Wednesday, September 13, 2023

तरुण म्हातारा

 


मला रनिंगची खूप आवड आहे. Running comunity मध्ये "सातारा हिल मॅरेथॉन" ला एक वेगळं महत्व आहे. तशी ही जगप्रसिद्ध मॅरेथॉन, पण त्याहीपेक्षा ओळखली जाते ती प्रचंड अवघड, निसर्गरम्य अशा घाटातल्या running route साठी. मी ह्यावर्षी पहिल्यांदाच ह्याचा अनुभव घ्यायचं ठरवलं. ३ सप्टेंबर ला होणाऱ्या ह्या मॅरॅथॉनसाठी आदल्या दिवशी मी माझ्या मित्रांसोबत साताऱ्यामध्ये पोहोचलो.आदल्या दिवशी expo असतो जिथून मॅरेथॉनच किट collect करून आम्ही बाहेर पडत होतो इतक्यात एक्सपोच्या गेटजवळ एका व्यक्तीने आम्हाला हात दाखवत लिफ्ट मागितली. वयाने जवळपास 45-50 च्या दरम्यान दिसत असलेल्या त्या इसमाला आम्ही सोबत घेतलं आणि सातारा शहराकडे निघालो.

बोलायला इंग्रजीतून सुरुवात आणि typical tune वरून ते दक्षिण भारतातले वाटत होते. "where have you come from Sir?" मी सहज विचारलं. "I am Shrini from calicut, Kerala... I have come to participate in the hill marathon for the fourth time."... आम्ही सगळे मित्र एकमेकांकडे बघतच राहिलो. केरळवरून हा माणूस फक्त hill मॅरेथॉन पळायला आलाय हे सत्य पचवायला थोडा वेळ लागला.. मग थोड्या गप्पा रंगल्या... रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडायची विनंती करणाऱ्या त्या पाहुण्याला आम्ही हट्टाने त्यांच्या हॉटेलच्या दारात नेऊन सोडलं... "may I please ask your age Sir?" मी कुतूहलाने विचारलं. आमची reaction काय असणार ह्याचा आधीच अंदाज आलेले ते मिश्कीलपणे हसत म्हणाले.. " I am 63"... गाडीत बसलेलो आम्ही सगळे तिशीतले तरुण त्यांच्याकडे थोडे क्षण बघतच राहिलो... हॉटेल समोर गाडीतून उतरताना मला all the best देऊन ते निघून गेले... एक त्रेसष्ट वर्षांचा "म्हातारा", retired होऊन मस्त पेंशन घेत, BP शुगरच्या गोळ्या खात नातवंडांबरोबर खेळत बसायच्या वयात केरळ वरून ट्रेनने शेकडो किलोमीटर दूर साताऱ्यात येतो काय, एक्स्पो ला येऊन किट कलेक्ट करून हॉटेलवर उतरताना दुसऱ्या दिवशी २१.१ किलोमीटर्स, ते सुद्धा घाटातल्या रस्त्यावरून पळायच्या तयारीला लागतो काय... अजबच सगळं...

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ढोल ताश्यांच्या गजरात मॅरेथॉन सुरु झाली.. एखाद्या सणासारखं प्रफुल्लित आणि उत्साही वातावरण होत.. स्वतः मधील उरला सुरला ego संपवायचा असेल तर निसर्गाने निर्माण केलेल्या hills ना पळत सामोरे जायचं, आपोआप विनम्रता येते.. निसर्गासमोरची आपली क्षुल्लकता सिद्ध होते.. मी 2 तास 40 मिनिटात 21.1 किलोमीटर्सची 430 मीटर उंचीवरच्या hill route ची मॅरेथॉन पूर्ण केली. सुदैवाने ते पुन्हा भेटले.. मी विचारलं.. "how was your marathon Sir?"... ते म्हणाले.. "not as expected, completed in 2 hours 25 mins.. will try to beat this time next year "... जानेवारी पासून तयारी केलेल्या माझ्यासारख्या तिशीतला तरुणापेक्षा १५ मिनिटं आगोदर ही मॅरेथॉन पूर्ण केल्यावर ते "म्हातारे" आजोबा म्हणत होते की "not as expected".... ते ऐकल्यावर माझी साताऱ्याची फेरी पूर्णत्वास गेली...निसर्गाने आपल्याला ह्या शरीराच्या रूपाने अक्षरशः भरभरून दिलंय, ते सुद्धा अगदी फुकटात... त्याची किंमत काही मोजक्या लोकांनाच समजते... आयुष्य हा एक उत्सव आहे हे ज्याला उमगलं फक्त तोच जगला म्हणायचं.. नाहीतर रडगाणी गात नुसतंच दिवस ढकलणारे रोज कित्येक भेटतात..

आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले... .मी विचारलं... "can I take one selfie with you Sir?".... सेल्फी घेतल्यावर थोडं confuse चेहऱ्याने मला म्हणाले.. "by the way, why did you take selfie with me?".... मी म्हंटल, "Sir, because I want my 63 years old version to be exactly like you"... हसत हसत निरोप घेताना ते म्हणाले.. "see you on the finishing line next year"...

घरी आल्यावर बायकोला त्यांचा फोटो दाखवत म्हणालो... साताऱ्यात एक "तरुण" भेटला होता... 

Friday, March 17, 2023

गुंतागुंत

 



२०२० मधला एक दिवस... Lockdown नावाचा नवखा शब्द आयुष्याचा महत्वाचा भाग होऊन बसला होता. पुण्यात पहिल्यांदाच दिसलेलं निळं स्वच्छ आकाश बघत, चहाचा आस्वाद घेत मी  balcony मध्ये उभा होतो. "जगाचा अंत जवळ आलाय" वैगेरे वैगेरे दरवर्षी येणारे seasonal विचार डोक्यात होते.. एव्हाना वर्क फ्रॉम होमच नावीन्य संपलं होतं.. रोज onsite मारणाऱ्या ऑफिसच्या टीफिन बॉक्स ने इतर भांड्यांसोबत जुळवून घेतलं होतं, Formal shoes नी माझ्याकडे रोज आशेनं बघणं सोडून दिलं होत.. सगळ्या जीन्सनीं बर्मुडा धर्म स्वीकारायची मानसिकता एव्हाना स्वीकारली होती...

चहा पिता पिता माझी नजर बाल्कनी च्या वरच्या कोपऱ्यात गेली..  ह्या सगळ्या 'मानवनिर्मित' गदारोळात एक चिमणी मात्र तिच्या पिलांसाठी घरटं बांधायच्या गडबडीत मग्न होती. तिला बिथरलेल्या माणसाचं थोडसुद्धा सोयरसुतक नव्हतं .. एक एक काडी आणून ती architects ना लाजवेल असं घरटं सजवत होती... तीचं ते घडवणं पुढचे काही दिवस माझ्या चहा time चा अविभाज्य भाग झालं .. मी खूप बारकाईनं तिचं येणं-जाणं, तिची धडपड बघत होतो.. एक दिवस मला हिची पिल्लं बघायला मिळणार , त्या घरट्यातून हळुवार माझ्याकडं बघणारं हा विचार माझ्या मनाचं lockdown रोज शिथिल करत होता .. तिच्या काड्यानी बाल्कनी मध्ये रोज पसारा होत होता पण आम्हाला ते लोटताना काही वाटत नव्हतं .. तीच घर पूर्ण होण्याच्या जवळ आलं तेव्हा वाटलं आपण रोजच्या धावपळीत हे कितीतरी वर्ष miss केलंय.. lockdown चा काहीतरी फायदा झाला म्हणायचं.

असंच एक दिवस चहा चा कप घेऊन बाल्कनी च्या वरच्या कोपऱ्यात नजर टाकली ... तिथे घरटं नव्हतं तिचं.. धस्स झालं .. खाली बघितलं तर जवळपास पूर्ण झालेलं घरटं बाल्कनी मध्ये कोसळलं होतं... खूप मन लावून, सगळी एकाग्रता एकटवून आयुष्याची पुंजी गुंतवून उभारलेल साम्राज्य एखाद्या पत्त्यांचा बंगल्याप्रमाणे एका क्षणात कोसळावं ? इतकी का क्रूर असावी नियती....   तिची पावसात भिजणारी पिल्लं माझ्या डोळ्यासमोर आली .. महिनाभर धडपडून पिल्लाना पाऊस लागू नये म्हणून तीन सजवलेलं घरटं एका वाऱ्याच्या झुळुकेसमोर हरलं होतं.. माझी चहाचा घोट घ्यायची हिम्मत होत नव्हती ..माणसाचा स्पर्श झाला म्हणून ती ते घरटं परत वापरणार नाही ह्या विचाराने त्या घरट्याला हात लावायची हिम्मत होत नव्हती ..  इतक्यात ती चिमणी आली.. एक क्षण त्या वरच्या कोपऱ्यात बसली .. तिने ते खाली पडलेलं घरटं कसतरी वर न्यावं असं वाटत होत.. पण पुढच्या क्षणाला ती उडून गेली..परत काड्या गोळा करायला गेली वाटतं वेडी .. इथेच पडलेलं घरटं हळू हळू काड्या वर नेल्या असत्या तर  वेळ वाचला असता.. माझ्यातला "माणूस" पुटपुटत होता.. reusability वैगेरे concepts त्या अडाणी  चिमणीला सांगत होता.. खाली पडलेलं घरटं आम्ही पुढचे एक-दोन आठवडे उचललं नव्हतं पण तिने त्याच्या एका सुद्धा काडीला स्पर्श केला नाही .. पुढच्या काही दिवसात तिने नवीन घरटं पुन्हा उभा केलं .. त्याच ठिकाणी, नवीन जिद्दीनं ..

   तीने जो एक क्षण त्या कोपऱ्यात बसून घालवला होता त्यातून मी बरंच शिकलो... ती तिच्या त्या जुन्या घरट्यात एक क्षणापुरती सुद्धा गुंतली नव्हती .. खाली कोसळलेल , तिने काडीकाडीने बनवलेलं , स्वप्नांनी भरलेलं , तिच्या पिल्लांच्या हक्कांचं घर तिने ढुंकूनही बघितलं नाही .. "काय होतं" "काय झालं" ह्यात एक क्षण सुद्धा न गुंतता "काय आहे" ह्यावर ती स्वार झाली ... तिला विधात्यानं दिलेल्या तिच्या पंखावर... सगळं संपलं असं मला वाटलं पण तिने तिचे पंख आणि त्यातली ताकद एव्हढ्यावरचं focus केला.. घरटं पुन्हा उभा केलं , तिची पिल्लं रमली घरट्यात त्या वर्षीच्या पावसाळ्यात .. काही दिवसांनी आम्ही तिचं पडलेलं घरटं जड मनाने उचललं .. "आहे त्या क्षणात कसं जगायचं" ह्याचा फॉर्मुला शोधायला overthinking मध्ये गुरफटलेला माणूस वेड्यासारखं धावतोय, सुख शांती शोधतोय... पण ती "अडाणी" चिमणी हे वरदान विधात्याकडूनच घेऊन आले.. म्हणुनच कुठल्याही wild life फोटोग्राफरला रडणारी चिमणी कॅमेरात कैद नाही करता आली आजपर्यंत...  माणसाला बुद्धिमत्तेचं वरदान मिळालंय पण "गुंतागुंती"चा शाप मात्र जाता जातं नाही..

त्यानंतरचा प्रत्येक वर्षी एप्रिल-मे च्या दरम्यान मी बाल्कनीच्या त्या कोपऱ्यावर नजर टाकतो.. ती परत येईल ह्या आशेवर.. पण जी स्वतःच्या घरट्यात नाही गुंतली ती माझ्या घरट्यात तरी कशी गुंतून राहील म्हणा.. नाही आली ती परत, मी मात्र तिच्या येण्याच्या आशेवर कायम आहे .. शेवटी मी पण माणूसचं, गुंतागुंत सुटता सुटत नाही...