Wednesday, September 13, 2023

तरुण म्हातारा

 


मला रनिंगची खूप आवड आहे. Running comunity मध्ये "सातारा हिल मॅरेथॉन" ला एक वेगळं महत्व आहे. तशी ही जगप्रसिद्ध मॅरेथॉन, पण त्याहीपेक्षा ओळखली जाते ती प्रचंड अवघड, निसर्गरम्य अशा घाटातल्या running route साठी. मी ह्यावर्षी पहिल्यांदाच ह्याचा अनुभव घ्यायचं ठरवलं. ३ सप्टेंबर ला होणाऱ्या ह्या मॅरॅथॉनसाठी आदल्या दिवशी मी माझ्या मित्रांसोबत साताऱ्यामध्ये पोहोचलो.आदल्या दिवशी expo असतो जिथून मॅरेथॉनच किट collect करून आम्ही बाहेर पडत होतो इतक्यात एक्सपोच्या गेटजवळ एका व्यक्तीने आम्हाला हात दाखवत लिफ्ट मागितली. वयाने जवळपास 45-50 च्या दरम्यान दिसत असलेल्या त्या इसमाला आम्ही सोबत घेतलं आणि सातारा शहराकडे निघालो.

बोलायला इंग्रजीतून सुरुवात आणि typical tune वरून ते दक्षिण भारतातले वाटत होते. "where have you come from Sir?" मी सहज विचारलं. "I am Shrini from calicut, Kerala... I have come to participate in the hill marathon for the fourth time."... आम्ही सगळे मित्र एकमेकांकडे बघतच राहिलो. केरळवरून हा माणूस फक्त hill मॅरेथॉन पळायला आलाय हे सत्य पचवायला थोडा वेळ लागला.. मग थोड्या गप्पा रंगल्या... रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडायची विनंती करणाऱ्या त्या पाहुण्याला आम्ही हट्टाने त्यांच्या हॉटेलच्या दारात नेऊन सोडलं... "may I please ask your age Sir?" मी कुतूहलाने विचारलं. आमची reaction काय असणार ह्याचा आधीच अंदाज आलेले ते मिश्कीलपणे हसत म्हणाले.. " I am 63"... गाडीत बसलेलो आम्ही सगळे तिशीतले तरुण त्यांच्याकडे थोडे क्षण बघतच राहिलो... हॉटेल समोर गाडीतून उतरताना मला all the best देऊन ते निघून गेले... एक त्रेसष्ट वर्षांचा "म्हातारा", retired होऊन मस्त पेंशन घेत, BP शुगरच्या गोळ्या खात नातवंडांबरोबर खेळत बसायच्या वयात केरळ वरून ट्रेनने शेकडो किलोमीटर दूर साताऱ्यात येतो काय, एक्स्पो ला येऊन किट कलेक्ट करून हॉटेलवर उतरताना दुसऱ्या दिवशी २१.१ किलोमीटर्स, ते सुद्धा घाटातल्या रस्त्यावरून पळायच्या तयारीला लागतो काय... अजबच सगळं...

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ढोल ताश्यांच्या गजरात मॅरेथॉन सुरु झाली.. एखाद्या सणासारखं प्रफुल्लित आणि उत्साही वातावरण होत.. स्वतः मधील उरला सुरला ego संपवायचा असेल तर निसर्गाने निर्माण केलेल्या hills ना पळत सामोरे जायचं, आपोआप विनम्रता येते.. निसर्गासमोरची आपली क्षुल्लकता सिद्ध होते.. मी 2 तास 40 मिनिटात 21.1 किलोमीटर्सची 430 मीटर उंचीवरच्या hill route ची मॅरेथॉन पूर्ण केली. सुदैवाने ते पुन्हा भेटले.. मी विचारलं.. "how was your marathon Sir?"... ते म्हणाले.. "not as expected, completed in 2 hours 25 mins.. will try to beat this time next year "... जानेवारी पासून तयारी केलेल्या माझ्यासारख्या तिशीतला तरुणापेक्षा १५ मिनिटं आगोदर ही मॅरेथॉन पूर्ण केल्यावर ते "म्हातारे" आजोबा म्हणत होते की "not as expected".... ते ऐकल्यावर माझी साताऱ्याची फेरी पूर्णत्वास गेली...निसर्गाने आपल्याला ह्या शरीराच्या रूपाने अक्षरशः भरभरून दिलंय, ते सुद्धा अगदी फुकटात... त्याची किंमत काही मोजक्या लोकांनाच समजते... आयुष्य हा एक उत्सव आहे हे ज्याला उमगलं फक्त तोच जगला म्हणायचं.. नाहीतर रडगाणी गात नुसतंच दिवस ढकलणारे रोज कित्येक भेटतात..

आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले... .मी विचारलं... "can I take one selfie with you Sir?".... सेल्फी घेतल्यावर थोडं confuse चेहऱ्याने मला म्हणाले.. "by the way, why did you take selfie with me?".... मी म्हंटल, "Sir, because I want my 63 years old version to be exactly like you"... हसत हसत निरोप घेताना ते म्हणाले.. "see you on the finishing line next year"...

घरी आल्यावर बायकोला त्यांचा फोटो दाखवत म्हणालो... साताऱ्यात एक "तरुण" भेटला होता... 

Friday, March 17, 2023

गुंतागुंत

 



२०२० मधला एक दिवस... Lockdown नावाचा नवखा शब्द आयुष्याचा महत्वाचा भाग होऊन बसला होता. पुण्यात पहिल्यांदाच दिसलेलं निळं स्वच्छ आकाश बघत, चहाचा आस्वाद घेत मी  balcony मध्ये उभा होतो. "जगाचा अंत जवळ आलाय" वैगेरे वैगेरे दरवर्षी येणारे seasonal विचार डोक्यात होते.. एव्हाना वर्क फ्रॉम होमच नावीन्य संपलं होतं.. रोज onsite मारणाऱ्या ऑफिसच्या टीफिन बॉक्स ने इतर भांड्यांसोबत जुळवून घेतलं होतं, Formal shoes नी माझ्याकडे रोज आशेनं बघणं सोडून दिलं होत.. सगळ्या जीन्सनीं बर्मुडा धर्म स्वीकारायची मानसिकता एव्हाना स्वीकारली होती...

चहा पिता पिता माझी नजर बाल्कनी च्या वरच्या कोपऱ्यात गेली..  ह्या सगळ्या 'मानवनिर्मित' गदारोळात एक चिमणी मात्र तिच्या पिलांसाठी घरटं बांधायच्या गडबडीत मग्न होती. तिला बिथरलेल्या माणसाचं थोडसुद्धा सोयरसुतक नव्हतं .. एक एक काडी आणून ती architects ना लाजवेल असं घरटं सजवत होती... तीचं ते घडवणं पुढचे काही दिवस माझ्या चहा time चा अविभाज्य भाग झालं .. मी खूप बारकाईनं तिचं येणं-जाणं, तिची धडपड बघत होतो.. एक दिवस मला हिची पिल्लं बघायला मिळणार , त्या घरट्यातून हळुवार माझ्याकडं बघणारं हा विचार माझ्या मनाचं lockdown रोज शिथिल करत होता .. तिच्या काड्यानी बाल्कनी मध्ये रोज पसारा होत होता पण आम्हाला ते लोटताना काही वाटत नव्हतं .. तीच घर पूर्ण होण्याच्या जवळ आलं तेव्हा वाटलं आपण रोजच्या धावपळीत हे कितीतरी वर्ष miss केलंय.. lockdown चा काहीतरी फायदा झाला म्हणायचं.

असंच एक दिवस चहा चा कप घेऊन बाल्कनी च्या वरच्या कोपऱ्यात नजर टाकली ... तिथे घरटं नव्हतं तिचं.. धस्स झालं .. खाली बघितलं तर जवळपास पूर्ण झालेलं घरटं बाल्कनी मध्ये कोसळलं होतं... खूप मन लावून, सगळी एकाग्रता एकटवून आयुष्याची पुंजी गुंतवून उभारलेल साम्राज्य एखाद्या पत्त्यांचा बंगल्याप्रमाणे एका क्षणात कोसळावं ? इतकी का क्रूर असावी नियती....   तिची पावसात भिजणारी पिल्लं माझ्या डोळ्यासमोर आली .. महिनाभर धडपडून पिल्लाना पाऊस लागू नये म्हणून तीन सजवलेलं घरटं एका वाऱ्याच्या झुळुकेसमोर हरलं होतं.. माझी चहाचा घोट घ्यायची हिम्मत होत नव्हती ..माणसाचा स्पर्श झाला म्हणून ती ते घरटं परत वापरणार नाही ह्या विचाराने त्या घरट्याला हात लावायची हिम्मत होत नव्हती ..  इतक्यात ती चिमणी आली.. एक क्षण त्या वरच्या कोपऱ्यात बसली .. तिने ते खाली पडलेलं घरटं कसतरी वर न्यावं असं वाटत होत.. पण पुढच्या क्षणाला ती उडून गेली..परत काड्या गोळा करायला गेली वाटतं वेडी .. इथेच पडलेलं घरटं हळू हळू काड्या वर नेल्या असत्या तर  वेळ वाचला असता.. माझ्यातला "माणूस" पुटपुटत होता.. reusability वैगेरे concepts त्या अडाणी  चिमणीला सांगत होता.. खाली पडलेलं घरटं आम्ही पुढचे एक-दोन आठवडे उचललं नव्हतं पण तिने त्याच्या एका सुद्धा काडीला स्पर्श केला नाही .. पुढच्या काही दिवसात तिने नवीन घरटं पुन्हा उभा केलं .. त्याच ठिकाणी, नवीन जिद्दीनं ..

   तीने जो एक क्षण त्या कोपऱ्यात बसून घालवला होता त्यातून मी बरंच शिकलो... ती तिच्या त्या जुन्या घरट्यात एक क्षणापुरती सुद्धा गुंतली नव्हती .. खाली कोसळलेल , तिने काडीकाडीने बनवलेलं , स्वप्नांनी भरलेलं , तिच्या पिल्लांच्या हक्कांचं घर तिने ढुंकूनही बघितलं नाही .. "काय होतं" "काय झालं" ह्यात एक क्षण सुद्धा न गुंतता "काय आहे" ह्यावर ती स्वार झाली ... तिला विधात्यानं दिलेल्या तिच्या पंखावर... सगळं संपलं असं मला वाटलं पण तिने तिचे पंख आणि त्यातली ताकद एव्हढ्यावरचं focus केला.. घरटं पुन्हा उभा केलं , तिची पिल्लं रमली घरट्यात त्या वर्षीच्या पावसाळ्यात .. काही दिवसांनी आम्ही तिचं पडलेलं घरटं जड मनाने उचललं .. "आहे त्या क्षणात कसं जगायचं" ह्याचा फॉर्मुला शोधायला overthinking मध्ये गुरफटलेला माणूस वेड्यासारखं धावतोय, सुख शांती शोधतोय... पण ती "अडाणी" चिमणी हे वरदान विधात्याकडूनच घेऊन आले.. म्हणुनच कुठल्याही wild life फोटोग्राफरला रडणारी चिमणी कॅमेरात कैद नाही करता आली आजपर्यंत...  माणसाला बुद्धिमत्तेचं वरदान मिळालंय पण "गुंतागुंती"चा शाप मात्र जाता जातं नाही..

त्यानंतरचा प्रत्येक वर्षी एप्रिल-मे च्या दरम्यान मी बाल्कनीच्या त्या कोपऱ्यावर नजर टाकतो.. ती परत येईल ह्या आशेवर.. पण जी स्वतःच्या घरट्यात नाही गुंतली ती माझ्या घरट्यात तरी कशी गुंतून राहील म्हणा.. नाही आली ती परत, मी मात्र तिच्या येण्याच्या आशेवर कायम आहे .. शेवटी मी पण माणूसचं, गुंतागुंत सुटता सुटत नाही...    

Friday, October 8, 2021

माझा (न) सुटलेला पेपर

 

29 नोव्हेंबर 2003.... Engineering चं second year चालू होत माझं. पहाटेच झोपलो होतो revision करून. त्या दिवशी मी mentally प्रचंड टेंशन मध्ये होतो....In fact, इंजिनीरिंग च्या exam चे दिवस वेगळेच असायचे पण तो दिवस विशेष खास होता.. मी त्या दिवशी Applied Mechanics चा second attempt देण्यासाठी जात होतो... ज्यांनी कुणी इंजिनीरिंग केले त्यांना ह्या first year च्या subject बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही... सर्वात भयानक विषय... त्यात पहिल्या attempt ला मी fail झालो होतो... 

   सकाळी उठून तयार झालो, बाप्पा च्या मंदिरात एक नेहमीप्रमाणे Mechanics च पुस्तक सोबत घेऊन फेरी मारली. इंजिनीरिंग ला प्रत्येकाची  देवाला वशिला लावायची एक unique पद्धत असायची.  माझी ही होती... . ज्या विषयाचा पेपर त्या विषयाचं book सोबत घेऊन जायचं, "सोडवं" असं सांगायला. अंधश्रद्धा तर international level च्या असायच्या... पटणार नाही, पण इंजिनीरिंगचे चार वर्षाचे सगळे पेपर्स मी same लाल रंगाचा शर्ट घालून लिहिलेत.. (नाक मुरडू नका,regularly धुवायचो मी तो शर्ट)...

PMT ने कॉलेजला निघालो. तेव्हा PMT मध्ये रेडिओ लावायचे स्पीकरवर... त्यावर गाणं लागलं होत.. "अल्लाह के बंदे हंसदे , जो भी हो कल फिर आयेगा"... गाणं तसं motivational होतं पण मला धस्स झालं... "कल फिर आयेगा" म्हणजे? हा देवाचा सिग्नल आहे कि काय subject बद्दल... 

  Exam हॉल मध्ये पोहोचलो.. मनातली धाकधूक चालूच होती.. हा पेपर ह्या attempt ला नाही सुटला तर critical attempt ला जाणार होता.. critical म्हणजे असा attempt ज्यात जर का पेपर सुटला नाही तर एक वर्ष घरी बसायचं.. आणि जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत इंजिनीरिंग continue नाही करता येत... पेपर हातात आला, मी थरथरतच घेतला... उघडून एक नजर फिरवली आणि थोडा वेळ डोकं सुन्न झालं... खूप tough पेपर काढला होता university ने.. तेव्हा पेपर वर एक नजर टाकल्यावर समजायचं university च्या मनात काय आहे ते... हात पाय गळाले होते माझे... लोकांच्या अपेक्षा, माझी स्वप्न, आई वडिलांची मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक... bla bla bla...   सगळ्याची भेळ झाली होती मेंदूत... पेपर critical ला गेल्यात जमा होता... काहीही सुचायचं  पूर्णपणे बंद झालं होतं....   सगळा धीर एकवटून, एक मोठा श्वास घेऊन जेवढं जमेल तेवढं तीन तास डोकं लावलं...  

बाकीचे पेपर्स चांगले गेले पण हा backlog चांगलाच जड जाणार हे समजलं होत... exam संपली.. मी घरी आलो माझ्या गावी... मी शक्यतो गावात मंदिरात जात नाही... विश्वास नाही असं काही नाही पण मी जास्त धार्मिक नाही... पण तेव्हा गावी आल्यावर मंदिराच्या बऱ्याच चक्करा मारून झाल्या होत्या... Result चा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा मी जास्त अस्वस्थ होत होतो... Critical ला पेपर गेला तर काय??? एक दिवशी सकाळी माझा मित्र सुहास चा फोन आता.. "ओंक्या, आज result आहे, सांगतो तुला तुझा result संध्याकाळ पर्यंत"... तेव्हा इंजिनीरिंग ला result च्या दिवसाच्या खूप अफवा पसरायच्या.. actual result च्या आधी जवळपास ८-१० दिवस रोज अफवा असायची कि result आजच आहे.. त्यामुळे सुहासला मी फक्त "बरं" म्हणालो आणि विचार केला  हि त्या ८-१० अफवांमधली पहिली अफवा असेल... रात्री जेवत होतो इतक्यात landline फोन वाजला.. (होय, मी त्या जमान्यात इंजिनीरिंग केलीये)... आईने फोन उचलला.. एव्हाना तिला समजलं होत माझं टेंशन.. मला म्हणाली, सुहासचा फोन आहे.. उचललेला घास परत ताटात ठेवला.. फोन घेतला.. "ओंक्या, Second year first semester ऑल क्लिअर झालास तू"... मी काहीही बोललो नाही..फक्त एक प्रश्न विचारला....  "Mechanics?"... सुहास म्हणाला... "सुटला लेका"... त्या दोन शब्दांनी माझं आयुष्य बदलल्यासारखं हलकं फुलकं केलं होत मला... नाचायचा बाकी होतो... डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. (आता सुद्धा आहेत)... 

मी पेपर सोडवला पण त्या पेपरने मला अजूनही सोडलं नाही... तो पेपर मी अजूनही जपून ठेवलाय... (वर फोटो मध्ये आहे तो).. मी Computer engineering ला होतो.. Applied Mechanics चा आणि माझ्या stream चा दूरदूर पर्यंत संबंध नव्हता... इंजिनीरिंगला जे शिकवतात त्याचा आयुष्यात किती उपयोग होतो हा तसा चर्चेचा विषय आहे.. पण एक मात्र नक्की, इंजिनीरिंगच्या अनुभवांनी आयुष्याचा पॅटर्न समजून घ्यायला खूप मदत केली.. त्या अनेक अनुभवांपैकी Applied Mechanics चा पेपर हा माझा सगळ्यात favorite...  

अपघाताने का असेना, त्या दिवशी एक मोठा श्वास घेऊन मी ते क्षण, ते तीन तास जाऊ दिले..जेवढं जमेल तेवढं लिहिलं आणि somehow पेपर सुटला... पेपर सोडवणारा कोण??..  त्या मंदिरातला गणपती बाप्पा , नियती, काळ, माझं नशीब किंवा आणि कोणी.. ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही..  पण एक पॅटर्न शिकलो....  मोठा श्वास घेऊन वेळ जाऊ देणे  हेच उत्तर असतं आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नांचं..  

Friday, September 27, 2019

जखम


दुपारची वेळ होती. ऑफिस मध्ये colleagues सोबत मस्तपैकी जेवणावर ताव मारत होतो. "पुण्यातले ट्रॅफिक" , "बायकोचा मुड आणि IT मधली अनिश्चितता", "side business पाहिजे राव"  हे असले रोजचेच शिळे झालेले विषय नवीन फोडणी टाकून बाहेर आलेली पोटं आम्ही आत सरकवत रवंथ करत बसलो होतो.  अधून मधून दोन घासांमध्ये थोडं जास्त अंतर ठेवून "अमेरिका आणि चीन ह्यांच्या व्यापार युद्दाचे परिणाम", "इलेक्ट्रिक कार्स चे ग्लोबल वॉर्मिंग शी निगडित फायदे " असल्या ग्लोबल विषयांना उगाचच "आज हा प्रश्न सोडवूच" ह्या अविर्भावात हात घालत "कोबीला भाजीचा दर्जा कुणी दिला असावा" असं मनातल्या मनात म्हणत कोबी पोटात ढकलत होतो.
इतक्यात माझा फोन वाजला. माझ्या मुलीच्या स्कूल मधून फोन होता. मनात थोडं धस्स झालं. तिकडून मॅडम म्हणाल्या, तुमची अनन्या एका मुलाने ढकलल्या मुळे पडली, थोडासा ओठाच्या खाली लागलंय ... माझ्या तोंडातला घास जिथल्या तिथे थांबला .. भूक अचानक गायब झाली.. मी मनातली धाकधूक सावरत विचारलं, आता कशी आहे ती? रडत आहे का? anything alarming?...
मला शांत करत त्या म्हणाल्या, she is absolutely fine. आम्ही फक्त तुम्हाला नंतर बघून धक्का बसू नये म्हणून आताच inform केलं.
माझी तरीही खात्री बसेना... मी म्हणालो मला whats app वर तिचा फोटो पाठवा ... तसं त्यांनी लगेच "real time" फोटो पाठवला ... zoom, edit  करून मी ओठावरची जखम पहिली... जास्त नव्हतं लागलं... विचार केला, video call करून बोलावं चिमणीशी .. पण ती रडत असेल तर अजून जास्त रडेल.. hmm... bad idea .... ४५ मिनिट नंतर तिचे स्कूल सुटणारच आहे.. बस मधल्या GPS system वरून समजेलच ती निघालेली... घरी CCTV आहेच.. ती घरी पोहोचलेली दिसेलच live माझ्या मोबाईल मध्ये ... मग video कॉल करून बोलू तिच्याशीं ... माझ्यातला tech-savvy स्वतःशी बोलत होता... wao.. techonogy ने कसले भारी भारी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेत .. समोर टिफिनकडे बघत तोंडात न जाणारा घास परत ठेवला... टिफिन बंद केला ...
पुढची 2-3 मिनिटं मला 2-3 तासासारखी वाटली.. काही केल्या मला राहवेना .. कारची किल्ली घेतली, स्टार्टर मारला आणि पुढच्या 15 मिनिटात तिच्या स्कूल मध्ये पोहोचलो..

 ती स्कूलला जात असल्यापासून मी पहिल्यांदा तिला पिकअप करायला जात होतो .. ती claasroom मध्ये कशी बसते , कशी शिकते अजून पाहिलंच नव्हतं मी.. तिच्या मॅडमनी मला तिच्या नकळत  क्लासरूमच्या दरवाज्याजवळ नेलं.. ती रडत नाहीये हे दाखवण्यासाठी.. मी हळूच डोकावून पाहिलं तर चिमणी जखम कधीची विसरून मुलांसोबत अभ्यास करण्यात रमली होती ... ३ वर्षांची बाहुली माझी इतक्या लवकर जखम विसरायला शिकली ह्याच कौतुक करू कि स्वतःला दोषी समजू हा विचार मला एक जखम देऊन गेला .... नकळत तिला मी दिसलो... मला पाहून तिने दोन हाताचे पंजे करून मोठ्याने वाघाच्या डरकाळीचा आवाज काढला... तिच्या डोळ्यात त्या क्षणी जे काही दिसलं ते मी शब्दात नाही सांगू शकत ..  पळत पळत आली आणि माझ्या मिठीत सामावली.. मला म्हणाली, मी पडले म्हणून तू मला न्यायला आलास ना बाबा...
तिचे ते आनंदाने ओसंडून वाहणारे डोळे, तो मिठीतला स्पर्श आणि ते शब्द .. हे सगळं मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ...
आपलं आयुष्य क्षणिक आहे .. जे काही कमवायचं आहे ते फक्त असले क्षण जे शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतील.. आपण touch screen च्या भानगडित human touch गमावता कामा नये .. मानवी स्पर्शाला replace करनार ,अश्रू बाहेर येण्याआधीच ओळखणार,  डोक्यावरून हात फिरवून "मी आहे ना" म्हणणार मोबाइल app कदापि निर्माण नाही करता येणार..
माझ्या चिमणीची ओठाखालची जखम ३-४ दिवसात बरी झाली .. माझी जखम कधी बरी होईल देव जाणे... 

Tuesday, February 12, 2019

दुनिया... तिची विरुद्ध माझी


२४ ऑगस्ट २०१६ हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. त्यादिवशी माझ्या डोळ्यातून जितके आनंदाश्रू आले तितके पूर्वी कधीच नव्हते आले. माझ्या हातात नुकतीच जन्माला आलेली माझी मुलगी माझ्याकडे टपोऱ्या डोळ्यांनी बघत होती. त्यादिवशी समजलं, अंगावर शहारे आणता येत नाहीत, ते देवानेच द्यावे लागतात.. आणि जेव्हा देव देतो तेव्हा ओंजळ अपुरीच पडते आपली...
त्या दिवसापासून मी रोजचच एक द्वंद्व जगतोय... मला माझ्या मुलीमध्ये एक वेगळीच दुनिया दिसते. जिथे सगळं खूपच सोपं आहे..
हसु आलं कि हसते, अगदी सहज रडते.. एका क्षणात झोपते... काही क्षणांपूर्वी जे घडलंय ते एका क्षणात विसरून जाते..  घरातल्या एका कोपऱ्यात सगळं जग सामावलंय असं वावरते..  मोठं होऊन मी काय काय गमावलंय ह्याची जाणीव  मला ती रोज करून देते..
ऑफिसवरून रोज परत येताना भूतकाळातल्या कर्जाचं , त्या दिवसाच्या ट्रॅफिकचं आणि भविष्यातल्या योजनांचं गाठोडं डोक्यावर ठेवून मी घरी पाऊल टाकलं कि माझी चिमुकली मला मिठीत घेऊन तिच्या दुनियेत घेऊन जाते.. आणि खरं सांगतो, त्या तिच्या दुनियेत मला ह्या जगाचं रहाटगाडं हाकणारा विधाता खूप जवळ कुठेतरी आहे असं वाटत राहत.. ती माझ्याशी बरंच काहीतरी बोलत राहते ज्या बोलण्याला माझ्या बाहेरच्या दुनियेत काहीही अर्थ नाहीये पण ते सगळं हृदयापर्यंत जातं थेट... माझं गाठोडं तिच्या बोबड्या शब्दांनी कधी फेकून दिल हे समजत सुद्धा नाही..  माझ्या दुनियेत सगळं किती नकली आहे हे मात्र समजत...
तिला मिठीत घेतल्यावर मला रोज वाटत.. मला सुद्धा माझ्या दुनियेत मनसोक्त हसायचं आहे , रडायचं आहे... एका क्षणात झोपायचं आहे.. माझ्या घरातल्या ज्या कोपर्यात तिने विश्व थाटलंय तिथे कायमचं राहायचंय... पण दुर्दैवाने देवाने आयुष्य वनवे ठेवलंय..  आता तिच्या दुनियेत फक्त तिच्या मिठीत असतानाच जाता येणार हेच वास्तव आहे..
परवा नेहमीप्रमाणे मी तिला म्हणालो .. तू माझी चिमणी आहेस.. तर म्हणाली.. ए बाबा, मी चिमणी नाही, अनन्या आहे.... तिचे ते शब्द ऐकून कौतुक वाटलं पण थोडं मनाला टोचल्यासारखं सुद्धा झालं.. ती सुद्धा हळूहळू माझ्या दुनियेत येतीये... माझं मला पहिल्यांदाच भेटलेल बालपण उंबरठ्याकडे सरकतय.. एक दिवस माझ्याच दुनियेत भुर्र्कन उडून जायला.... 

Thursday, September 8, 2016

किनारा


त्या दिवशी पहाटे ५ वाजता उठलो. पुण्यातून कोल्हापूर गाठायचं होत आणि कारमधून मी एकटाच जाणार होतो. उठल्यापासून दिवस वेगळा आहे हे जाणवत होत. माझं आयुष्यातलं सर्वात मोठं प्रमोशन होणार होत त्या दिवशी. मी सहसा देवाच्या मूर्तीच्या पाया पडत नाही पण त्या दिवशी देवाच्या पायावर डोकं ठेवलं. सगळं सुरळीत पार पडू दे म्हणालो आणि पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने बाहेर पडलो. माझं पूर्ण लक्ष मोबाईलकडेच होत.. तासाभराचं अंतर पार केल्यावर मोबाईल वाजला... गाडी बाजूला घेऊन उचलला... माझे सासरे म्हणाले.. मुलगी झाली... कधी एकदा बाहेर पडतोय म्हणून वाट पाहत बसलेले आनंदाश्रू कधी बाहेर आले माझं मलाच नाही समजलं... 24 ऑगस्ट 2016 ला मी एका सुंदर छकुलीचा बाबा झालो. पहिल्यांदा बाबाना फोन लावला आणि म्हणालो, बाबा आपल्या घरी परी आली... 
शास्रज्ञानी एवढे भले भले शोध लावलेत पण आनंदाश्रुंसाठी वाईपर बनवता नाही आलेला त्यांना अजून. डोळे पुसत पुसत कसा बसा मी कोल्हापूरला पोहोचलो. धावत पळत हॉस्पीटल मध्ये गेलो. माझी छकुली माझ्या बहिणीच्या मांडीवर शांतपणे झोपली होती.  गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या लग्नात भावनांना आवर घालायचा खूप प्रयत्न करून सुद्धा मी ढसा ढसा रडलो होतो. तिच्या खुशीत माझ्या मुलीला बघून वाटलं माझी बहीण माझ्या मुलीच्या रूपात हक्काने माझ्या घरी परत आली. माझ्या मुलीच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवला आणि 'गर्भ'श्रीमंती शब्दाचा अर्थ कळाला..... मनापासून विधात्याला साष्टांग नमस्कार केला... बायकोला भेटून म्हणालो, आपली परी खूपच सुंदर आहे... ते ऐकून बायकोनेही डोळ्यात साठलेल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली...
हॉस्पीटलच्या रूममध्ये नातेवाईकांची फुल गर्दी झाली होती... एक जन्म आणि कित्येक नवीन नाती... बरीच नाती कित्येक वर्षांनी भेटली... जूने-पुराणे मतभेद विसरून सगळे एकमेकांना आनंदाने भेटत होते... घरातलं वातावरण पूर्ण बदलून जातं एक नवीन पाहुण्यामुळे... माझ्या परीने डोळे उघडायच्या आधीच माझ्या आयुष्यातले बहुतांश प्रश्न सोडवले...

आयुष्यात प्रत्येक फेज मी मनापासून जगलोय.. अगदी जस हवं तसं... शिक्षण, नोकरी, हक्काचा पैसा, गाडी, घर... सगळं मला हवं तसं केलं...  महासागराच्या लाटेवर स्वार होण्यासारखा काळ असतो तो सगळा... बिनदास्त जगणं... लाट जिकडे नेईल तिकडे बिनादिक्कत जाणं.. खूप मजा येते.. पण "अजून हवय" ची भूक त्या लाटा कधी भागवू शकत नाहीत... ऊंच लाटा अंगावर स्वातंत्र्याचे शहारे देऊ शकतात पण शांत झोप नाही देऊ शकत... शांत झोप फक्त किनाऱ्यावरच... माझ्या मुलीच्या पहिल्यांदा उघडलेल्या डोळ्यात मला माझ्या आयुष्याचा किनारा दिसला... आता मला कशाचाही मोह नाही... कमावणं, गमवण हे सगळं गौण वाटायला लागलंय .. 
माझ्या मुलीने माझ्याकडे बघून हसावं आणि मी तिला कुशीत घेऊन आयुष्याच्या किनाऱ्यावर लाटांकडे बघत शांतपणे झोपावं.. माझ्यासाठी आता आयुष्याची हीच व्याख्या झालीय..              

Monday, December 7, 2015

देव भेटला राव !!!


मध्यंतरी मंदिरात जायचा योग आला. हो.. "योग" च म्हणावा लागेल कारण मला स्वतःहून मंदिरात  जायची कधी वेळ येतंच नाही. "देव सगळीकडे आहे" हा साधा सोपा नियम आहे आपला. लहानपणी आई चा हात सोडायची भिती वाटायची म्हणून ती चालली की मंदिरात जायचो आणि आता "मंदिरात चला" अशी विनंती(?) ऐकू आली की "देव फक्त मंदिरातच भेटतो का" अस मी विचारल्यावर बायको एका विशिष्ट नजरेने पाहते आणि त्यानंतर जावच लागत.
मंदिराच्या आवारात पोहोचलो. कार पार्क करण्यासाठी पावती फाडायला एकटा आला. तीस रुपये द्या. 'मंदिर आहे चिडायचं नाही' ह्या नियमाच पालन करून मी मुकाट्याने पैसे दिले. तो म्हणाला…"दर्शन घेवून या  नंतर पावती देतो"..  मग मात्र आपली सटकली... तीस रुपयात काय काय येत हे ऐकवून, त्याला तीन चार कोल्हापुरी शिव्या देवून (मनातल्या मनात बर का..) पावती घेवूनच मी निघालो.   आत जाता जाता देवाच साहित्य विकणारे मागे लागले... त्या देवाच्या दर्शनाला जाताना ते घेवून जावच लागतं वैगेरे वैगेरे सांगणारे… बायकोची इच्छा म्हणून मी ते नाईलाजाने घेवून मंदिरात प्रवेश केला…. भली मोठी रांग आमची वाट पाहत उभी होती…. मेन रांग बायपास करायची असेल तर VIP रांग … पैसे देवून बर का…   बर एवढी पण तुमची ऐपत नसेल तर फक्त मुखदर्शनचा सुधा पर्याय होता… जे लांबून आले होते ते "रिकामं जायचच नाही" म्हणून मेन रांगेत उभे होते… VIP तून गेलो तर 'देवाला वाईट वाटेल  ना' हे पण त्यांच एक कारण होतच… जवळपास सगळ्याच्या चेहऱ्यावर एकंच यक्ष प्रश्न… "देवा, मीच का...  सगळे प्रश्न माझ्याच वाट्याला का?"  रोजच्या रोज त्या मंदिरात येवू शकणारे मुखदर्शन घेवून जात होते… परत येताना उलट चालत येत होते… देवाकडे पाठ करायची नसते म्हणे… म्हणजे परत येताना ह्यांच्या फक्त समोर देव असतो का? पाठीमागे देव नसतो का? मला पडलेला निष्पाप प्रश्न…. असो.. मेन रांगेत उभं राहून देवाच्या समोर यायचा योग आला.. वाटलं आता अद्भुत वाटेल... चक्क देव समोर… तेवढ्यात बाजूने दुसर्या भक्ताने धक्का देवून आणि  समोरून देवाच्या स्वयंघोषित एजंटने "पुढे चला" ची डरकाळी देत मला चक्क ढकललं राव… मी आपल तेवढ्यात "देवा, ह्या सगळ्यांना माफ  कर रे" म्हणत गर्दीच्या कृपेने आपोआप बाहेर आलो…
आमचं देवदर्शन झालं..
मी जेव्हा जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा मनशांती मिळन तर दूरच पण लोकांना देव समजलाच नाही ह्या विचाराने हैराण व्ह्यायला होत. बर कुणाला समजावून सांगाव की बाबानो तुम्ही जे करताय ते देवाला नकोय रे… तर नास्तिक म्हणून रिकामे होतात. मी देवाला प्रचंड मानतो… देव कुठे ना कुठेतरी नक्की आहे. कारण साधं सरळ आहे… जिथे creation असते तिथे त्याच्या creator असतोच… हे अद्भुत जग बनलय म्हणजे हे बनवणार कोण ना कोण तर नक्कीच आहे…आणि तो श्रुष्टीतल्या कणाकणांत आहे…त्याच्या मर्जीशिवाय इथल झाडाच पान सुद्धा हलत नाही..  त्याला कुठलंही नाव न देता फक्त देव म्हणून राहाण इतक कठीण नाहीये… पण त्याला नाव देवून अनेकांनी दुकाने थाटलेत.. आणि माझाच देव भारी म्हणून भांडत बसलेत.. अनेकांनी त्या देवाला मानवनिर्मित नियमांनी जखडून ठेवलय.. अमुक अमुक देवाला ह्याचा नैवेद्य दाखवावाच लागतो.. अमुक अमुक देवासमोर स्त्रीने जायचं नसत.. अरे प्रत्येक मनुष्याला जन्म घ्यायला ज्या स्त्री च्या पोटाचाच आधार घ्यावा लागतो अशा पवित्र स्त्रीला ज्या देवाने बनवलं तो तिलाच का टाळेल… असो… असे अनेक विचार करत करत मंदिराबाहेर आलो…
बाहेर बसलेल्या एका शेतकऱ्याकडून थोडी फळ विकत घेतली… कारकडे जाता जाता एक भिकारी मुलगी जवळ येवून भीक मागू लागली… मनाला टोचल्यासारख झालं… डोळ्यात भुकेचा वाळवंट साचला होता तिच्या.  मागे वळून देव शोधणाऱ्या रांगेकडे एक नजर टाकली… ओरडून सांगावस वाटलं अरे देव आत नाहीये रे.. पण नास्तिकतेचा शिक्का बसेल म्हणून परत शांत झालो… एक सफरचंद त्या मुलीच्या हातावर ठेवलं… देव शोधानारयांच्या गर्दीत एक माणूस असण्याचं कर्तव्य मी पार पाडलं… अनपेक्षित पने भुकेलेल्या पोटाला खायला मिळाल्याचा आनंत त्या गरीब मुलीच्या पाणावलेल्या डोळ्यात ओसंडून वाहत होता… मंदिरात इतक आत्मिक समाधान मिळेल ह्याची अपेक्षा सुधा नव्हती केली मी… सफरचंद खात खात कुठेतरी देवाच्या असण्याचा विश्वास त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता… तिच्या चेहऱ्यावरचा तो विश्वासाने भरलेला आनंद पाहून मला देव भेटला राव !!!