Friday, September 27, 2019

जखम


दुपारची वेळ होती. ऑफिस मध्ये colleagues सोबत मस्तपैकी जेवणावर ताव मारत होतो. "पुण्यातले ट्रॅफिक" , "बायकोचा मुड आणि IT मधली अनिश्चितता", "side business पाहिजे राव"  हे असले रोजचेच शिळे झालेले विषय नवीन फोडणी टाकून बाहेर आलेली पोटं आम्ही आत सरकवत रवंथ करत बसलो होतो.  अधून मधून दोन घासांमध्ये थोडं जास्त अंतर ठेवून "अमेरिका आणि चीन ह्यांच्या व्यापार युद्दाचे परिणाम", "इलेक्ट्रिक कार्स चे ग्लोबल वॉर्मिंग शी निगडित फायदे " असल्या ग्लोबल विषयांना उगाचच "आज हा प्रश्न सोडवूच" ह्या अविर्भावात हात घालत "कोबीला भाजीचा दर्जा कुणी दिला असावा" असं मनातल्या मनात म्हणत कोबी पोटात ढकलत होतो.
इतक्यात माझा फोन वाजला. माझ्या मुलीच्या स्कूल मधून फोन होता. मनात थोडं धस्स झालं. तिकडून मॅडम म्हणाल्या, तुमची अनन्या एका मुलाने ढकलल्या मुळे पडली, थोडासा ओठाच्या खाली लागलंय ... माझ्या तोंडातला घास जिथल्या तिथे थांबला .. भूक अचानक गायब झाली.. मी मनातली धाकधूक सावरत विचारलं, आता कशी आहे ती? रडत आहे का? anything alarming?...
मला शांत करत त्या म्हणाल्या, she is absolutely fine. आम्ही फक्त तुम्हाला नंतर बघून धक्का बसू नये म्हणून आताच inform केलं.
माझी तरीही खात्री बसेना... मी म्हणालो मला whats app वर तिचा फोटो पाठवा ... तसं त्यांनी लगेच "real time" फोटो पाठवला ... zoom, edit  करून मी ओठावरची जखम पहिली... जास्त नव्हतं लागलं... विचार केला, video call करून बोलावं चिमणीशी .. पण ती रडत असेल तर अजून जास्त रडेल.. hmm... bad idea .... ४५ मिनिट नंतर तिचे स्कूल सुटणारच आहे.. बस मधल्या GPS system वरून समजेलच ती निघालेली... घरी CCTV आहेच.. ती घरी पोहोचलेली दिसेलच live माझ्या मोबाईल मध्ये ... मग video कॉल करून बोलू तिच्याशीं ... माझ्यातला tech-savvy स्वतःशी बोलत होता... wao.. techonogy ने कसले भारी भारी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेत .. समोर टिफिनकडे बघत तोंडात न जाणारा घास परत ठेवला... टिफिन बंद केला ...
पुढची 2-3 मिनिटं मला 2-3 तासासारखी वाटली.. काही केल्या मला राहवेना .. कारची किल्ली घेतली, स्टार्टर मारला आणि पुढच्या 15 मिनिटात तिच्या स्कूल मध्ये पोहोचलो..

 ती स्कूलला जात असल्यापासून मी पहिल्यांदा तिला पिकअप करायला जात होतो .. ती claasroom मध्ये कशी बसते , कशी शिकते अजून पाहिलंच नव्हतं मी.. तिच्या मॅडमनी मला तिच्या नकळत  क्लासरूमच्या दरवाज्याजवळ नेलं.. ती रडत नाहीये हे दाखवण्यासाठी.. मी हळूच डोकावून पाहिलं तर चिमणी जखम कधीची विसरून मुलांसोबत अभ्यास करण्यात रमली होती ... ३ वर्षांची बाहुली माझी इतक्या लवकर जखम विसरायला शिकली ह्याच कौतुक करू कि स्वतःला दोषी समजू हा विचार मला एक जखम देऊन गेला .... नकळत तिला मी दिसलो... मला पाहून तिने दोन हाताचे पंजे करून मोठ्याने वाघाच्या डरकाळीचा आवाज काढला... तिच्या डोळ्यात त्या क्षणी जे काही दिसलं ते मी शब्दात नाही सांगू शकत ..  पळत पळत आली आणि माझ्या मिठीत सामावली.. मला म्हणाली, मी पडले म्हणून तू मला न्यायला आलास ना बाबा...
तिचे ते आनंदाने ओसंडून वाहणारे डोळे, तो मिठीतला स्पर्श आणि ते शब्द .. हे सगळं मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ...
आपलं आयुष्य क्षणिक आहे .. जे काही कमवायचं आहे ते फक्त असले क्षण जे शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतील.. आपण touch screen च्या भानगडित human touch गमावता कामा नये .. मानवी स्पर्शाला replace करनार ,अश्रू बाहेर येण्याआधीच ओळखणार,  डोक्यावरून हात फिरवून "मी आहे ना" म्हणणार मोबाइल app कदापि निर्माण नाही करता येणार..
माझ्या चिमणीची ओठाखालची जखम ३-४ दिवसात बरी झाली .. माझी जखम कधी बरी होईल देव जाणे... 

Tuesday, February 12, 2019

दुनिया... तिची विरुद्ध माझी


२४ ऑगस्ट २०१६ हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. त्यादिवशी माझ्या डोळ्यातून जितके आनंदाश्रू आले तितके पूर्वी कधीच नव्हते आले. माझ्या हातात नुकतीच जन्माला आलेली माझी मुलगी माझ्याकडे टपोऱ्या डोळ्यांनी बघत होती. त्यादिवशी समजलं, अंगावर शहारे आणता येत नाहीत, ते देवानेच द्यावे लागतात.. आणि जेव्हा देव देतो तेव्हा ओंजळ अपुरीच पडते आपली...
त्या दिवसापासून मी रोजचच एक द्वंद्व जगतोय... मला माझ्या मुलीमध्ये एक वेगळीच दुनिया दिसते. जिथे सगळं खूपच सोपं आहे..
हसु आलं कि हसते, अगदी सहज रडते.. एका क्षणात झोपते... काही क्षणांपूर्वी जे घडलंय ते एका क्षणात विसरून जाते..  घरातल्या एका कोपऱ्यात सगळं जग सामावलंय असं वावरते..  मोठं होऊन मी काय काय गमावलंय ह्याची जाणीव  मला ती रोज करून देते..
ऑफिसवरून रोज परत येताना भूतकाळातल्या कर्जाचं , त्या दिवसाच्या ट्रॅफिकचं आणि भविष्यातल्या योजनांचं गाठोडं डोक्यावर ठेवून मी घरी पाऊल टाकलं कि माझी चिमुकली मला मिठीत घेऊन तिच्या दुनियेत घेऊन जाते.. आणि खरं सांगतो, त्या तिच्या दुनियेत मला ह्या जगाचं रहाटगाडं हाकणारा विधाता खूप जवळ कुठेतरी आहे असं वाटत राहत.. ती माझ्याशी बरंच काहीतरी बोलत राहते ज्या बोलण्याला माझ्या बाहेरच्या दुनियेत काहीही अर्थ नाहीये पण ते सगळं हृदयापर्यंत जातं थेट... माझं गाठोडं तिच्या बोबड्या शब्दांनी कधी फेकून दिल हे समजत सुद्धा नाही..  माझ्या दुनियेत सगळं किती नकली आहे हे मात्र समजत...
तिला मिठीत घेतल्यावर मला रोज वाटत.. मला सुद्धा माझ्या दुनियेत मनसोक्त हसायचं आहे , रडायचं आहे... एका क्षणात झोपायचं आहे.. माझ्या घरातल्या ज्या कोपर्यात तिने विश्व थाटलंय तिथे कायमचं राहायचंय... पण दुर्दैवाने देवाने आयुष्य वनवे ठेवलंय..  आता तिच्या दुनियेत फक्त तिच्या मिठीत असतानाच जाता येणार हेच वास्तव आहे..
परवा नेहमीप्रमाणे मी तिला म्हणालो .. तू माझी चिमणी आहेस.. तर म्हणाली.. ए बाबा, मी चिमणी नाही, अनन्या आहे.... तिचे ते शब्द ऐकून कौतुक वाटलं पण थोडं मनाला टोचल्यासारखं सुद्धा झालं.. ती सुद्धा हळूहळू माझ्या दुनियेत येतीये... माझं मला पहिल्यांदाच भेटलेल बालपण उंबरठ्याकडे सरकतय.. एक दिवस माझ्याच दुनियेत भुर्र्कन उडून जायला.... 

Thursday, September 8, 2016

किनारा


त्या दिवशी पहाटे ५ वाजता उठलो. पुण्यातून कोल्हापूर गाठायचं होत आणि कारमधून मी एकटाच जाणार होतो. उठल्यापासून दिवस वेगळा आहे हे जाणवत होत. माझं आयुष्यातलं सर्वात मोठं प्रमोशन होणार होत त्या दिवशी. मी सहसा देवाच्या मूर्तीच्या पाया पडत नाही पण त्या दिवशी देवाच्या पायावर डोकं ठेवलं. सगळं सुरळीत पार पडू दे म्हणालो आणि पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने बाहेर पडलो. माझं पूर्ण लक्ष मोबाईलकडेच होत.. तासाभराचं अंतर पार केल्यावर मोबाईल वाजला... गाडी बाजूला घेऊन उचलला... माझे सासरे म्हणाले.. मुलगी झाली... कधी एकदा बाहेर पडतोय म्हणून वाट पाहत बसलेले आनंदाश्रू कधी बाहेर आले माझं मलाच नाही समजलं... 24 ऑगस्ट 2016 ला मी एका सुंदर छकुलीचा बाबा झालो. पहिल्यांदा बाबाना फोन लावला आणि म्हणालो, बाबा आपल्या घरी परी आली... 
शास्रज्ञानी एवढे भले भले शोध लावलेत पण आनंदाश्रुंसाठी वाईपर बनवता नाही आलेला त्यांना अजून. डोळे पुसत पुसत कसा बसा मी कोल्हापूरला पोहोचलो. धावत पळत हॉस्पीटल मध्ये गेलो. माझी छकुली माझ्या बहिणीच्या मांडीवर शांतपणे झोपली होती.  गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या लग्नात भावनांना आवर घालायचा खूप प्रयत्न करून सुद्धा मी ढसा ढसा रडलो होतो. तिच्या खुशीत माझ्या मुलीला बघून वाटलं माझी बहीण माझ्या मुलीच्या रूपात हक्काने माझ्या घरी परत आली. माझ्या मुलीच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवला आणि 'गर्भ'श्रीमंती शब्दाचा अर्थ कळाला..... मनापासून विधात्याला साष्टांग नमस्कार केला... बायकोला भेटून म्हणालो, आपली परी खूपच सुंदर आहे... ते ऐकून बायकोनेही डोळ्यात साठलेल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली...
हॉस्पीटलच्या रूममध्ये नातेवाईकांची फुल गर्दी झाली होती... एक जन्म आणि कित्येक नवीन नाती... बरीच नाती कित्येक वर्षांनी भेटली... जूने-पुराणे मतभेद विसरून सगळे एकमेकांना आनंदाने भेटत होते... घरातलं वातावरण पूर्ण बदलून जातं एक नवीन पाहुण्यामुळे... माझ्या परीने डोळे उघडायच्या आधीच माझ्या आयुष्यातले बहुतांश प्रश्न सोडवले...

आयुष्यात प्रत्येक फेज मी मनापासून जगलोय.. अगदी जस हवं तसं... शिक्षण, नोकरी, हक्काचा पैसा, गाडी, घर... सगळं मला हवं तसं केलं...  महासागराच्या लाटेवर स्वार होण्यासारखा काळ असतो तो सगळा... बिनदास्त जगणं... लाट जिकडे नेईल तिकडे बिनादिक्कत जाणं.. खूप मजा येते.. पण "अजून हवय" ची भूक त्या लाटा कधी भागवू शकत नाहीत... ऊंच लाटा अंगावर स्वातंत्र्याचे शहारे देऊ शकतात पण शांत झोप नाही देऊ शकत... शांत झोप फक्त किनाऱ्यावरच... माझ्या मुलीच्या पहिल्यांदा उघडलेल्या डोळ्यात मला माझ्या आयुष्याचा किनारा दिसला... आता मला कशाचाही मोह नाही... कमावणं, गमवण हे सगळं गौण वाटायला लागलंय .. 
माझ्या मुलीने माझ्याकडे बघून हसावं आणि मी तिला कुशीत घेऊन आयुष्याच्या किनाऱ्यावर लाटांकडे बघत शांतपणे झोपावं.. माझ्यासाठी आता आयुष्याची हीच व्याख्या झालीय..              

Monday, December 7, 2015

देव भेटला राव !!!


मध्यंतरी मंदिरात जायचा योग आला. हो.. "योग" च म्हणावा लागेल कारण मला स्वतःहून मंदिरात  जायची कधी वेळ येतंच नाही. "देव सगळीकडे आहे" हा साधा सोपा नियम आहे आपला. लहानपणी आई चा हात सोडायची भिती वाटायची म्हणून ती चालली की मंदिरात जायचो आणि आता "मंदिरात चला" अशी विनंती(?) ऐकू आली की "देव फक्त मंदिरातच भेटतो का" अस मी विचारल्यावर बायको एका विशिष्ट नजरेने पाहते आणि त्यानंतर जावच लागत.
मंदिराच्या आवारात पोहोचलो. कार पार्क करण्यासाठी पावती फाडायला एकटा आला. तीस रुपये द्या. 'मंदिर आहे चिडायचं नाही' ह्या नियमाच पालन करून मी मुकाट्याने पैसे दिले. तो म्हणाला…"दर्शन घेवून या  नंतर पावती देतो"..  मग मात्र आपली सटकली... तीस रुपयात काय काय येत हे ऐकवून, त्याला तीन चार कोल्हापुरी शिव्या देवून (मनातल्या मनात बर का..) पावती घेवूनच मी निघालो.   आत जाता जाता देवाच साहित्य विकणारे मागे लागले... त्या देवाच्या दर्शनाला जाताना ते घेवून जावच लागतं वैगेरे वैगेरे सांगणारे… बायकोची इच्छा म्हणून मी ते नाईलाजाने घेवून मंदिरात प्रवेश केला…. भली मोठी रांग आमची वाट पाहत उभी होती…. मेन रांग बायपास करायची असेल तर VIP रांग … पैसे देवून बर का…   बर एवढी पण तुमची ऐपत नसेल तर फक्त मुखदर्शनचा सुधा पर्याय होता… जे लांबून आले होते ते "रिकामं जायचच नाही" म्हणून मेन रांगेत उभे होते… VIP तून गेलो तर 'देवाला वाईट वाटेल  ना' हे पण त्यांच एक कारण होतच… जवळपास सगळ्याच्या चेहऱ्यावर एकंच यक्ष प्रश्न… "देवा, मीच का...  सगळे प्रश्न माझ्याच वाट्याला का?"  रोजच्या रोज त्या मंदिरात येवू शकणारे मुखदर्शन घेवून जात होते… परत येताना उलट चालत येत होते… देवाकडे पाठ करायची नसते म्हणे… म्हणजे परत येताना ह्यांच्या फक्त समोर देव असतो का? पाठीमागे देव नसतो का? मला पडलेला निष्पाप प्रश्न…. असो.. मेन रांगेत उभं राहून देवाच्या समोर यायचा योग आला.. वाटलं आता अद्भुत वाटेल... चक्क देव समोर… तेवढ्यात बाजूने दुसर्या भक्ताने धक्का देवून आणि  समोरून देवाच्या स्वयंघोषित एजंटने "पुढे चला" ची डरकाळी देत मला चक्क ढकललं राव… मी आपल तेवढ्यात "देवा, ह्या सगळ्यांना माफ  कर रे" म्हणत गर्दीच्या कृपेने आपोआप बाहेर आलो…
आमचं देवदर्शन झालं..
मी जेव्हा जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा मनशांती मिळन तर दूरच पण लोकांना देव समजलाच नाही ह्या विचाराने हैराण व्ह्यायला होत. बर कुणाला समजावून सांगाव की बाबानो तुम्ही जे करताय ते देवाला नकोय रे… तर नास्तिक म्हणून रिकामे होतात. मी देवाला प्रचंड मानतो… देव कुठे ना कुठेतरी नक्की आहे. कारण साधं सरळ आहे… जिथे creation असते तिथे त्याच्या creator असतोच… हे अद्भुत जग बनलय म्हणजे हे बनवणार कोण ना कोण तर नक्कीच आहे…आणि तो श्रुष्टीतल्या कणाकणांत आहे…त्याच्या मर्जीशिवाय इथल झाडाच पान सुद्धा हलत नाही..  त्याला कुठलंही नाव न देता फक्त देव म्हणून राहाण इतक कठीण नाहीये… पण त्याला नाव देवून अनेकांनी दुकाने थाटलेत.. आणि माझाच देव भारी म्हणून भांडत बसलेत.. अनेकांनी त्या देवाला मानवनिर्मित नियमांनी जखडून ठेवलय.. अमुक अमुक देवाला ह्याचा नैवेद्य दाखवावाच लागतो.. अमुक अमुक देवासमोर स्त्रीने जायचं नसत.. अरे प्रत्येक मनुष्याला जन्म घ्यायला ज्या स्त्री च्या पोटाचाच आधार घ्यावा लागतो अशा पवित्र स्त्रीला ज्या देवाने बनवलं तो तिलाच का टाळेल… असो… असे अनेक विचार करत करत मंदिराबाहेर आलो…
बाहेर बसलेल्या एका शेतकऱ्याकडून थोडी फळ विकत घेतली… कारकडे जाता जाता एक भिकारी मुलगी जवळ येवून भीक मागू लागली… मनाला टोचल्यासारख झालं… डोळ्यात भुकेचा वाळवंट साचला होता तिच्या.  मागे वळून देव शोधणाऱ्या रांगेकडे एक नजर टाकली… ओरडून सांगावस वाटलं अरे देव आत नाहीये रे.. पण नास्तिकतेचा शिक्का बसेल म्हणून परत शांत झालो… एक सफरचंद त्या मुलीच्या हातावर ठेवलं… देव शोधानारयांच्या गर्दीत एक माणूस असण्याचं कर्तव्य मी पार पाडलं… अनपेक्षित पने भुकेलेल्या पोटाला खायला मिळाल्याचा आनंत त्या गरीब मुलीच्या पाणावलेल्या डोळ्यात ओसंडून वाहत होता… मंदिरात इतक आत्मिक समाधान मिळेल ह्याची अपेक्षा सुधा नव्हती केली मी… सफरचंद खात खात कुठेतरी देवाच्या असण्याचा विश्वास त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता… तिच्या चेहऱ्यावरचा तो विश्वासाने भरलेला आनंद पाहून मला देव भेटला राव !!!      

Friday, June 28, 2013

फिस्ट


ऑफिस मध्ये काम करत असताना minimize केलेला आणि continuous refresh होणारा window माझ मन विचलीत करण्यात मग्न होता. भारताची match चालू होती त्यामुळे काही केल्या माझ मन कामात लागत नव्हत. सारख वाटत होत की साला कुछ तो गलत हो रहा है… सगळच मरु दे म्हंटल आणि गाशा गुंडाळून गाडीचे gear पटापट बदलत , आजूबाजूच्या गाडीवाल्याना शिव्या घालत घर गाठलं आणि Star Cricket लावलं तेव्हा कुठे जरा बर वाटलं. माझ्या क्रिकेट वेडे पणाला "विक्षिप्तपणा " म्हणून हिनवनारी माझी अर्धांगिनीसुद्धा त्या दिवशी कामानिमित्त परगावी गेली होती त्यामुळे तर माझी गाडी हवेत उडतच TV समोर येवून park झाली होती. मी , एकांत आणि क्रिकेट match.... आहाहा सुवर्णयोगच तो !!! माझी बायको सारखी विचारात असते मला की एवढ काय आवडत तुला त्या खेळातल… आता कस सांगू तिला की काय आवडत ते माहित नाही पण जब भी देखता हु लगता है के साला जिंदा हु….
असो… मस्त खेळत भारताने भन्नाट विजय नोंदवला …. मूड बनवून टाकला धोन्याच्या टीमने…. वाटलं चलो आज कुछ तुफानी करते है…. मस्त जेवण बनवूया.. म्हणजे बनवायचा try तरी करुया… पण बायकोने फोन वर (तंबी देवून) सांगितलं होत की आज please hotel मधून parcel आणून खा (म्हणजेच किचन मध्ये लुडबुड करू नकोस, जेवण बनवणे हे Computer च्या keyboard वर बोटं बडवत बसण्याइतक सोप काम नाहीये) . लग्न होईपर्यंत मला (वेड्या पामराला) वाटायचं की एका वाक्याला फक्त एकच अर्थ असतो. पण कंसातल्या वाक्याचा अर्थ सुद्धा जोडलेला असतो हे अनेक टोमन्यांचां मारा झाल्यावर उमगल . ;) पण भारताने match जिंकली होती म्हणुन त्याच जोशचा वापर करून मी माझ्या पत्नीला माझा निर्णय कळवला. ती घरी नसल्यामुळे माझा निर्णय मान्य करण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच उरला नाही. फोन वरून सगळी रेसिपी तिने मला समजावून सांगितली आणि आयुष्यातली पहिली डिश मी बनवली … सुदैवानॆ ती खाण्यालायक सुद्धा बनली होती :) match जिंकली म्हणून मी खुश आणि मला किचन मधल काहीतरी जमल म्हणून बायको खुश… :)
चपात्या बनवण आपल्याला बाप जन्मात जमणार नाहीये हे माहित होत म्हणून गाडीवरून चपात्या आणायला मी बाहेर पडलो. जाताना किराणा मालाच दुकान दिसलं…. वाटलं आम्रखंड किंवा श्रीखंड घ्याव … परत येताना घेवू असा विचार करून तसाच पुढे गेलो . एक हॉटेल दिसलं… हॉटेल आहे की नुसतेच टेबल मांडलेत ते समजेना… आत जावूनच पहाव म्हणून शिरलो आत… आत गेलो आणि जुण पुराण काहीतरी आठवल्यासारख झाल…लांबसडक आकाराचे मांडलेले टेबल्स… त्यावर खरकट्याचे डाग असलेली अंथरलेली कापडं…. उंचीवर ठेवलेला अन ज्यात Score दिसण शक्यच नाही इवलासा TV…. वरण समजून डाळ शोधत पिवळ पाणी पीत एकमेकांची चेष्टा करत, match बद्दल गप्पा मारत बसलेली तिथली मुल..... आईच्या हातच स्वर्गसुखी जेवण त्या बेचव ताटात शोधत मित्रांमध्ये हरवलेल्या त्या मुलांमध्ये मी सुद्धा होतो एके काळी..... counter वर एक काकू हिशेब करत बसल्या होत्या... मी म्हंटल काकू तीन चपात्या हव्या आहेत..... त्यांनी लगेच काम करणाऱ्या मुलाला चपात्या आणायला पाठवून दिल…. मी सहज म्हणून विचारलं…. "काकू ही मेस आहे का हो?" … "हो, 60 मेंबर्स आहेत…" त्यानी मला मेसचा रेट आणि मुलांची लिस्ट सुद्धा दाखवली … बहुतेक त्यांना वाटलं होत की मला मेस लावायची आहे … इतक्यात त्या पोराने चपात्या आणून दिल्या … पण मला तिथे थोडा वेळ थांबावस वाटत होत म्हणून मी उगाचच त्या लिस्टकडे पाहत बसलो … "मेस मध्ये जेवण unlimited असत ना हो ??" … "हो , पण स्वीट डिश लिमिटेड असते" ..... "आणि काकू फिस्ट कधी असत हो ??" खर सांगतो… फिस्ट हा शब्द माझ्या तोंडात कसा आला हे माझ मला सुद्धा समजल नाही… मेस सोडल्या पासून जवळपास विसरुन गेलो होतो हा शब्द… असच असत ह्या आठवणींच …म्हणूनच त्यांच्या उलगडत जाण्यामागच्या प्रक्रीयेमागच गुपित कुठल्याच शास्त्रज्ञाला नाही उमगल आजपर्यंत…. काकू म्हणाल्या "फिस्ट रविवारी असत … जिलेबी , श्रीखंड किंवा खीर आणि संध्याकाळी मेसला सुट्टी "...... बर ठीक आहे म्हणून कसा बसा मी तिथून बाहेर आलो … पण पाठलाग सोडतील त्या आठवणी कसल्या…. जराही गोड पणा नसायच्या त्या फिस्टच्या जेवणात पण तरी खूप आकर्षण असायचं त्या दिवसाच… कदाचित जेमतेम मिळायचं म्हणून अनमोल होत ते बहुतेक…. किंवा आपण काहीतरी चांगल खाल्ल हे ऐकून आईला आनंद व्हायचा म्हणून अनमोल होत …. किंवा सगळेच रिकामे खिशेवाले दोस्त मिळून खायचो म्हणून अनमोल होत…. माहित नाही …. विचार करत करत गाडी चालवताना ते किराणा दुकान आलं …. पण आम्रखंड घ्यायला गाडी नाही थांबवू शकलो मी… इच्छाच नाही झाली… असच होत आज काल … थांबावस वाटत पण शक्यच नाही होत थांबन…. एक अदृश्य शक्ती ढकलत असते नुसती मागून … नुसत तुला जिंकायचं आहे म्हणत असते…. पण काय जिंकायचं आहे अस विचारलं की ती सुद्धा निरुत्तरित होते… अशा वेळी हवेत वाऱ्याच्या वेगाने उडत असताना मग कधीतरी ती पावसाच्या पाण्यावर लहानपणी सोडलेली कागदाची नाव आठवते आणि मनाला टोचल्यासारख होत … आपण त्यात बसून पाण्यातून प्रवास करू शकत नाही हे माहित असून सुद्धा "वो कागज की कश्ती वो बारिश का पाणी" ऐकल्यावर डोळ्यात पाणी तरारत … घरी आल्यावर जेवताना खूप वाटलं की बायको घरी हवी होती … हे आठवणींच वावटळ तिच्या बरोबर share करता आल असत …. जेवून झाल्यावर थोड शतपावली करायला म्हणून बाहेर पडलो …. चालता चालता चंद्राकडे लक्ष गेल आणि का कुणास ठावूक जगजीतचे शब्द आठवले …. आज फिर दिल ने ईक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया ….

Saturday, July 21, 2012

चिमुकली शाळा


गेल्या मंगळवारी सकाळी पेपर वाचत हॉटेलमध्ये चहा पित बसलो होतो. "यंदा मान्सून लांबणीवर" ही बातमी detail मध्ये वाचून काढली. हे वारे, ते वारे, अक्षांश, रेखांश , कमी दाबाचा पट्टा असले एकेक भन्नाट शब्द वापरून मान्सून का येत नाहिये ह्याची कारण लिहिली होती... चहाचा घोट घेता घेता घड्याळाकड़े लक्ष गेल आणि मी लगबगीने रूम मध्ये येवून documents ची जमवाजमव सुरु केली. actually त्या दिवशी मी four wheeler चे learning license काढण्यासाठी RTO च्या ऑफिस मध्ये जाणार होतो. तेवढ्यासाठी ख़ास ऑफिस मध्ये leave काढली होती. Govt ऑफिस मध्ये जायच म्हणजे माझ्या अंगावर काटाच येतो. चुकून जरी एखाद document विसरल तर "तुम्ही किती तुच्छ आहात" हे दर्शवनारी साहेबाची एक नजर आपल्या आब्रुचा पंचनामा करून जाते. म्हणून सगळे documents काळजीपूर्वक घेवून मी RTO गाठल.

गेटमधून आत गेल्या गेल्या 10-12 एजंट्सच्या गँगने माझ्या गाडीला गराडा घातला. छान वाटल कुणीतरी आपली इतकी विचारपूस करत आहे ते पाहून.. ते सुद्धा Govt ऑफिस मध्ये.. गहिवरून आल थोड.. पण स्पर्धेच युग आहे आपण मागे राहता कामा नये म्हणून मी आधीच एक एजंट पकडला होता... हे मी त्या गँगला सन्मानपूर्वक सांगितल आणि document verification च्या काउंटरकड़े प्रस्थान केल. तिथे भली मोठी रांग.. एजंटला फोन केला तर तो म्हणाला साहेब थोडा वेळ थांबा तिथे, मी सेट्टिंग करतो.. त्या दिवशीचा "one day देवमाणूसच" तो माझ्यासाठी.. गप्प उभा राहिलो.. तसही भारतीयाला "रांग" हा प्रकार काही नविन नाही.. बराच वेळ ताटकळत उभारल्यानंतर कुणीतरी ओरडल.. "Ladies ची लाइन वेगळी करा".. माझ्या नंतर तासाभराने आलेल्या ladies direct साहेबाच्या टेबल जवळ जावून उभ्या राहिलेल्या पाहून "स्त्री - पुरुष समानता : एक सामाजिक गरज" ह्या विषयावर दहावीमध्ये लिहिलेला निबंध आठवला आणि गालावर हसू उमटल..

जवळपास अडीच तासानंतर माझ एजंटच्या आशिर्वादाने document verification झाल आणि मला समजल की आता online test द्यायची आहे.. माझी टरकलीच.. हयात फेल झालो टर उद्या परत ह्या नरकात याव लागणार ह्या भीतीने मी तिथून एक paplet विकत घेतल ज्यावर सगळी traffic सिग्नल्स ची चिन्हे आणि त्यांचे अर्थ होते.. आणि पाठांतर सुरु केल.. बऱ्याच वर्षा नंतर "पास नापास" category मधल tention अनुभवत होतो मी.. शाळेत यायच ना अगदी तस.. :) शेजारी एक मुलगा येवून बसला आणि त्यानेही माझ्या बरोबर अभ्यास सुरु केला..

exam hall मध्ये पाय ठेवला आणि आठवनींचा वेग वाढला.. क्विंचित कमी उजेड असलेला मोठा हॉल.. त्यामध्ये योग्य अंतरावर ठेवलेली बाकडी.. समोर फळा वाटावा अशी स्क्रीन होती.. माझ्या हातात शेवट पर्यंत वाचून काढलेला अभ्यासाचा कागद.. पाठीवर bag आणि मनात एकच हुरहुर.. "पास की नापास"... सगळ अगदी शाळेत होत तस हुबेहूब.. आठवून आठवून प्रश्नांची उत्तर दिली.. अणि result flash होताना एक विचित्र धाकधुक जाणवू लागली.. माझा result जवळ येइल तशी ती धाकधुक वाढली आणि 10 पैकी 8 मार्क पडल्याचे समजताच आनंदाला पारावार उरला नाही.. त्या hall मधून बाहेर आलो तरी माझा आनंद संपता संपेना.. वेड़ेपनाच होता.. "साल्या साधी RTO ची चिंधी exam पास झालायास तू.. त्यात काय एवढ" असा माझा मेंदू मला म्हणत होता पण मन मात्र आनंदात होत.. :) माझ्याबरोबर अभ्यास केलेला तो मुलगा सुद्धा पास झाला होता.. तो सुद्धा आनंदाने मला भेटून गेला..

License येण्याची वाट पाहताना मला एक जानवल.. आजही त्या शाळॆची ओढ़ मनात लपले कुठेतरी.. पण अस का?? तस पाहायला गेल तर आजचे दिवस तेव्हापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत.. खिशात हक्काचा पैसा खेळतोय.. MNC चा जॉब आहे.. स्वताहाच घर आहे.. गाडी आहे.. स्वातंत्र आहे.. शाळॆत असताना तर ह्यातल काहीच नव्हत.. मग अजुन त्या दिवसांची ओढ़ का आहे.. मग समजल.. तेव्हा आपण फ़क्त दोनच गोष्टींचा विचार करायचो.. "पास की नापास".. बस... बाकी काही नव्हत... स्वच्छ होत मन.. कसलीही अनिच्छीतता नव्हती.. माणसांची गुंतागुंत नव्हती.. आयुष्याच्या syllabus पेक्षा पुस्तकाचा syllabus खुपच सोपा होता.. तेव्हा जखमांची मजल फ़क्त गुढग्यापर्यंतच होती.. हृदयापर्यंत नव्हती.. क्रिकेट खेळताना पाऊस आला की stumps घेवून सायकलवरुन मस्त भिजत सुटताना अक्षांश रेखांशांची गणित मांडायची कधी गरजच नाही पडायची.. एका वर्गात पास झाल की पुढच्या वर्गात जायच्या आधी पास होण्याचा आनंद उपभोगायला भरपूर वेळ मिळायचा.. छोट होत विश्व.. आनंदाची व्याख्या सुद्धा सोपी होती.. may be म्हणुनच ओढ़ आहे अजुन त्या दिवसांची... License collect करण्यासाठी माझ नाव पुकारल अन मी भानावर आलो... त्या exam हॉल मध्ये पंधरा मिनिटांची मी चिमुकली शाळा अनुभवली.. बऱ्याच वर्षानंतर थोड़ा वेळ बालपण जगलो.. छान वाटल.. :)

Saturday, February 11, 2012

मांडायला चुकलेली गणितं...


शनिवारची सकाळ... गरमागरम नाश्ता आणि चहा हादडून झाला होता.. पेपर सुद्धा वाचून झाला... रूममध्ये निवांत एकटाच "काय कराव बर" असा विचार करत पडलो होतो.. आठवल.. कपडे धुवायचे आहेत.. पण काही आठवलच नाही अस समजुन मी "काय कराव बर" हा विचार continue केला. अनेक वर्ष घराबाहेर राहून मी नाक मुरडत का असेना पण फ्लॉवरची भाजी सुद्धा खायला शिकलो पण कपडे धुवायचा कंटाळा मात्र शाबूत आहे. मग आठवल.. तीन चार दिवसांपूर्वी बिल्डरचा फोन आला होता... "साहेब, installment चा चेक तेवढा आणून दया हो" अस म्हणाला होता.. "हिशेब करुन weekend ला भेटायला येतो" अस सांगुन मी त्याला टोलवला होता... माझ्या flat चा बिल्डर आणि मी loan घेतलेली bank हे दोघेही मला कितीही जरी लुबाडत असेलना तरी त्यांची मला साहेब म्हणून हाक मारण्याची अदा मला फार आवडते.. :) मला एक समजलय.. जो सर्व पोलिसाना साहेब म्हणून हाक मारतो आणि ज्याला सगळे चोर साहेब म्हणून हाक मारतात तो म्हणजे आपल्या देशाताला common man ... accidently तेव्हा माझ्याजवळ माझा handset आणि laptop नव्हते... म्हणून थोड नाईलाजानेच जवळ पडलेला पेन पेपर उचलला आणि हिशेबाच गणित मांडल....
सात त्रिक एकवीस... एकवीसातला एक हातच्याला आले दोन.. बे त्रिक सहा आधिक दोन आठ... गणित सोडवता सोडवता मला कसतरी झाल.. हे शब्द कुठे लपले होते.. वारुळातुन एका मुंगी पाठोपाठ अनेक मुंग्यांची रांग बाहेर पडावी तसे ते बाहेर पडत होते.. शाळॆत असताना जे रोज म्हणायचो ते ह्या आधुनिक जगाच्या automated calclulations च्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलोय आपण अस जाणवल मला... गणित हा माझा फार आवडीचा विषय.. त्याच उलगडत जाण मला फार आवडत... तस पाहायला गेल तर गणिताच आणि आपल खुपच जवच नातं...गणित हा एकमेव विषय आहे ज्याचा स्वभाव आणि आपल्या आयुष्याच्या philosophy चा स्वभाव खुप मिताजुता आहे... अनेकदा बोलताना सुद्धा आपण "सगळ गणितच चुकल यार" किंवा "गणितं कशी सुटत गेली समजलच नाही नई" अस अनेकदा बोलून जातो... थोड़ा deep मध्ये जावून विचार केला तर आपल्याला आयुष्यात भेटलेली माणस, त्यांचे स्वभाव किंवा आयुष्यात आलेले अनुभव हे सगळ गणितांसारख वाटत....
जस की... काही गणित आपल्याला हक्काची वाटतात .. ती सुटणार म्हणजे सुटणार.. हे आपले marks fix आहेत ह्याचा आपल्याला अफाट आत्मविश्वास.. पेपरला जायच्या आधी त्यांचा अभ्यास केला काय आणि नाही काय पण ती आपल्याला कधीच धोका देणार नाहीत ह्याची खात्री असते... आणि बरयाचादा ती सुटतात सुद्धा.. पण कधी कधी चुक होते त्याना गृहित धरण्याची... ऐन वेळी अनुत्तरीत राहून कायमचा धडा शिकवून जातात... काही गणित सोडवायला खुप अवघड... आपण option ला ठेवलेली... बघू तरी try मारून म्हणून आपण पराभवाची पूर्ण खात्री असताना सुद्धा सोडवायला जातो आणि ती नकळत सुटतात... "miracle happens" म्हणत हसत हसत marks देवून जातात...
पण मला आज पर्यंत सगळ्यात जास्त विचार करायला लावलय ते म्हणजे मांडायला चुकलेल्या गणितानी.. गणिताचा थोडासा विचित्र प्रकार.. पाहता क्षणी challenging वाटतात ही गणित म्हणून आपण सोडवायला घेतो... प्रत्येक पायरी नंतर उत्तरा जवळ पोहोचल्याचा भास्.. पण फ़क्त भासच... मग चुकल्याची जाणीव.. खाडाखोड.. पुन्हा नव्याने मांडणी.. पुन्हा खाडाखोड... नक्की काय चुकतय समजतच नाही.. प्रमेय... सिद्धांत.. गणिताचे नियम.. सगळ सगळ बरोबर अभ्यास करुन प्रत्येक पायरी जपून पुढे जातोय पण उत्तर का मिळत नाहीये.. पांढरयाशुभ्र आयुष्याच्या पेपर मध्ये एका गणिताची खाडाखोड़ फार त्रासदायक वाटू लागते... द्वंद्व.. चक्रव्यूह.. जितके हे शब्द अवघड तितकीच ती परिस्थितीसुद्धा... मग येते निडरता.. परिस्थीतीविरुद्धची बंडखोरी... साला फेल झालो तरी बेहत्तर पण हे गणित परत सोडवायला घेणार नाही.. अस म्हणून आपण ते अर्धवटच सोडून देतो.. त्यानंतर पिक्चर मध्ये येतो सगळ्या जखमांच्या औषधांचा बाप.. काळ... कालांतराने आपल्याला समजुन चुकत की त्या गणिताची मांडणीच चुकली होती.. त्याच्या नशीबी उत्तर नव्हतच.. "माझी वेळच वाईट होती" म्हणून आपण सगळा दोष काळावर टाकतो.. काळ सुद्धा ते गणित फ़क्त attempt केल म्हणून आपल्याला शहापणाच्या रुपात पैकीच्या पैकी मार्क देतो.. आपण शहाणे होतो.. :) अनुत्तरीत राहूनसुद्धा बरच काही देवून जातात... मांडायला चुकलेली गणितं....
ह्या गणितांच्या लाटांमध्ये बिल्डरच्या हिशेबाच वाळुच घर कधी वाहून गेल समजलच नाही.. आता येईल परत त्या चोराचा फोन आणि विचारेल.. "साहेब, हिशेबाच गणित सुटल का हो?"