मंदिराच्या आवारात पोहोचलो. कार पार्क करण्यासाठी पावती फाडायला एकटा आला. तीस रुपये द्या. 'मंदिर आहे चिडायचं नाही' ह्या नियमाच पालन करून मी मुकाट्याने पैसे दिले. तो म्हणाला…"दर्शन घेवून या नंतर पावती देतो".. मग मात्र आपली सटकली... तीस रुपयात काय काय येत हे ऐकवून, त्याला तीन चार कोल्हापुरी शिव्या देवून (मनातल्या मनात बर का..) पावती घेवूनच मी निघालो. आत जाता जाता देवाच साहित्य विकणारे मागे लागले... त्या देवाच्या दर्शनाला जाताना ते घेवून जावच लागतं वैगेरे वैगेरे सांगणारे… बायकोची इच्छा म्हणून मी ते नाईलाजाने घेवून मंदिरात प्रवेश केला…. भली मोठी रांग आमची वाट पाहत उभी होती…. मेन रांग बायपास करायची असेल तर VIP रांग … पैसे देवून बर का… बर एवढी पण तुमची ऐपत नसेल तर फक्त मुखदर्शनचा सुधा पर्याय होता… जे लांबून आले होते ते "रिकामं जायचच नाही" म्हणून मेन रांगेत उभे होते… VIP तून गेलो तर 'देवाला वाईट वाटेल ना' हे पण त्यांच एक कारण होतच… जवळपास सगळ्याच्या चेहऱ्यावर एकंच यक्ष प्रश्न… "देवा, मीच का... सगळे प्रश्न माझ्याच वाट्याला का?" रोजच्या रोज त्या मंदिरात येवू शकणारे मुखदर्शन घेवून जात होते… परत येताना उलट चालत येत होते… देवाकडे पाठ करायची नसते म्हणे… म्हणजे परत येताना ह्यांच्या फक्त समोर देव असतो का? पाठीमागे देव नसतो का? मला पडलेला निष्पाप प्रश्न…. असो.. मेन रांगेत उभं राहून देवाच्या समोर यायचा योग आला.. वाटलं आता अद्भुत वाटेल... चक्क देव समोर… तेवढ्यात बाजूने दुसर्या भक्ताने धक्का देवून आणि समोरून देवाच्या स्वयंघोषित एजंटने "पुढे चला" ची डरकाळी देत मला चक्क ढकललं राव… मी आपल तेवढ्यात "देवा, ह्या सगळ्यांना माफ कर रे" म्हणत गर्दीच्या कृपेने आपोआप बाहेर आलो…
आमचं देवदर्शन झालं..
मी जेव्हा जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा मनशांती मिळन तर दूरच पण लोकांना देव समजलाच नाही ह्या विचाराने हैराण व्ह्यायला होत. बर कुणाला समजावून सांगाव की बाबानो तुम्ही जे करताय ते देवाला नकोय रे… तर नास्तिक म्हणून रिकामे होतात. मी देवाला प्रचंड मानतो… देव कुठे ना कुठेतरी नक्की आहे. कारण साधं सरळ आहे… जिथे creation असते तिथे त्याच्या creator असतोच… हे अद्भुत जग बनलय म्हणजे हे बनवणार कोण ना कोण तर नक्कीच आहे…आणि तो श्रुष्टीतल्या कणाकणांत आहे…त्याच्या मर्जीशिवाय इथल झाडाच पान सुद्धा हलत नाही.. त्याला कुठलंही नाव न देता फक्त देव म्हणून राहाण इतक कठीण नाहीये… पण त्याला नाव देवून अनेकांनी दुकाने थाटलेत.. आणि माझाच देव भारी म्हणून भांडत बसलेत.. अनेकांनी त्या देवाला मानवनिर्मित नियमांनी जखडून ठेवलय.. अमुक अमुक देवाला ह्याचा नैवेद्य दाखवावाच लागतो.. अमुक अमुक देवासमोर स्त्रीने जायचं नसत.. अरे प्रत्येक मनुष्याला जन्म घ्यायला ज्या स्त्री च्या पोटाचाच आधार घ्यावा लागतो अशा पवित्र स्त्रीला ज्या देवाने बनवलं तो तिलाच का टाळेल… असो… असे अनेक विचार करत करत मंदिराबाहेर आलो…
बाहेर बसलेल्या एका शेतकऱ्याकडून थोडी फळ विकत घेतली… कारकडे जाता जाता एक भिकारी मुलगी जवळ येवून भीक मागू लागली… मनाला टोचल्यासारख झालं… डोळ्यात भुकेचा वाळवंट साचला होता तिच्या. मागे वळून देव शोधणाऱ्या रांगेकडे एक नजर टाकली… ओरडून सांगावस वाटलं अरे देव आत नाहीये रे.. पण नास्तिकतेचा शिक्का बसेल म्हणून परत शांत झालो… एक सफरचंद त्या मुलीच्या हातावर ठेवलं… देव शोधानारयांच्या गर्दीत एक माणूस असण्याचं कर्तव्य मी पार पाडलं… अनपेक्षित पने भुकेलेल्या पोटाला खायला मिळाल्याचा आनंत त्या गरीब मुलीच्या पाणावलेल्या डोळ्यात ओसंडून वाहत होता… मंदिरात इतक आत्मिक समाधान मिळेल ह्याची अपेक्षा सुधा नव्हती केली मी… सफरचंद खात खात कुठेतरी देवाच्या असण्याचा विश्वास त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता… तिच्या चेहऱ्यावरचा तो विश्वासाने भरलेला आनंद पाहून मला देव भेटला राव !!!
