Saturday, February 12, 2011

जाने क्या चाहे मन.. बावरा...

'आज मन लागत नाहिये यार'... 'मनाला कोण समजावनार'.... 'माझ मन तिच्यात गुंतलय' ... बाप रे. मन मन आणि नुसत मन. गोंधळ घातलाय ह्या मनाने सगळीकड़े.. एक दिवस ठरवल, थोड़ा वेळ काढून ह्या मनाला एकट गाठून जाब विचारायचा... बस झाले ह्याचे नखरे. खुप खुप प्रयत्न केल्यावर शेवटी माझ्या तावडीत सापडल.. घट्ट पकडून हाता पायाला दोरयाने बांधून मी त्याला समोर बसवल... अन सुरु झाली एक कहानी.. कहानी एक पण कलाकार दोन... एक मी अन माझ मन !!!!!
हुबेहूब माझ्यासारखा चेहरा, पण डोळ्यात आकाशा इतका अफाट आत्मविश्वास... चेहर्यावर कोणत्याही प्रश्नाच सहज उत्तर देइन अशी गुर्मी... कुणालाही घाबरत नसल्याचा अविर्भाव !! थोडा वेळ एकमेकांच निरिक्षण केल्या नंतर मीच विचारल... 'अरे मना, हा काय खेळ मांडला आहेस तू.. किती वेळा सांभाळुन घ्यायच तुला, बस कर हे पोरखेळ आता.. सगळ सुरळीत चालु असताना मध्येच तुला काहीतरी विचित्र सुचत असत.. Be Practical यार... अरे खुप साधी straight forward system तयार केले आम्ही... moday to friday काम आणी बाकीचा वेळ आराम.. पैसा कमावायचा, घर घ्यायच, मग लग्न, बायको मूल.. परवडली तर एखादी कार.. बस ना मित्रा अजुन हवच काय.. पण साला तू problems add करतोस... मध्येच कुणाच्या तरी आठवनीने हैरान होतोस.. कुठेतरी एकटाच भटकायला जातोस.. उगाचच विनाकारण उदास होतोस.. बस कर यार हे सगळ.. फ़क्त मीच नाही तर संपूर्ण मनुष्य जात तुमच्या community वर वैतागली आहे.......' ऐकता ऐकता मध्येच मला थांबवून माझ मन म्हणाल, 'तुला आठवतय, लहानपणी एकदा पावसाच्या पाण्यात तू पहिल्यांदा कागदाची होडी बनवून सोडली होतीस.. आकाश ठेंगन झाल होत तुज ती तरंगत जात असलेली पाहताना.. आठवतय?' मी हसून म्हणालो 'हो, ते कस काय विसरीन मी'...... 'नाही विसरलास ना... कारण ती होडी बनवायला मी तुला संगितल होत.. तेव्हा तू माझ सगळ ऐकायचास.. खुप जवळ होतास तू माझ्या... ' मी विचारत पडलो.. काय बोलावे समजेना.. जाब मी विचारणार होतो पण व्यथा त्याच्याच होत्या.
थोड़ा आवाज वाढवून मला म्हणाल 'अरे वेड्या, ह्या तुझ्या so called straight forward system मध्ये तू हरवून गेला आहेस... ती होडी वाहत गेली तसाच तुही जात आहेस.. दिशाहीन प्रवासावर.. तेव्हा पडायचा अगदी तसाच पाउस परवा सुधा पडला.. पहिला पाउस.. आ हा.. मला स्पर्श करणारा पावसाचा तो पहिला थेंब.. मी ओरडून सांगत होतो तुला आतून की सोड ती गाडी बाजुला.. उभा राहा.. पसरव तुझे हात.. अन घॆ ते थेंब डोळ्यावर.. त्या क्षणात आयुष्य लपल होत यार.. पण तू नाही ऐकल माझ.. होर्न वाजवत उभा राहिलास वैतागुन.. ' मला काय बोलावे समजेना... पण बोलायच थांबेल ते मन कसल..
'आन्द्या, सच्या, संत्या ची जागा ऑफिस मधल्या Mr. आनंद, Mr.सचिन आणि Mr. संतोष ने घॆतले.. शिवी देवून हाक मारणारी ती आत्मीयता कुठेतरी हरवून आलायस तू.. किती वेळा संगितल तुला की कर फोन त्या वेड्या मित्राना, जा भेटायला अचानक आणी मार एक जोरदार मीठी.. सांग त्याना की तू त्याना फार मिस करतोस ते.. अन बघ तेव्हा त्यांच्या डोळ्यात... त्यांचीही मन ह्याचीच वाट बघत असतील... मार एकदा ऑफिस ला सुट्टी आणि जा कुठेतरी long drive वर त्यांच्या बरोबर...
बाबाना हळूच एकदा टपरीवर घेवून जा.. दोन कट्टिंग ची ऑर्डर दे आणि बाबाना सांग की आज पर्यंत सगळ्या best friends बरोबर कट्टिंग शेयर केला पण better than best राहुनच गेला होता.. अन बघ तेव्हा त्यांच्या डोळ्यात...
एक दिवस पहाटे लवकर उठून आई साठी नाश्ता बनव आणी तिला देवून सांग की आई, तुला तुझ्याच नजरेतून पहायचा हा माझा छोटा प्रयत्न.. अन बघ तेव्हा तिच्या डोळ्यात..
रोजच्या scheduld मधून थोडासा वेळ काढून एकदा अर्धा तास उभा राहून सूर्यास्त बघ... त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मार... त्याच्याही मनाला बर वाटेल...
मला आणि ह्या सर्वांच्या मनाला तुझ्या so called straight forward system मधले packages नको आहेत रे.. आम्हाला फ़क्त आमच्या हाकेला तुझी मनमुराद साद हवी आहे.... हे सगळ सांग तुझ्या मनुष्य community ला... मन हरवलेली नाहीत रे मित्रा... माणुस हरवलाय...'
मी निशब्द होवून माझ्याच मनाच ऐकत उभा होतो.... कित्येक प्रश्न रोज पडत असतात.. अन त्यांची उत्तर मला माझ्याच मनात उलगडली...
मला गंभीर पाहून थोड्या तिरकस नजरेने माझ्याकडे पाहत मला म्हणाल,' अजुन एक महत्वाच... तुझी ती close friend त्या दिवशी लाल साडी मध्ये खुप छान दिसत होती ना.. मग तस बोलला का नाहीस तिला...' मी हबकलो.. ह्या साल्याला हे कुठून समजल.. मग आठवल हे तर आपलच मन आहे.. गंभीर विषयांची जागा गुलाबी विषयाने घेतली होती.. मी त्याला बजावल 'हे बघ मना, ह्या matter पासून तू दूर राहा.. बाकी सगळ पटलय मला तुझ.. पण इथे नेमक तुझ घोड़ मार खात.. अरे किती चेहर्या मध्ये शोधत असतोस तू "ती" ला... कोण आहे तरी कोण तुझी स्वप्नसुंदरी.. प्रत्येक रोमांटिक गाण्याबरोबर तिची आठवण काढत असतोस... मला एखाद print out दे तिच्या चहर्याच.. नाव गाव...काहीही माहित असेल तर सांग.. मी search मारतो.. एकापेक्षा एक भन्नाट search engines आहेत आमच्याकडे... ही हुरहुर थांबव आता'.............
माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसल... हाता पायाला बांधलेले दोर आपोआप हळुवार निसटले.... मी वेडा इतका वेळ समजत होतो की मी त्याला बांधून ठेवल होत.. पण मनच ते.. त्याला कोण कस बांधणार.. त्याने मला घट्ट मीठी मारली.. बरयाच दिवसानी कुणीतरी "आपल" मीठीत आल्यासारख वाटल... खुप बर वाटल.. पण भानावर येवून मी विचारल.. सांग.. कोण आहे ती.... तर english इस्टाईल मध्ये हळूच माझ्या कानात म्हणाल... "Some feelings are better to be just feeled than expressed" ....... अन भुरकन उडून गेल..मी एकटाच हसत त्या स्वच्छंदी मनाला उडताना पाहत उभा होतो.. रोज पाहतो तसा... !!!

Friday, January 28, 2011

मैफील

15 सप्टेंबर 2002 .... इंजीनीरिंग करायच्या निमित्ताने मी पुण्यात आलो.. लहान वयात इतक मोठ शहर मी पहिल्यांदाच पाहात होतो.. मोठ मोठे रस्ते, अफाट गर्दी, उंच उंच इमारती पाहून मन जितक उड्या मारत होत तितकच घाबरल सुद्धा होत. हॉस्टल मध्ये प्रवेश घेतल्यावर काही दिवसातच नवीन मित्रांची मैफील जमली. मित्रांच जग म्हणजे अद्भुत जग..तिथे प्रत्येक जन खर्या अर्थाने स्वताहाला जगत असतो.. बंधन,नियम, चालीरीती सगळ सगळ तडीपार केलेल मन ते तिथेच मिळत.. आणि त्याच स्वप्नवत जगात मला तो भेटला.. माझा एक मित्र..
"First impression is last impression " अस म्हणतात. पण मला नाही पटत.. त्याच्याही बाबतीत तसच झाल. पहिल्या भेटीत अबोल आणि reserved minded वाटलेला नंतर हळुहळु उलगडत गेला. कदाचीत ह्यालाच हे जग मैत्री म्हणत.. मस्त ग्रुप बनला होता आम्हा मित्रांचा. नुसता दंगा, मस्ती अन जोडीला बेधुंदी.. तारुण्याची दूसरी व्याख्या तरी कुठली.. एकापेक्षा एक नमूने एकत्र आले होते. टपरीवर रोज मस्त गप्पा रंगत होत्या.. आमच्या ग्रुप मध्ये क्रिकेट ची खुप खुप आवड तशी फ़क्त मला आणि त्यालाच होती.. त्यामुळे क्रिकेट ची मॅच असली की तो आणि मी २-२ तास टपरीवरच्या टीवी समोर पडीक असायचो.. १ कटिंग दोघेजन २ तास पुरवायचो.. फोर मारली की टाळी देण, विकेट पडली की शिव्या देण.. अन मॅच हरता हरता जिंकली की आनंदाने मिठी मारण.. ह्या सगळ्यात backlog subjects विसरून जायचो आम्ही..
तो स्वभावाने हळवा.. हसत हसत डोळ्यातल पाणी लपवनारा.. अन अश्रु जमलेल्या डोळ्याना हसवणारा. घरची परिस्थिती बेताची.. वाईट दिवसात फ़क्त एक वेळ जेवलेल पाहिलय मी त्याला. मन भिरभिरायच ते सगळ पाहून. पण ती वेळच जिद्दी होती अन तो त्याहुनही जास्त. BE च्या तिसरया वर्षात असताना एक अपघातात त्याचा पाय दुखावला होता.. त्यामुळॆ त्याचे तीन विषय राहिले. लहान मुला सारखा खांद्यावर मान ठेवून रडला.... पण पुन्हा भरारी घेत त्या वर्षी फर्स्ट क्लास पटकावला त्याने.. त्याच्या नकळत बराच काही शिकत गेलो मी त्याच्या कडून.. उत्कृष्ट स्वयंपाकी, खुप छान मिमिकरी करणारा, नाटकात अभिनय करणारा अशी अनेक रूपे त्याची..
हसत खेळत आम्ही सगळे इंजिनियर झालो.. अनेक आव्हाने साद घालत होती.. त्यालाही जॉब ची अत्यंत गरज होती.. ६ महीने अफाट struggle केल्यावर एके दिवशी पळत पळत त्याने मला मिठी मारली.. आणि कानात "जिंकलो" अस म्हणाला.. आजही ते शब्द जसेच्या तसे आहेत.. त्या दिवशी मला celebration ह्या शब्दाचा अर्थ गवसला..
नंतरची काही वर्ष मस्त मजेत गेली.. एकेक डोंगर पार करत आम्ही झेंडे फडकावत चाललो होतो..टू व्हीलर घेतल्यावर पहिल्यांदा मला भेटायला आला.. मस्त राईड मारून आम्ही काफ्फी चा आस्वाद घेतला.. जुने दिवस आठवत एक मेकांची मस्करी करत दिवस मजेत जात होते.. आयुष्याने रंग बदलले होते.. आता जग आपल आहे अशा आवेशात जगत होतो आम्ही..
5 ऑगस्ट 2008 ... सकाळी 10.30 ला ऑफिस समोर पोहोच ल्यावर मी माझा मोबाइल पहिला तर 16 मिसकॉल्स.. मी callback केल्यावर बातमी समजली की तो एका रोड अपघातात आम्हाला सोडून गेला.. पायाखालची जमीन सरकली.. डोक सुन्न झाल.. पुढचे 5 -10 मीनीट मी सर्वस्व हरवल्यासारख रस्त्यावर उभा होतो..सगळ डोळ्यासमोर आल.. तो परत कधीच भेटणार नाही हे मनाला काही केल्या पटेना.. आजही नाही पटत.. त्याच्या अंत्य दर्शनाला ढसाढसा रडलो आम्ही.. देवाचा मला इतका राग कधीच नाही आला जितका त्यादिवशी आला होता.. सगळ एक क्षणात संपल.. आम्ही हतबल होवून पाहत राहिलो.. त्या दिवसापासून मनात एकाच प्रश्न सदैव पडतो.. त्याच काय चुकल होत?? आणि उत्तर त्या विधात्याकड़ेही नाहीये..
आजही क्षणोक्षणी त्याची आठवण येत असते.. मित्रांच्या मैफीलीत गप्पा रंगल्या की त्याचा उल्लेख आणि डोळ्यात पाणी हे आता ठरलेल.. मन उदास झाल की मग रंगतात त्याच्याशी गप्पा.. तो नाही बोलत.. फ़क्त ऐकतो.. विनोदाना टाळी देतो.. यातनाना डोळ्यात पाणी आणून सांत्वन करतो. माणस दूर नाही जात कधी.. ती सदैव असतात बरोबर.. आठवनींच्या रूपात.. खुप वाटत की स्वर्ग असावा.. इथला प्रवास संपल्यावर त्याची पुन्हा तिथे भेट व्हावी.. पुन्हा एकदा मैफील जमावी.. त्याची अन माझी...