त्या दिवशी पहाटे ५ वाजता
उठलो. पुण्यातून कोल्हापूर गाठायचं होत आणि कारमधून मी एकटाच जाणार होतो. उठल्यापासून
दिवस वेगळा आहे हे जाणवत होत. माझं आयुष्यातलं सर्वात मोठं प्रमोशन होणार होत त्या
दिवशी. मी सहसा देवाच्या मूर्तीच्या पाया पडत नाही पण त्या दिवशी देवाच्या पायावर डोकं
ठेवलं. सगळं सुरळीत पार पडू दे म्हणालो आणि पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने बाहेर पडलो.
माझं पूर्ण लक्ष मोबाईलकडेच होत.. तासाभराचं अंतर पार केल्यावर मोबाईल वाजला... गाडी
बाजूला घेऊन उचलला... माझे सासरे म्हणाले.. मुलगी झाली... कधी एकदा बाहेर पडतोय म्हणून
वाट पाहत बसलेले आनंदाश्रू कधी बाहेर आले माझं मलाच नाही समजलं... 24 ऑगस्ट 2016 ला
मी एका सुंदर छकुलीचा बाबा झालो. पहिल्यांदा बाबाना फोन लावला आणि म्हणालो, बाबा आपल्या
घरी परी आली...
शास्रज्ञानी एवढे भले
भले शोध लावलेत पण आनंदाश्रुंसाठी वाईपर बनवता नाही आलेला त्यांना अजून. डोळे पुसत
पुसत कसा बसा मी कोल्हापूरला पोहोचलो. धावत पळत हॉस्पीटल मध्ये गेलो. माझी छकुली माझ्या
बहिणीच्या मांडीवर शांतपणे झोपली होती. गेल्या
वर्षी माझ्या बहिणीच्या लग्नात भावनांना आवर घालायचा खूप प्रयत्न करून सुद्धा मी ढसा
ढसा रडलो होतो. तिच्या खुशीत माझ्या मुलीला बघून वाटलं माझी बहीण माझ्या मुलीच्या रूपात
हक्काने माझ्या घरी परत आली. माझ्या मुलीच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवला आणि 'गर्भ'श्रीमंती शब्दाचा अर्थ कळाला..... मनापासून
विधात्याला साष्टांग नमस्कार केला... बायकोला भेटून म्हणालो, आपली परी खूपच सुंदर आहे... ते ऐकून बायकोनेही डोळ्यात साठलेल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली...
हॉस्पीटलच्या रूममध्ये
नातेवाईकांची फुल गर्दी झाली होती... एक जन्म आणि कित्येक नवीन नाती... बरीच नाती कित्येक
वर्षांनी भेटली... जूने-पुराणे मतभेद विसरून सगळे एकमेकांना आनंदाने भेटत होते... घरातलं
वातावरण पूर्ण बदलून जातं एक नवीन पाहुण्यामुळे... माझ्या परीने डोळे उघडायच्या आधीच
माझ्या आयुष्यातले बहुतांश प्रश्न सोडवले...
आयुष्यात प्रत्येक फेज
मी मनापासून जगलोय.. अगदी जस हवं तसं... शिक्षण, नोकरी, हक्काचा पैसा, गाडी, घर...
सगळं मला हवं तसं केलं... महासागराच्या लाटेवर
स्वार होण्यासारखा काळ असतो तो सगळा... बिनदास्त जगणं... लाट जिकडे नेईल तिकडे बिनादिक्कत
जाणं.. खूप मजा येते.. पण "अजून हवय" ची भूक त्या लाटा कधी भागवू शकत नाहीत...
ऊंच लाटा अंगावर स्वातंत्र्याचे शहारे देऊ शकतात पण शांत झोप नाही देऊ शकत... शांत
झोप फक्त किनाऱ्यावरच... माझ्या मुलीच्या पहिल्यांदा उघडलेल्या डोळ्यात मला माझ्या
आयुष्याचा किनारा दिसला... आता मला कशाचाही मोह नाही... कमावणं, गमवण हे सगळं गौण वाटायला
लागलंय ..
माझ्या मुलीने माझ्याकडे बघून हसावं आणि मी तिला कुशीत घेऊन आयुष्याच्या किनाऱ्यावर
लाटांकडे बघत शांतपणे झोपावं.. माझ्यासाठी आता आयुष्याची हीच व्याख्या झालीय..
