्रीने जायचं नसत.. अरे प्रत्येक मनुष्याला जन्म घ्यायला ज्या स्त्री च्या पोटाचाच आधार घ्यावा लागतो अशा पवित्र स्त्रीला ज्या देवाने बनवलं तो तिलाच का टाळेल… असो… असे अनेक विचार करत करत मंदिराबाहेर आलो…
बाहेर बसलेल्या एका शेतकऱ्याकडून थोडी फळ विकत घेतली… कारकडे जाता जाता एक भिकारी मुलगी जवळ येवून भीक मागू लागली… मनाला टोचल्यासारख झालं… डोळ्यात भुकेचा वाळवंट साचला होता तिच्या.  मागे वळून देव शोधणाऱ्या रांगेकडे एक नजर टाकली… ओरडून सांगावस वाटलं अरे देव आत नाहीये रे.. पण नास्तिकतेचा शिक्का बसेल म्हणून परत शांत झालो… एक सफरचंद त्या मुलीच्या हातावर ठेवलं… देव शोधानारयांच्या गर्दीत एक माणूस असण्याचं कर्तव्य मी पार पाडलं… अनपेक्षित पने भुकेलेल्या पोटाला खायला मिळाल्याचा आनंत त्या गरीब मुलीच्या पाणावलेल्या डोळ्यात ओसंडून वाहत होता… मंदिरात इतक आत्मिक समाधान मिळेल ह्याची अपेक्षा सुधा नव्हती केली मी… सफरचंद खात खात कुठेतरी देवाच्या असण्याचा विश्वास त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता… तिच्या चेहऱ्यावरचा तो विश्वासाने भरलेला आनंद पाहून मला देव भेटला राव !!!      

Friday, June 28, 2013

फिस्ट


ऑफिस मध्ये काम करत असताना minimize केलेला आणि continuous refresh होणारा window माझ मन विचलीत करण्यात मग्न होता. भारताची match चालू होती त्यामुळे काही केल्या माझ मन कामात लागत नव्हत. सारख वाटत होत की साला कुछ तो गलत हो रहा है… सगळच मरु दे म्हंटल आणि गाशा गुंडाळून गाडीचे gear पटापट बदलत , आजूबाजूच्या गाडीवाल्याना शिव्या घालत घर गाठलं आणि Star Cricket लावलं तेव्हा कुठे जरा बर वाटलं. माझ्या क्रिकेट वेडे पणाला "विक्षिप्तपणा " म्हणून हिनवनारी माझी अर्धांगिनीसुद्धा त्या दिवशी कामानिमित्त परगावी गेली होती त्यामुळे तर माझी गाडी हवेत उडतच TV समोर येवून park झाली होती. मी , एकांत आणि क्रिकेट match.... आहाहा सुवर्णयोगच तो !!! माझी बायको सारखी विचारात असते मला की एवढ काय आवडत तुला त्या खेळातल… आता कस सांगू तिला की काय आवडत ते माहित नाही पण जब भी देखता हु लगता है के साला जिंदा हु….
असो… मस्त खेळत भारताने भन्नाट विजय नोंदवला …. मूड बनवून टाकला धोन्याच्या टीमने…. वाटलं चलो आज कुछ तुफानी करते है…. मस्त जेवण बनवूया.. म्हणजे बनवायचा try तरी करुया… पण बायकोने फोन वर (तंबी देवून) सांगितलं होत की आज please hotel मधून parcel आणून खा (म्हणजेच किचन मध्ये लुडबुड करू नकोस, जेवण बनवणे हे Computer च्या keyboard वर बोटं बडवत बसण्याइतक सोप काम नाहीये) . लग्न होईपर्यंत मला (वेड्या पामराला) वाटायचं की एका वाक्याला फक्त एकच अर्थ असतो. पण कंसातल्या वाक्याचा अर्थ सुद्धा जोडलेला असतो हे अनेक टोमन्यांचां मारा झाल्यावर उमगल . ;) पण भारताने match जिंकली होती म्हणुन त्याच जोशचा वापर करून मी माझ्या पत्नीला माझा निर्णय कळवला. ती घरी नसल्यामुळे माझा निर्णय मान्य करण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच उरला नाही. फोन वरून सगळी रेसिपी तिने मला समजावून सांगितली आणि आयुष्यातली पहिली डिश मी बनवली … सुदैवानॆ ती खाण्यालायक सुद्धा बनली होती :) match जिंकली म्हणून मी खुश आणि मला किचन मधल काहीतरी जमल म्हणून बायको खुश… :)
चपात्या बनवण आपल्याला बाप जन्मात जमणार नाहीये हे माहित होत म्हणून गाडीवरून चपात्या आणायला मी बाहेर पडलो. जाताना किराणा मालाच दुकान दिसलं…. वाटलं आम्रखंड किंवा श्रीखंड घ्याव … परत येताना घेवू असा विचार करून तसाच पुढे गेलो . एक हॉटेल दिसलं… हॉटेल आहे की नुसतेच टेबल मांडलेत ते समजेना… आत जावूनच पहाव म्हणून शिरलो आत… आत गेलो आणि जुण पुराण काहीतरी आठवल्यासारख झाल…लांबसडक आकाराचे मांडलेले टेबल्स… त्यावर खरकट्याचे डाग असलेली अंथरलेली कापडं…. उंचीवर ठेवलेला अन ज्यात Score दिसण शक्यच नाही इवलासा TV…. वरण समजून डाळ शोधत पिवळ पाणी पीत एकमेकांची चेष्टा करत, match बद्दल गप्पा मारत बसलेली तिथली मुल..... आईच्या हातच स्वर्गसुखी जेवण त्या बेचव ताटात शोधत मित्रांमध्ये हरवलेल्या त्या मुलांमध्ये मी सुद्धा होतो एके काळी..... counter वर एक काकू हिशेब करत बसल्या होत्या... मी म्हंटल काकू तीन चपात्या हव्या आहेत..... त्यांनी लगेच काम करणाऱ्या मुलाला चपात्या आणायला पाठवून दिल…. मी सहज म्हणून विचारलं…. "काकू ही मेस आहे का हो?" … "हो, 60 मेंबर्स आहेत…" त्यानी मला मेसचा रेट आणि मुलांची लिस्ट सुद्धा दाखवली … बहुतेक त्यांना वाटलं होत की मला मेस लावायची आहे … इतक्यात त्या पोराने चपात्या आणून दिल्या … पण मला तिथे थोडा वेळ थांबावस वाटत होत म्हणून मी उगाचच त्या लिस्टकडे पाहत बसलो … "मेस मध्ये जेवण unlimited असत ना हो ??" … "हो , पण स्वीट डिश लिमिटेड असते" ..... "आणि काकू फिस्ट कधी असत हो ??" खर सांगतो… फिस्ट हा शब्द माझ्या तोंडात कसा आला हे माझ मला सुद्धा समजल नाही… मेस सोडल्या पासून जवळपास विसरुन गेलो होतो हा शब्द… असच असत ह्या आठवणींच …म्हणूनच त्यांच्या उलगडत जाण्यामागच्या प्रक्रीयेमागच गुपित कुठल्याच शास्त्रज्ञाला नाही उमगल आजपर्यंत…. काकू म्हणाल्या "फिस्ट रविवारी असत … जिलेबी , श्रीखंड किंवा खीर आणि संध्याकाळी मेसला सुट्टी "...... बर ठीक आहे म्हणून कसा बसा मी तिथून बाहेर आलो … पण पाठलाग सोडतील त्या आठवणी कसल्या…. जराही गोड पणा नसायच्या त्या फिस्टच्या जेवणात पण तरी खूप आकर्षण असायचं त्या दिवसाच… कदाचित जेमतेम मिळायचं म्हणून अनमोल होत ते बहुतेक…. किंवा आपण काहीतरी चांगल खाल्ल हे ऐकून आईला आनंद व्हायचा म्हणून अनमोल होत …. किंवा सगळेच रिकामे खिशेवाले दोस्त मिळून खायचो म्हणून अनमोल होत…. माहित नाही …. विचार करत करत गाडी चालवताना ते किराणा दुकान आलं …. पण आम्रखंड घ्यायला गाडी नाही थांबवू शकलो मी… इच्छाच नाही झाली… असच होत आज काल … थांबावस वाटत पण शक्यच नाही होत थांबन…. एक अदृश्य शक्ती ढकलत असते नुसती मागून … नुसत तुला जिंकायचं आहे म्हणत असते…. पण काय जिंकायचं आहे अस विचारलं की ती सुद्धा निरुत्तरित होते… अशा वेळी हवेत वाऱ्याच्या वेगाने उडत असताना मग कधीतरी ती पावसाच्या पाण्यावर लहानपणी सोडलेली कागदाची नाव आठवते आणि मनाला टोचल्यासारख होत … आपण त्यात बसून पाण्यातून प्रवास करू शकत नाही हे माहित असून सुद्धा "वो कागज की कश्ती वो बारिश का पाणी" ऐकल्यावर डोळ्यात पाणी तरारत … घरी आल्यावर जेवताना खूप वाटलं की बायको घरी हवी होती … हे आठवणींच वावटळ तिच्या बरोबर share करता आल असत …. जेवून झाल्यावर थोड शतपावली करायला म्हणून बाहेर पडलो …. चालता चालता चंद्राकडे लक्ष गेल आणि का कुणास ठावूक जगजीतचे शब्द आठवले …. आज फिर दिल ने ईक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया ….

Saturday, July 21, 2012

चिमुकली शाळा


गेल्या मंगळवारी सकाळी पेपर वाचत हॉटेलमध्ये चहा पित बसलो होतो. "यंदा मान्सून लांबणीवर" ही बातमी detail मध्ये वाचून काढली. हे वारे, ते वारे, अक्षांश, रेखांश , कमी दाबाचा पट्टा असले एकेक भन्नाट शब्द वापरून मान्सून का येत नाहिये ह्याची कारण लिहिली होती... चहाचा घोट घेता घेता घड्याळाकड़े लक्ष गेल आणि मी लगबगीने रूम मध्ये येवून documents ची जमवाजमव सुरु केली. actually त्या दिवशी मी four wheeler चे learning license काढण्यासाठी RTO च्या ऑफिस मध्ये जाणार होतो. तेवढ्यासाठी ख़ास ऑफिस मध्ये leave काढली होती. Govt ऑफिस मध्ये जायच म्हणजे माझ्या अंगावर काटाच येतो. चुकून जरी एखाद document विसरल तर "तुम्ही किती तुच्छ आहात" हे दर्शवनारी साहेबाची एक नजर आपल्या आब्रुचा पंचनामा करून जाते. म्हणून सगळे documents काळजीपूर्वक घेवून मी RTO गाठल.

गेटमधून आत गेल्या गेल्या 10-12 एजंट्सच्या गँगने माझ्या गाडीला गराडा घातला. छान वाटल कुणीतरी आपली इतकी विचारपूस करत आहे ते पाहून.. ते सुद्धा Govt ऑफिस मध्ये.. गहिवरून आल थोड.. पण स्पर्धेच युग आहे आपण मागे राहता कामा नये म्हणून मी आधीच एक एजंट पकडला होता... हे मी त्या गँगला सन्मानपूर्वक सांगितल आणि document verification च्या काउंटरकड़े प्रस्थान केल. तिथे भली मोठी रांग.. एजंटला फोन केला तर तो म्हणाला साहेब थोडा वेळ थांबा तिथे, मी सेट्टिंग करतो.. त्या दिवशीचा "one day देवमाणूसच" तो माझ्यासाठी.. गप्प उभा राहिलो.. तसही भारतीयाला "रांग" हा प्रकार काही नविन नाही.. बराच वेळ ताटकळत उभारल्यानंतर कुणीतरी ओरडल.. "Ladies ची लाइन वेगळी करा".. माझ्या नंतर तासाभराने आलेल्या ladies direct साहेबाच्या टेबल जवळ जावून उभ्या राहिलेल्या पाहून "स्त्री - पुरुष समानता : एक सामाजिक गरज" ह्या विषयावर दहावीमध्ये लिहिलेला निबंध आठवला आणि गालावर हसू उमटल..

जवळपास अडीच तासानंतर माझ एजंटच्या आशिर्वादाने document verification झाल आणि मला समजल की आता online test द्यायची आहे.. माझी टरकलीच.. हयात फेल झालो टर उद्या परत ह्या नरकात याव लागणार ह्या भीतीने मी तिथून एक paplet विकत घेतल ज्यावर सगळी traffic सिग्नल्स ची चिन्हे आणि त्यांचे अर्थ होते.. आणि पाठांतर सुरु केल.. बऱ्याच वर्षा नंतर "पास नापास" category मधल tention अनुभवत होतो मी.. शाळेत यायच ना अगदी तस.. :) शेजारी एक मुलगा येवून बसला आणि त्यानेही माझ्या बरोबर अभ्यास सुरु केला..

exam hall मध्ये पाय ठेवला आणि आठवनींचा वेग वाढला.. क्विंचित कमी उजेड असलेला मोठा हॉल.. त्यामध्ये योग्य अंतरावर ठेवलेली बाकडी.. समोर फळा वाटावा अशी स्क्रीन होती.. माझ्या हातात शेवट पर्यंत वाचून काढलेला अभ्यासाचा कागद.. पाठीवर bag आणि मनात एकच हुरहुर.. "पास की नापास"... सगळ अगदी शाळेत होत तस हुबेहूब.. आठवून आठवून प्रश्नांची उत्तर दिली.. अणि result flash होताना एक विचित्र धाकधुक जाणवू लागली.. माझा result जवळ येइल तशी ती धाकधुक वाढली आणि 10 पैकी 8 मार्क पडल्याचे समजताच आनंदाला पारावार उरला नाही.. त्या hall मधून बाहेर आलो तरी माझा आनंद संपता संपेना.. वेड़ेपनाच होता.. "साल्या साधी RTO ची चिंधी exam पास झालायास तू.. त्यात काय एवढ" असा माझा मेंदू मला म्हणत होता पण मन मात्र आनंदात होत.. :) माझ्याबरोबर अभ्यास केलेला तो मुलगा सुद्धा पास झाला होता.. तो सुद्धा आनंदाने मला भेटून गेला..

License येण्याची वाट पाहताना मला एक जानवल.. आजही त्या शाळॆची ओढ़ मनात लपले कुठेतरी.. पण अस का?? तस पाहायला गेल तर आजचे दिवस तेव्हापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत.. खिशात हक्काचा पैसा खेळतोय.. MNC चा जॉब आहे.. स्वताहाच घर आहे.. गाडी आहे.. स्वातंत्र आहे.. शाळॆत असताना तर ह्यातल काहीच नव्हत.. मग अजुन त्या दिवसांची ओढ़ का आहे.. मग समजल.. तेव्हा आपण फ़क्त दोनच गोष्टींचा विचार करायचो.. "पास की नापास".. बस... बाकी काही नव्हत... स्वच्छ होत मन.. कसलीही अनिच्छीतता नव्हती.. माणसांची गुंतागुंत नव्हती.. आयुष्याच्या syllabus पेक्षा पुस्तकाचा syllabus खुपच सोपा होता.. तेव्हा जखमांची मजल फ़क्त गुढग्यापर्यंतच होती.. हृदयापर्यंत नव्हती.. क्रिकेट खेळताना पाऊस आला की stumps घेवून सायकलवरुन मस्त भिजत सुटताना अक्षांश रेखांशांची गणित मांडायची कधी गरजच नाही पडायची.. एका वर्गात पास झाल की पुढच्या वर्गात जायच्या आधी पास होण्याचा आनंद उपभोगायला भरपूर वेळ मिळायचा.. छोट होत विश्व.. आनंदाची व्याख्या सुद्धा सोपी होती.. may be म्हणुनच ओढ़ आहे अजुन त्या दिवसांची... License collect करण्यासाठी माझ नाव पुकारल अन मी भानावर आलो... त्या exam हॉल मध्ये पंधरा मिनिटांची मी चिमुकली शाळा अनुभवली.. बऱ्याच वर्षानंतर थोड़ा वेळ बालपण जगलो.. छान वाटल.. :)

Saturday, February 11, 2012

मांडायला चुकलेली गणितं...


शनिवारची सकाळ... गरमागरम नाश्ता आणि चहा हादडून झाला होता.. पेपर सुद्धा वाचून झाला... रूममध्ये निवांत एकटाच "काय कराव बर" असा विचार करत पडलो होतो.. आठवल.. कपडे धुवायचे आहेत.. पण काही आठवलच नाही अस समजुन मी "काय कराव बर" हा विचार continue केला. अनेक वर्ष घराबाहेर राहून मी नाक मुरडत का असेना पण फ्लॉवरची भाजी सुद्धा खायला शिकलो पण कपडे धुवायचा कंटाळा मात्र शाबूत आहे. मग आठवल.. तीन चार दिवसांपूर्वी बिल्डरचा फोन आला होता... "साहेब, installment चा चेक तेवढा आणून दया हो" अस म्हणाला होता.. "हिशेब करुन weekend ला भेटायला येतो" अस सांगुन मी त्याला टोलवला होता... माझ्या flat चा बिल्डर आणि मी loan घेतलेली bank हे दोघेही मला कितीही जरी लुबाडत असेलना तरी त्यांची मला साहेब म्हणून हाक मारण्याची अदा मला फार आवडते.. :) मला एक समजलय.. जो सर्व पोलिसाना साहेब म्हणून हाक मारतो आणि ज्याला सगळे चोर साहेब म्हणून हाक मारतात तो म्हणजे आपल्या देशाताला common man ... accidently तेव्हा माझ्याजवळ माझा handset आणि laptop नव्हते... म्हणून थोड नाईलाजानेच जवळ पडलेला पेन पेपर उचलला आणि हिशेबाच गणित मांडल....
सात त्रिक एकवीस... एकवीसातला एक हातच्याला आले दोन.. बे त्रिक सहा आधिक दोन आठ... गणित सोडवता सोडवता मला कसतरी झाल.. हे शब्द कुठे लपले होते.. वारुळातुन एका मुंगी पाठोपाठ अनेक मुंग्यांची रांग बाहेर पडावी तसे ते बाहेर पडत होते.. शाळॆत असताना जे रोज म्हणायचो ते ह्या आधुनिक जगाच्या automated calclulations च्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलोय आपण अस जाणवल मला... गणित हा माझा फार आवडीचा विषय.. त्याच उलगडत जाण मला फार आवडत... तस पाहायला गेल तर गणिताच आणि आपल खुपच जवच नातं...गणित हा एकमेव विषय आहे ज्याचा स्वभाव आणि आपल्या आयुष्याच्या philosophy चा स्वभाव खुप मिताजुता आहे... अनेकदा बोलताना सुद्धा आपण "सगळ गणितच चुकल यार" किंवा "गणितं कशी सुटत गेली समजलच नाही नई" अस अनेकदा बोलून जातो... थोड़ा deep मध्ये जावून विचार केला तर आपल्याला आयुष्यात भेटलेली माणस, त्यांचे स्वभाव किंवा आयुष्यात आलेले अनुभव हे सगळ गणितांसारख वाटत....
जस की... काही गणित आपल्याला हक्काची वाटतात .. ती सुटणार म्हणजे सुटणार.. हे आपले marks fix आहेत ह्याचा आपल्याला अफाट आत्मविश्वास.. पेपरला जायच्या आधी त्यांचा अभ्यास केला काय आणि नाही काय पण ती आपल्याला कधीच धोका देणार नाहीत ह्याची खात्री असते... आणि बरयाचादा ती सुटतात सुद्धा.. पण कधी कधी चुक होते त्याना गृहित धरण्याची... ऐन वेळी अनुत्तरीत राहून कायमचा धडा शिकवून जातात... काही गणित सोडवायला खुप अवघड... आपण option ला ठेवलेली... बघू तरी try मारून म्हणून आपण पराभवाची पूर्ण खात्री असताना सुद्धा सोडवायला जातो आणि ती नकळत सुटतात... "miracle happens" म्हणत हसत हसत marks देवून जातात...
पण मला आज पर्यंत सगळ्यात जास्त विचार करायला लावलय ते म्हणजे मांडायला चुकलेल्या गणितानी.. गणिताचा थोडासा विचित्र प्रकार.. पाहता क्षणी challenging वाटतात ही गणित म्हणून आपण सोडवायला घेतो... प्रत्येक पायरी नंतर उत्तरा जवळ पोहोचल्याचा भास्.. पण फ़क्त भासच... मग चुकल्याची जाणीव.. खाडाखोड.. पुन्हा नव्याने मांडणी.. पुन्हा खाडाखोड... नक्की काय चुकतय समजतच नाही.. प्रमेय... सिद्धांत.. गणिताचे नियम.. सगळ सगळ बरोबर अभ्यास करुन प्रत्येक पायरी जपून पुढे जातोय पण उत्तर का मिळत नाहीये.. पांढरयाशुभ्र आयुष्याच्या पेपर मध्ये एका गणिताची खाडाखोड़ फार त्रासदायक वाटू लागते... द्वंद्व.. चक्रव्यूह.. जितके हे शब्द अवघड तितकीच ती परिस्थितीसुद्धा... मग येते निडरता.. परिस्थीतीविरुद्धची बंडखोरी... साला फेल झालो तरी बेहत्तर पण हे गणित परत सोडवायला घेणार नाही.. अस म्हणून आपण ते अर्धवटच सोडून देतो.. त्यानंतर पिक्चर मध्ये येतो सगळ्या जखमांच्या औषधांचा बाप.. काळ... कालांतराने आपल्याला समजुन चुकत की त्या गणिताची मांडणीच चुकली होती.. त्याच्या नशीबी उत्तर नव्हतच.. "माझी वेळच वाईट होती" म्हणून आपण सगळा दोष काळावर टाकतो.. काळ सुद्धा ते गणित फ़क्त attempt केल म्हणून आपल्याला शहापणाच्या रुपात पैकीच्या पैकी मार्क देतो.. आपण शहाणे होतो.. :) अनुत्तरीत राहूनसुद्धा बरच काही देवून जातात... मांडायला चुकलेली गणितं....
ह्या गणितांच्या लाटांमध्ये बिल्डरच्या हिशेबाच वाळुच घर कधी वाहून गेल समजलच नाही.. आता येईल परत त्या चोराचा फोन आणि विचारेल.. "साहेब, हिशेबाच गणित सुटल का हो?"

Saturday, December 17, 2011

जाता जाता...

"हे वर्ष कधी सरल काही समजलच नाही नई".... दर वर्षीच्या डिसेंबरमध्ये हमखास कानावर पडणार हे वाक्य.. तस पहायला गेल तर काळ ना कुणासाठी धावलाय ना थांबलाय. तरीपण आपल्याला मनात कुठेतरी अस वाटत असत की सगळ खुप लवकर घडून गेल.. हे वाक्य बोलल की आपण ह्या वर्षी खुपच busy होतो अस भासवता येत म्हणून मी पण shining मारायला हां dilogue मारतो बरयाचदा.. दिवाऴी जवळ आली की सगळीकड़े साफ़सफाईची गड़बड़ सुरु होते... सगळ आवरत असताना जून-पुराण बरच काही सापडत जात... कधीतरी जपून ठेवलेल.. नकळत हरवलेल.. बरच शोधूनही न सापडलेल... तर काही जुन्या आठवणीनी झालेली ओल साठवून ठेवलेल.. उलगडत जातो मग आठवणींचा खजिना....म्हंटल चला.. आपण पण ह्या वर्षीचा शेवट आलाय म्हणून मनाची साफ़ सफाई करायला घेवु.. काहीतरी अनमोल नक्कीच सापडेल.. बघुतरी try मारून.. बसलो एकटाच विचार करत... आठवत गेले मन अनेक क्षण... लपलेले.. माझ्या हाकेची वाट पाहणारे..
बाबानी पाठवलेला "तिळगुळ घे गोड बोल" चा SMS... कॉलेज मध्ये असताना चहापासून ते exam फी पर्यंतचा हिशेब लिहून ठेवलेली रूम आवरताना सापडलेली एक diary.... ऑफिसच्या pantry मध्ये cream ची biscuits पाहून उगाचच झालेला आनंद..... तळहातावर पडलेला पहिल्या पावसाचा थेंब.... पाकिस्तानला चारीमुंडया चित केल्यावर बेभान होवून मित्राना मीठी मारत केलेला जल्लोष..... वर्ल्ड कप जिंकल्यावर सचिन ला pavilion मधून बाहेर पळत येताना पाहून नकळत डोळ्यात साठलेले आनंदाश्रु... माझ्या मित्राच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला हातात घेताना अंगावर आलेले शहारे.... b'day ला आलेला एक अनपेक्षीत फोन.... मित्राने surprisingly दिलेल एक मस्त greeting कार्ड... रात्री भर पावसात बंद पडल्यावर सहा किलोमीटर ढकललेली अन सकाळी काहीही न करता आपोआप start झालेली माझी sweatheart पल्सर.... बरयाच वर्षानंतर पायाला झालेली एक जखम... पूर्ण आकाराला आलेल्या माझ्या पुण्यातल्या घरात ठेवलेल पहिल पाउल.... सकाळच्या थंडीत निवांत उन्हात बसलेल आणि ओळख नसतानाही फुकटात माझ्याकडून कुरवाळून घेणार एक गुबगुबीत मांजर.... "निसर्ग" मध्ये पोटात जाता जाता हृदयाला स्पर्श करून गेलेली prawns बिरयानी.... फुटपाथवर पेपर वाचत मोठमोठ्याने हसणारा एक वेडा भिकारी आणि पेट्रोल पाच रुपयानी महाग झाले म्हणून वैतागलेल्या अवस्थेत 'नक्की सुखी कोण' अशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहणारा मी... annual bash मध्ये "कोल्लावरी" आणि "साड्डा हक्क एथ्थे रख" वर केलेला धिंगाना डान्स (?).........
हे सगळ आठवताना ह्या वर्षी माझ्या आयुष्यात घडलेला एक फार मजेशीर किस्सा आठवला.. खरतर फालतू आहे पण आता आठवलाय तर लिहिन माझ कर्तव्य आहे.. :) माझ्याकडे खुप जून्या स्टाइल चा handset होता.... त्याच्याकड़े पाहून काही "जण" हसत होते तोपर्यंत मला काही नाही वाटल... पण जेव्हा काही "जणी" हसल्या तेव्हा मात्र दिल का दर्द सारख काहीतरी झाल.. जळत्या मेनबत्तीवर हात धरून मी त्या काहीजनींच challenge स्वीकारल आणि नविन handset विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला...."basic functionalities with good look and feel" पासून सुरु झालेला प्रवास "touch screen with 3G" ला जावून पोहोचला आणि मला नऊ हजाराचा चटका बसला.. नविन handset विकत घेतल्या पासून एक विचित्र घटना घडायला लागली... ऑफिस मध्ये एकदा एक मस्त ringtone ऐकू आली मला.. दिल चाहता है हां माझा लय लय लय आवडीचा पिक्चर.. का ते विचारू नका कारण काही भावनांच्या नशीबी शब्द नसतात.. त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आमिर खान द्विधा मनस्थितीत विचारात गुंतलेला दाखवलाय.. त्यावेळी जे backgroung music आहे ना ती ringtone..... मला ऐकताक्षनी आवडली.. कुठून ऐकू आली ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण नाही सापडली.. नंतर जणू ती ringtone माझा पाठलागच करत होती.. cafetaria मध्ये.. gym मध्ये...hotel मध्ये.. अशी 7-8 वेळा ती ऐकू आली मला.. पण कुठून ऐकू येतीये ते समजतच नव्हत.. प्रेमातच पडलो मी तिच्या... download करावीशी सुद्धा वाटेना कारण प्रेम येड़ असत... 21 november ला मी ऑफिस मध्ये खुप busy असल्याची acting करत असताना ती पुन्हा ऐकू आली.. मी झपकन मान वळवली आणि finally ती मला सापडली.... आज ती माझ्या आयुष्यात आहे.. माझ्या ऐतिहासिक handset च्या ringtone च्या रुपात... :)
ह्या वर्षीचा शेवट ह्याच वर्षीच्या आठवणीनी
गोड केला... बघितलत... हे अस असत आठवनींच.. इतक सगळ कुठे लपल होत देव जाने... पण मज्जा आली एक flashback मारताना.. तुम्ही पण मारून बघा एक try .. मस्त वाटत.. :)
काही जणांची आयुष्यात entry, काहींची नुसतीच धावती भेट.. तर काहीना हसत हसत केलेला गुड बाय... ह्या सगळ्या क्षणांच्या भाऊगर्दीत आयुष्याच्या तराजुचा balance सांभाळता सांभाळता हे वर्ष कधी सरल समजलच नाही राव !!!

Saturday, November 12, 2011

स्माईलचा सिग्नल

मी पुण्यात जिथे राहतो ना तिथून अगदी हाकेच्या अंतरावर एक छोटीशी बाग़ आहे. तिच्या शेजारीच एक चौक आहे. त्या चौकातल्या traffic signal वर थांबल्यावर माझी नजर बरयाचदा त्या बागेमध्ये जाते. गड़बड़ गोंधळाने भरलेल्या आयुष्यात थोडीशी शांतता शोधायला आलेले बरेच जन तिथे दिसतात. ती बाग़ म्हणजेच विश्व मानून मनसोक्त खेळणारी छोटी मुले, प्रपंच ह्या महाकठीण विषयाच analysis करणारे त्या मुलांचे आई वडिल, शपथांचा जिवघेना खेळ खेळत बसलेली प्रेमीयुगुल, ह्या भावनांच्या विश्वाला सुद्धा cash करायचा प्रयत्न करणारा भेळवाला असे अनेक चहरे असतात तिथे. फार छान वाटत मला त्यातला एकेक चेहरा वाचायचा प्रयत्न करायला... पण ह्या सगळ्यापेक्षा मला जास्त विचार करायला लावतात ते म्हणजे आजोबा आणि आजींचे चेहरे.. त्या बागेत एक वयोवृद्ध लोकांचा ग्रुप जमतो. मस्त circle करून बसलेले असतात ते सगळे जन.. कधी निवांत गप्पा मारतात.. कधी व्यायाम करतात.. तर कधी कधी मेजवानीचा बेत सुद्धा पाहिलाय मी त्यांचा.. दिवसातला सगळ्यात romantic वेळ म्हणजे संध्याकाळ... दिवसभर संसारगाडा हाकन्यासाठी केलेल्या पळापळी नंतर आपल्या हक्काच्या माणसा बरोबर चार निवांत शब्द बोलण्याची एक सुंदर कातरवेळ..

अन म्हातारपण ही तर आयुष्याची संध्याकाळ.. काय बोलत असतील ते सगळे जन हां विचार बरयाचदा मनात येतो.. फार वाटत त्यांच बोलन ऐकाव पण नाही जमत तिथे जायला.. गाडीवर बसल्या बसल्याच मग मी स्वताच्या म्हातारपणाचा एक demo पाहतो.. ते सगळ्यात handsome ,smart आजोबा आहेत ते म्हणजे मी.. [अधून मधून माणसाने स्वताहाची उगाचच स्तुती करावी.. its good for health ;) ] .. ते टक्कल पडलेले आजोबा म्हणजे माझा तो मित्र ज्याला आता just टक्कल पडायला सुरुवात झाले.. ते शांत बसलेले आजोबा म्हणजे तो अति senty मित्र.. अस काहीतरी उगाचच सुचायला लागत मला... handsome आजोबांच्या शेजारी बसलेल्या आजी पाहून मात्र थोडा ठसका लागतो.. असो..... एकदा मी त्याना हसताना पाहिल... अन मी थोडा निराश झालो.. हो.. निराश झालो कारण ते हसत नव्हतेच.. त्यानी बहुतेक हास्य क्लब स्थापन केला होता.. माझ्या मनाने लगेच माझ म्हातारपण तिथून काढून घेतल.. कृत्रीम हास्य?? किती भयानक प्रकार आहे हा.. ते सुद्धा आयुष्याच्या संध्याकाळी?? अस काय चूकतय आपल? निखळ हास्य खरच इतक महाग आहे का ? त्यांच्या जवळ कुणीच नसाव मनसोक्त हसवणार? नेमक कारण काय ह्यामागच...?? नुसते प्रश्न.. प्रश्न आणि प्रश्न....

अशा वेळी मला माझ्या आयुष्यातला एक दिवस आठवतो.. engg च्या first year second sem चा second पेपर...... engg स्टुडेंटच्या रूम मध्ये एक वेळ वही पेन नसेल पण देवाची मूर्ती आणि उदबत्तीच पाकिट हमखास असत.. ते भयंकर श्रद्धेचे दिवस.. पहाटे पहाटे "ये कहा आ गए हम युही साथ साथ चलते" म्हणत मी आणि माझ्या हातातल पुस्तक होस्टेल शेजारच्या मंदिराकडे देवाशी मांडवली करायला निघालो होतो... भयंकर टेंशन होत.. काही सुचत नव्हत.. इतक्यात समोरून एक अगदी छोटासा मुलगा आला आणि "हैप्पी न्यू इयर" म्हणून हसत हसत माझा हात हातात घेवून पळुन गेला.. मी नंतर एकटाच त्याला बघून हसत होतो.. मला तो दिवस कुठला होता, त्यादिवशी पेपर कुठला होता, त्या पेपरचा माझ्या profession करियर वर किती परिणाम झाला हे काहीच नाही आठवत.. पण ते निखळ हास्य आजही जसच्या तस 10 वर्षानंतरही डोळ्यासमोर आहे.. त्या tense क्षणी सुद्धा हसण किती सोप होत.... मग हे आजोबा आजी का मनसोक्त हसत नाहीत.... तेव्हा अस वाटत की जावून भरपूर हसवाव त्याना... सांगाव की इतक हसा की विधात्याला सुद्धा जळजळ झाली पाहिजे तो माणूस नसल्याची..

आयुष्य म्हणजे आहेच काय मित्रानो.. एका कुशीपासून ते चार खांद्यापर्यंतचा प्रवास.. कुशी विधाता ठरवतो तर चार खांदे आपल्याला कमवायचे असतात इतकाच काय तो फरक... मनसोक्त हसुया.. because we are temperory here ... माझ म्हातारपण सुद्धा असच असेल का? मी सुद्धा असाच हास्य क्लबचा member असेन का? अशा प्रश्नांच्या गर्तेत त्या सिग्नलवर मी अडकलेला असताना शेजारच्या गाडीवर आईच्या कुशीत निवांत बसलेल एक छोटस बाळ माझ्या प्रश्नावलेल्या विचित्र चेहरयाकड़े बघून खुदकन हसत.... अन मला सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मीळाल्याचा भास् होतो... :) फार वाटत की त्या चिमुकल्याचा गाल पकडून त्याला thanks म्हणाव.... पण नेमका तेवढ्यात सिग्नल ग्रीन होतो.... :)